Primary tabs

स्मार्ट काळाचे तंत्रज्ञान - IOT

share on:

आपल्या हाताशी असणारे एखादे उपकरण वा वस्तू, वेगवेगळे सेन्सर्स, छोटे कॉम्पोनेंट्स यांचा संच, उपकरण वा वस्तू आणि हा संच यांना जोडणारा 'पायथन'सारख्या एखाद्या संगणकीय भाषा प्रणालीतील प्रोग्रॅम, थेट क्लाउडवर केले जाणारे माहितीचे विश्लेषण आणि अचूक माहितीची निवड करून ग्राहकाला नेमकी सेवा देणारे उत्पादन हा आहे या IoT तंत्रज्ञानाचा थोडक्यात सारांश! कॉम्प्युटर, मेकॅनिकल, सिव्हिल, बायोटेक, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स यासारख्या वेगवेगळया शाखांना एकत्र आणणारे हे तंत्रज्ञान आहे.

आपल्या नेहमीच्या वापरातील उपकरणे किंवा सतत आवतीभोवती असणाऱ्या घरातील असंख्य वस्तू, जर आहेत त्याहीपेक्षा 'स्मार्ट' बनून आपल्याला नेमके हवे तेच काम - तेही अत्यंत अचूकपणे आणि आपण न सांगताच करू लागल्या, तर...? आपण घरातील रेफ्रिजरेटर वापरतो तो केवळ पदार्थ आणि पेये एका ठरावीक तापमानात ठेवून ते अधिक टिकवण्यासाठी. पण हाच फ्रीज जर त्यात ठेवलेले दूध संपत आले आहे हे पाहून, परस्पर दूध विक्रेत्याकडे दुधाची मागणी नोंदवून, त्याचे पैसेही नेट बँकिंगद्वारे चुकते करून दुधाच्या पिशव्या घरात आणू लागला, तर...? अथवा आपल्यात काय आणि कोणत्या वस्तू साठवून ठेवल्या आहेत याचा अंदाज घेऊन हाच फ्रीज जर तुम्हाला त्या पदार्थांपासून बनवता येणाऱ्या शेकडो पाककृती सुचवू लागला, तर ...? किंवा साधा घरातील ग्लास तुमच्या हातांचे ठसे ओळखून तुम्हाला कोणत्या तापमानाचे पेय लागते त्याप्रमाणे आणि तेवढेच थंड किंवा गरम पेय तुम्हाला देऊ  लागला, तर...? या आणि यासारख्या अनेक गोष्टी आपल्या अत्याधुनिक यंत्रांनी नटलेल्या, तरीही आपणा सर्वांनाच ठरावीक 'कष्ट' करायला लावणाऱ्या पारंपरिक स्वयंपाकघराचा ताबा घेत आपल्या जीवनात मजेशीर उलथापालथी घडवायला तयार आहेत! आणि या करामतींचेच नाव आहे 'इंटरनेट ऑॅफ द थिंग्ज' अर्थात IoT!

आज आपल्या अभियांत्रिकी महाविद्यालयांतून शिकवले जाणारे संगणकीय ज्ञान आणि त्याचा अभ्यासक्रम केवळ एक-दोन वर्षांत कालबाह्य ठरत आहे. मुळात वर्गाच्या चार भिंतींच्या आत, खडू-फळा किंवा फार फार तर प्रोजेक्टर वापरून किंवा प्रयोगशाळांमध्ये कीबोर्ड बदडून तेच ते प्रोग्रॅम टाइप करून मिळवले जाणारे ज्ञानही दुसऱ्याच क्षणी निरुपयोगी होताना दिसते आहे. जगाबरोबर आपला अभ्यासक्रम सतत बदलत राहून किती वेगाने आणि कसे धावायचे, हा प्रश्न विद्यापीठांना आणि महाविद्यालयांना सतावतो आहे. मानवी जीवनाच्या सगळयाच अंगांचा जबरदस्त वेगाने कब्जा घेणाऱ्या या संगणकीय करामतींनी आणि या IoTसारख्या तंत्रांनी पारंपरिक शिक्षण पध्दतीलाच आव्हान दिले आहे!

