Primary tabs

करियर कसे निवडावे?

share on:

करियर

मी कोण आहे?

कसं ओळखायचं मी कोण आहे ते?

जन्माला आल्यापासून आपण आजूबाजूच्या नातेवाईकांच्या टिपण्यान्मधून स्वतःबद्दलचे मत बनवत असतो. उदाहरणार्थ अगदी बापाच्या वळणावर गेला आहे हं...त्याच्या सारखाच इंजिनियर होणार..(हे का तर कधी तरी मेक्यानो हातात खेळायला घेतला म्हणून)

बापरे...आत्तापासून डॉक्टर व्हायची तयारी वाटत...(हे का तर...खेळण्यातली डॉक्टरी अवजार हातात घेतली म्हणून)

ह्यात जास्तीतजास्त सचिन तेंडूलकर होणार इतकीच मजल असते. बाकी खेळ, मानसशास्त्र, फिजीओथेरपी, स्पोर्ट्स मेडीसीन इत्यादी दुरवर सुद्धा ऐकू येत नाही. तुम्ही सुद्धा अनेक उदाहरणे देऊ शकाल. आपण कोणीच ह्याला चुकलेलो नाही. पुढे घरचे बाजूला होतात आणि दारचे समोर उभे राहतात.

“पाहिलंस ना? समोरच्या गुप्त्यांच्या मुलाने इंजिनियरिंग मिळवला प्रवेश. तुलासुद्धा तेच करायचं आहे, मार्क त्यासाठी पाहिजेत!”

“अहो...दांडेकरांच्या प्राचीने स्पोर्ट्स मेडिसिनचा कोर्स केला म्हणे...हल्ली स्पोर्ट्समध्ये जाम पैसा आहे म्हणे. दंगल बघितला आहेस नं?”

ह्या असल्या अर्थहीन चर्चा फक्त नुकसान करू शकतात. फायदा शून्य. मुळात आपल्यामध्ये काय आहे आणि काय नाही ह्याचे ज्ञान नको? ह्याला व्यक्तिमत्व नोंदणी किंवा पर्सनॅलीटी इन्व्हेनंटरी असे म्हणतात. तसे पाहता ती तज्ञांनी
करायची असते किंवा त्यांच्याकडून तपासून घ्यायची असते पण आपण सुरुवात तर करू शकतो? त्याचा ताळेबंदसुद्धा करता येतो...

कशी करायची?

एक कागद घ्यायचा त्याचे दोन भाग करायचे जमाखर्चासारखे. एका बाजूला आपल्या जमा बाजू आणि दुसऱ्याबाजूला आपल्या कमकुवत बाजू...

जमाबाजूमध्ये मला काय आवडते ते लिहा

 

अगदी क्षुल्लक वाटत असले तरी लिहा. चित्र काढायला आवडते.गाणी ऐकायला आवडते. गुणगुणायला आवडते. खेळ पहायला आवडतो. विटीदांडू खेळायला आवडतो. धावायला आवडते..फिरायला आवडते. पोहायला आवडते.पुस्तक वाचायला आवड्डते. मला इतरांचे बोलणे ऐकायला आवडते. काही, काही,काहीही...मला मातीत खेळायला आवडते, मला कुत्रा मांजर असे पाळीव प्राणी आवडतात. मला रानात जायला आवडते.

विरुद्ध बाजूला आपल्याला न आवडणाऱ्या गोष्टी लिहा

मला शाळेत जायला आवडत नाही. ला नातेवाईक आवडत नाही. मला मित्र आवडत नाहीत. मला दारारोज डोक्याला कटकट केलेली आवडत नाही. मला गणित आवडत नाही. मला पाहुण्यांसमोर गाणे म्हण, हे म्हण, ते म्हण असे गुणप्रदर्शन करायला आवडत नाही. मला इस्त्रीचे कपडे आवडत नाहीत. मला कुत्रा आवडत नाही.मांजर ठीक आहे. पाल मला आवडत नाही. इथे सुद्धा अगदी क्षुल्लक वाटत असेल तरी लिहा, मला परीक्षेचा ताण येतो, घाम खूप येतो, छातीत धडधडते, हातांना कंप सुटतो, मला कमीपणाची भावना आहे. मला माझी तुलना इतरांशी केलेली आवडत नाही.

एकदा ही यादी तयार केलीत की तुम्हाला हळूहळू चित्र स्पष्ट व्हायला लागेल. आपण कोण आहोत ते.

ही जी दुसरी यादी आहे नं...त्यातील बऱ्याच घटकांवर तुम्ही काम करू शकता. म्हणजे प्रयत्न सगळ्याच घटकांवर करावा. पण काहींवर कितीही प्रयत्न करा काही परिणाम होत नाही. जैसे थे...रहाते हे मुद्दे विशेषतज्ञांना दाखवायचे. ते निश्चित मदत करू शकतात.

आता ही यादी मनात रुजू द्यायची आणि मग त्या आधारे आपल्याला आपल्या आवडी निवडीच्या आधारे. कुठल्या क्षेत्रात काम करायला आवडेल ह्याचा तुम्हाला प्राथमिक अंदाज बांधता येतो. अर्थात हे सर्व प्राथमिक आहे. ह्या नंतर मानशास्त्रीय सल्लागार (counselor – Phychology) कडून बुद्धिमापन चाचणी (Aptitude Test) करून घेणे आवश्यक.

तर त्या विषयी पुन्हा एकदा. पुढच्या वेळेस.

 

 

विक्रम भागवत 

 

No comment

Leave a Response