जगातील प्रचंड माहिती साठयांमधील तपशिलांची अचूक देवाणघेवाण करणारे माध्यम म्हणजे माहितीचे मायाजाल अर्थात इंटरनेट. महाकाय संगणकांवरती (सर्व्हरवर) हा माहितीचा साठा सुरक्षित ठेवलेला असतो. असे महाकाय 'सर्व्हर्स' एकत्र येऊन बनतो तो माहितीचा 'क्लाउड'. भारताने आपल्या अशाच एका महाप्रचंड क्लाउडला नाव दिले आहे 'मेघनाद '! हे क्लाउडच आजच्या या संगणकीय क्रांतीत महत्त्वाची भूमिका बजावित आहेत.

आपल्या हाताशी असणारे एखादे उपकरण वा वस्तू, वेगवेगळे सेन्सर्स, छोटे कॉम्पोनेंट्स यांचा संच, उपकरण वा वस्तू आणि हा संच यांना जोडणारा 'पायथन'सारख्या एखाद्या संगणकीय भाषा प्रणालीतील प्रोग्रॅम, थेट क्लाउडवर केले जाणारे माहितीचे विश्लेषण आणि अचूक माहितीची निवड करून ग्राहकाला नेमकी सेवा देणारे उत्पादन हा आहे या IoT तंत्रज्ञानाचा थोडक्यात सारांश!

संगणकीय भाषेचे आणि प्रोग्रॅमिंगचे ज्ञान हा या IoTसाठी लागणारा महत्त्वाचा घटक आहेच, पण तो तेवढाच पुरेसा नाही. ज्यावर हे प्रयोग होणार आहेत, त्या उपकरणाची वा वस्तूची साद्यन्त माहिती असणारा तंत्रज्ञही हा या IoT टीमचा प्रमुख घटक असतो. म्हणजे कॉम्प्युटर, मेकॅनिकल, सिव्हिल, बायोटेक, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स यासारख्या वेगवेगळया शाखांना एकत्र आणणारे हे तंत्रज्ञान आहे.

अभ्यासक्रमाच्या सोयीसाठी आपल्या विद्यापीठांनी विविध  ज्ञानशाखांची इतकी कडेकोट बांधणी केली की एकमेकांच्या क्षेत्रात डोकावून पाहणेही अशक्य होऊन बसले. भाषेच्या विद्यार्थ्यालाही विज्ञानात रस असू शकतो वा इंजीनिअरिंगचा विद्यार्थीही उत्तम कलाकार असू शकतो, हे लक्षात न घेता सरधोपट अभ्यासक्रमाची आखणी करण्यात आली. मुळात हे कप्पेबंद शिक्षण हा काही प्रमाणात ब्रिटिशांचा वारसा. आपण त्यात गेली शंभर वर्षे अतोनात 'सरकारीपणा' भरला आणि आंतरशाखीय शिक्षण पूर्ण बंद करून टाकले. एखाद्या उत्कृष्ट सिव्हिल इंजीनिअरला कॉम्प्युटर वा मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा एखादा विषय - आवड वा गती असली, तरी - परीक्षेसाठी निवडण्याची मुभाच आपण ठेवली नाही. अशा गोष्टींकडे अशैक्षणिक म्हणून पहिले जात असे व विद्यापीठे त्यातच भूषण समजत असत. पीएच.डी. ही विद्यापीठीय अभ्यासक्रमातील तशी सर्वोच्च पदवी, पण ती घेताना तुम्ही तुमच्या मूळच्या ज्ञानशाखेपासून कणभरही ढळता काम नये, याची सक्त तजवीज विद्यापीठांच्या नियमात अगदी आजही आहे. या सर्व कडेकोट गृहीतकांना IoTने चांगलाच आणि मुळापासून धक्का दिला आहे. जगभर या ज्या नव्या तंत्राची आगेकूच सुरू आहे, आणि मुळात कोणतेही कप्पे नसलेले आंतरविद्याशाखीय ज्ञान हाच त्याचा पाया आहे. सर्व क्षेत्रांतील ज्ञान हातात हात घालून हे संशोधन पुढे नेत आहे. आजपर्यंत पदवी घेतलेला अत्यंत हुशार असाही कॉम्प्युटर इंजीनिअर ''मला पी.सी.बी. डिझाइन येत नाही, तो इलेक्ट्रॉनिक्सचा विषय आहे'' असे अभिमानाने सांगू शकत असे व ते गृहीतही धरले जात असे. पण आता IoTच्या जमान्यात सर्वात जास्त मागणी असेल ती सर्व प्रकारच्या ज्ञानात आवड असणाऱ्या, इतर विद्याशाखांची किमान जुजबी माहिती असणाऱ्या आणि त्यातील तंत्रज्ञान शिकण्याची मन:स्थिती असणाऱ्या चौकस आणि रूढार्थाने 'चबढब्या' समजल्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांना!

स्मार्ट होमपासून स्मार्ट सिटीपर्यंतच्या सर्व नवीन कल्पनांचा आत्मा असलेले हे तंत्रज्ञान मुळात आधारित आहे ते माहितीच्या प्रचंड साठयावर आणि या माहितीच्या विश्लेषणावर. जगातील प्रत्येक घटनेची आणि व्यक्तीची मिळेल ती माहिती मोठमोठया क्लाउडवर साठवून ठेवणे आणि सतत नवनव्या दृष्टीकोनातून तिचे विश्लेषण करीत राहणे (Big Data Analysis) हा IoT तंत्राचा पाया आहे. IoTमधील 'थिंग्ज' या शब्दात जगातील सर्व निर्जीव, सजीव, इलेक्ट्रॉनिक, नॉन इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा समावेश होतो. 2020पर्यंत साधारण तीन हजार कोटी वस्तू IoTच्या कक्षेत येतील, असा जागतिक अंदाज आहे. अशा एखाद्या वस्तूला अत्यंत छोटया आकाराच्या चिपच्या स्वरूपात जोडलेले (Embedded) आणि सर्व प्रकारचे कॉम्प्युटिंग करणारे तंत्रज्ञान, उत्पादनाच्या किंवा सेवेच्या स्वरूपाप्रमाणे बनवलेला कॉम्प्युटिंगचा प्रोग्रॅम, संबंधित माहितीच्या साठयाशी (Cloudशी) इंटरनेटद्वारे होणारी देवाणघेवाण आणि अंतत: त्या संबंधित वस्तूला मिळणारे संदेश व त्याप्रमाणे होणारी कृती असे या नव्या तंत्रज्ञानाचे सर्वसाधारण स्वरूप आहे.

सर्व प्रकारच्या माहितीचा असा मोठा साठा सतत अद्ययावत ठेवणे, या साठयातील माहितीचे विश्लेषण करणे आणि हे सर्व करताना ही माहिती अत्यंत सुरक्षित राहील याची खबरदारी घेणे हे म्हणूनच आज अनेक कंपन्यांचे सर्वात मोठे आव्हानात्मक काम बनले आहे. संपूर्ण जगाला कवेत घेणाऱ्या या सर्व प्रक्रियेचा नेमका अंदाज अजून कोणालाच आलेला नाही, त्यामुळे माहितीचे प्रमाणीकरण, जागतिक नियमावली, नवीन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कायदे या सर्व गोष्टींना आणखी काही वेळ लागेल. शिवाय या प्रक्रियेत अनेक पळवाटा राहतीलच, याचा फायदा घेत या तंत्रज्ञानाचा दुरुपयोग होण्याची शक्यता आहेच व तसे परिणामही दिसत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून - विशेषत: फेसबुक, टि्वटर, मोबाइल फोन, सर्च इंजीनचा वापर याद्वारे आपण नेमके 'काय' आहोत, आपल्या आवडी काय आहेत, आपल्या प्राथमिकता काय आहेत याची माहिती या सेवा वापरणारा प्रत्येक जणच आपण होऊन या माहितीच्या मायाजालात सोडत असतो. वरवर निरुपयोगी समजले जाणारे  हे 'फूटप्रिंट्स' आपल्या नकळत एखादी कंपनी वापरत असते आणि त्यातून अचूक निष्कर्ष काढून एखाद्या मोहिमेला वा उत्पादनाला जन्म देत असते. अमेरिकेतील ट्रम्पच्या विजयामागे अशी माहितीचे विश्लेषण करणारी यंत्रणाच आहे, असा बोलबाला अजूनही होत आहे. जेव्हा वेगवेगळया कंपन्या आणि देश वा देशातील संस्था असे महाकाय माहितीचे साठे जमवतात आणि IoTसाठी हे साठे वापरतात, तेव्हा असे साठे आणि त्यातील माहिती जर कोणी डल्ला मारून चोरली, तर किती भयानक अराजक माजेल याची कल्पनाच केलेली बरी! त्यामुळेच IoTच्या बरोबरीनेच बिग डेटा ऍनालिसिस आणि सायबर सिक्युरिटी ही दोन महत्त्वाची व मोठी क्षेत्रे आज उदयाला आली आहेत.

गेल्या काही वर्षांत IoTच्या या तंत्राला Hackathon (हॅकेथॉन) या तुलनेने थोडया जुन्या पध्दतीची जोड मिळाली आहे. 'हॅकेथॉन'चा अर्थ आहे एखाद्या कल्पनेचा वेगवान पाठपुरावा. हॅक आणि मॅरेथॉन या दोन कल्पनांचे हे एकत्रीकरण असले, तरी 'कब्जा' करणे हा हॅकचा पारंपरिक अर्थ येथे अभिप्रेत नाही, तर एखादी कल्पना प्रत्यक्षात आणणे असे अपेक्षित आहे. युरोपातील, अमेरिकेतील विद्यापीठांनी आणि कंपन्यांनी या वेगवान खेळाला दोन दशकांपूर्वीच सुरुवात केली. प्रतिभावान माणसांचा शोध घेणे आणि नव्या कल्पना बाजारात आणणे हा या खेळाचा मुख्य हेतू. एकाच कल्पनेवर काम करणाऱ्या समूहाने सतत काही तास वा काही दिवस एकत्र बसून, एकत्र विचार करून त्या कल्पनेला प्रत्यक्ष स्वरूप देणे म्हणजेच हे 'हॅकेथॉन'! मुळात या विषयातील सर्वच काम हे बौध्दिक प्रकारचे असल्याने काही तासांचा अवधी एखाद्या कल्पनेच्या सादरीकरणाला पुरेसा असतो. मशीनशी वा मनुष्यबळाशी संबंधित उत्पादनांना अर्थातच हे लागू होत नाही. पण  संगणकीय कामांना हा स्पर्धात्मक अवधी पुरेसा असतो.

आज सर्व जगाप्रमाणेच भारतातील अभियांत्रिकी महाविद्यालयांतून हॅकेथॉन हा प्रकार भलताच लोकप्रिय झाला आहे. वेगवेगळया विद्याशाखांतील विद्यार्थी आधी एकत्र येतात, एखादी भन्नाट कल्पना नक्की करतात. ती आयोजकांकडून मंजूर होताच हा 'हॅकेथॉनचा' पॅट मांडला जातो. नॉनस्टॉप 24 तास ही सर्वसाधारण मर्यादा. त्याआधी या विद्यार्थ्यांना थोडेफार प्रशिक्षण दिले जाते आणि मग सलग सुरू होतो या कल्पनेचा पाठपुरावा. प्रत्यक्ष वस्तू, तिला कल्पनेच्या गरजेप्रमाणे जोडलेले अगदी छोटे संगणकीय उपकरण, त्यातील इंटरफेस, योग्य ते काम करवून घेणारी आज्ञाप्रणाली अर्थात प्रोग्रॅम, माहितीच्या साठयाशी या संचाचा थेट संबंध व त्याद्वारे योग्य त्या माहितीची देवाणघेवाण आणि अंतत: त्या कल्पनेचे प्रत्यक्षात उतरणे असा हा साधारण 24 तासांचा उत्कंठावर्धक प्रवास असतो. सतत नवीन काहीतरी करायला धडपडणारी मुले या सर्व प्रक्रियेतून खऱ्या अर्थाने शिक्षित होतात. हे 24 तास आणि त्यासाठी केली गेलेली तयारी त्यांना शिक्षणाचे खरे मर्म दाखवून देते. कोणत्याही अभियंत्याने 'परिपूर्ण निर्मितीसाठी' घेतलेला ध्यास हेच त्याच्या यशाचे खरे कारण असते. हा निर्मितीचा ध्यास, त्यासाठी करावी लागणारी धडपड, त्यासाठी वापरावी लागणारी संसाधने, विद्यार्थ्यांना एका वेगळया अनुभूतीचा आनंद देतात. नेमके हेच मर्म आपल्या विद्यापीठीय शिक्षणक्रमातून आपण हद्दपार केले होते, तेच आज सुदैवाने या हॅकेथॉनच्या निमित्ताने पुढे आले आहे.

हे सर्व खरे असले, तरी IoTच्या या उगवत्या तंत्राने एक जुनाच प्रश्न पुन्हा एकदा आपल्या सर्वांपुढे उभा केलेला आहे. अधिकाधिक 'स्मार्ट' बनण्याची आपल्याला खरोखरच गरज आहे का? बसल्या जागेवरून काम करण्याच्या वाढत्या सवयीमुळे, सगळीच सुखे हात जोडून उभी असल्यामुळे आरोग्याचे नवनवीन अपाय समोर येताहेत. ओबेसिटी, मधुमेह हे आजार प्रचंड वेगाने वाढताहेत. मग पुन्हा नॅनोटेक्नोलॉजीसारखे प्रगत तंत्रज्ञान वापरून आपणच आपल्यासाठी नवनवीन औषधे बनवीत आहोत. गरज ही कोणत्याही शोधाची जननी असते असे म्हटले जायचे आणि ते खरेही होते, पण आज नेमके उलटे तर घडत नाहीये ना? शोध हीच गरजेची जननी बनली आहे. अर्थात IoTच्या नाण्याची ही केवळ एकच बाजू आहे. दुसऱ्या बाजूला आहे ती नवनवीन कल्पनांची भरारी, जे माहीत नाही, आजपर्यंत साध्य झाले नाही ते साध्य करण्याची विजिगीषू वृत्ती. हा तर माणसाचा स्थायिभाव आहेच. त्याच्या संशोधक वृत्तीला पायबंद घालणे अवैज्ञानिक आहे. यातील काही संशोधन गरजेचे नाही, असे वरवर वाटू शकते; पण त्यामुळे एकूणच प्रगतीचा रथ पुढे सरकतो आणि कदाचित उद्या मानवी जीवन अधिक सुखी आणि समृध्द करणारे, पर्यावरणाची निकोप काळजी घेणारे आणि संपूर्ण जगालाही अनंत काळापर्यंत सुदृढ ठेवणारे संशोधन त्यातूनच निर्माण होईल. त्यामुळे लागलेला प्रत्येक शोध वा सुविधा आपण वापरलीच पाहिजे हा अट्टाहास न बाळगता, दाराशी उभ्या असणाऱ्या या तंत्रज्ञानाकडे सारासार विवेकानेच पहिले पाहिजे.

   ' अमंत्रमक्षरं नास्ति नास्ति मूलमनौषधम्?।

     अयोग्य: पुरुषो नास्ति योजकस्तत्र दुर्लभ:॥'

'कोणतेच अक्षर मंत्राविना नसते, कोणतेच मूळ हे अनौषधी नसते आणि कोणतीच व्यक्ती ही निरुपयोगी नसते. वानवा आहे ती या सर्वांचा योग्य उपयोग करून घेणाऱ्या योजकतेची!' अशा अर्थाचे संस्कृत सुभाषित आपल्याला माहीत आहेच. IoTची आगामी काळातील वाटचाल लक्षात घेता आता 'कोणतीच माहिती निरुपयोगी नसते' अशाही एका वचनाची भर या सुभाषितात घालायला हरकत नाही!    

***जयंत कुलकर्णी****

लेखक: 

No comment

Leave a Response