Primary tabs

मुठाई माउली माझी - भाग ४  

share on:

मुठा नदीच्या वनस्पती आणि प्राणीवैविध्याचा थोडक्यात घेतलेला आढावा... 

जलीय परिसंस्थेचे (Aquatic ecosystem) मुख्यतः दोन प्रकार पडतात. एक म्हणजे समुद्री परिसंस्था (Marine Ecosystem) आणि दुसरी गोड्या पाण्यातील परिसंस्था (Freshwater Ecoystem). यामध्ये नदी, तळी, तलाव, इ. चा समावेश होतो. नदीच्या पाण्यात, तळाशी आणि काठांवर खूप मोठं वनस्पतीवैविध्य आढळतं. नदीच्या दोन्ही काठांवरील भाग हा Riparian Zone म्हणून ओळखला जातो. या भागात आढळणाऱ्या वनस्पतींना एकत्रितपणे Riparian Vegetation म्हणतात, तर नदीच्या पाण्यात आढळणाऱ्या वनस्पतीवैविध्याला Aquatic vegetation म्हणतात. दोन्ही ठिकाणच्या वनस्पतींची नदी परिसंस्थेत महत्वाची भूमिका असते. Riparian Zone मधील झाडांची मुळं नदीकाठच्या मातीत घट्ट रुतलेली असतात. यामुळे नदीच्या प्रवाहाचा वेग नियंत्रित होऊन नदीकाठाची धूप रोखली जाते. नदीच्या उगमस्थानी जितकं घनदाट जंगल असेल, तितका त्या नदीला जास्त पाणीपुरवठा होतो. नदीच्या पाण्यात आढळणाऱ्या वनस्पतींची नदी परिसंस्थेत स्वतंत्र भूमिका असते. या वनस्पती प्रकाश संश्लेषण करून नदीतल्या जलचरांना ऑक्सिजनचा पुरवठा करतात. अनेक प्राणी-पक्ष्यांचे अधिवास या पाणवनस्पतींवर अवलंबून असतात. मुठा नदीच्या उगमापासून संगमापर्यंत काठावरचं जंगल, रांजणखळगे, खडकांची बेटं, डबकी, दलदलीच्या जागा, आशा विविध ठिकाणी विविध प्रकारचे अधिवास तयार झालेले होते. मात्र पुणे शहराचा जसजसा विस्तार झाला, धारणं बांधली गेली, प्रदूषण वाढलं तसतसे हे अधिवास कमी होऊ लागले आहेत. मुठा नदीच्या उगमापासून जसजसं शहराकडे यावं, तसतसं वनस्पतीवैविध्य कमी होताना दिसतं.   

मुठा नदीपात्रात आढळणाऱ्या वनस्पतींचा अभ्यास सर्वप्रथम १९५४ साली डॉ. व्ही. डी. वर्तक यांनी केला. त्यावेळी त्यांनी सुमारे ४०० वनस्पती प्रजातींची नोंद केली होती. त्यांतील बऱ्याचशा वनस्पती या अल्पजीवी (ephemeral) गटात मोडणाऱ्या होत्या. १८० औषधी वनस्पतींचीही स्वतंत्र नोंद त्यात आहे.  त्यागोदरही काही भारतीय आणि ब्रिटीश वनस्पतीशास्त्रज्ञांकडून पुणे परिसरातल्या वनस्पतींचे अभ्यास झाले होते. १९८२-८३ साली पुण्याच्या इकलाॅजीकल सोसायटीचे संस्थापक प्रकाश गोळे यांनी मुठा नदीपात्रातल्या वनस्पतींचा सर्व्हे केला. त्यात त्यांनी १५६ वनस्पती प्रजातींची नोंद केली. या अभ्यासानुसार मुठा नदीपात्रातील वनस्पतीवैविध्य कमी झाल्याचं स्पष्ट झालं आहे. डॉ. वर्तक यांनी १९५४ साली केलेल्या विठ्ठलवाडी ते येरवडा या पट्ट्यात केलेल्या अभ्यासात मुठा नदीत  Aponogeton natans, potamogeton crispus,  धोत्र्यासारखी सुंदर पांढरीशुभ्र फुलं असणारी भातकमळ (ottelia alismoides), पाच पांढऱ्या पाकळ्या आणि त्यामध्ये पाच गुलाबी तुऱ्यांचं फुल असणारी Crinum viviparum, जलपिंपळी (Phyla Nodiflora), ludwigia octovalvis (पाणलवंग), पिवळी बारीक फुलं असणारी Portulaca oleracea (घोलू), औषधी उपयोग असणारी आणि खास करून केसांच्या तेलात वापरली जाणारी भृंगराज/माका (Eclipta prostrata) आणि ब्राह्मी (centella asiatica), लव्हाळे (cyperus species) या वनस्पती प्रामुख्याने नदीपात्रात सर्वत्र आढळल्या होत्या.  १९८३ साली प्रकाश गोळे यांच्या अभ्यासात या वनस्पती काही ठराविक ठिकाणीच आढळून आल्या. प्रकाश गोळे यांच्या अभ्यासानुसार ‘जलपर्णी’ (Echhornia crassips) ही मुठा नदीत नव्याने आढळलेली वनस्पती होती, ज्याची नोंद १९५४ सालच्या वर्तक यांच्या अभ्यासात नव्हती. जलपर्णी ही प्रदूषित पाण्यातच वाढते. पाण्यातले प्रदूषक घटक शोषून घेते. मुठा नदीत आढळलेलं जलपर्णीचं अस्तित्व हे नदीचं प्रदूषण वाढलं असल्याचं निदर्शक होतं. आजही मुठा आणि तिच्या उपनद्यांमध्ये जलपर्णी बेसुमार वाढलेली दिसते.  Lemna gibba, Pistia stratiotes, (बेशरम), Ipomoea carnea  याही इतर प्रदूषित पाण्यात वाढणाऱ्या वनस्पती गोळे सरांच्या अभ्यासात नव्याने आढळून आल्या. एरंड (ricinus communis), कॉंग्रेस गवत (Parthenium hysterophorus) या वनस्पतीही आज मुठा नदीकिनारी वाढल्या आहेत. शिंदी ( Phonix sylvestris), जांभुळ (Syzygium cumini), करंज (Pongamia pinnata), सावर (Bombax ceiba), वड (Ficus benghalensis), पिंपळ (Ficus religiosa), उंबर (Ficus racemosa), शिरीष (albizia lebbeck), कडूनिंब (Azadirachta indica) हे मुठा नदीच्या काठावर प्रामुख्याने आढळणारे वृक्ष होते, जे आज कमी संख्येने दिसतात. 'वाळुंज' (Salix tetrasperma) हे मुठा नदीकिनारी आढळणारं प्रमुख झाड होतं, जे हल्ली तुरळक ठिकाणी आढळतं.  

मुठा नदीच्या प्राणीवैविध्यावरही अनेक पर्यावारण अभ्यासकांनी अभ्यास केलेला आहे. ज्येष्ठ पक्षीनिरीक्षक किरण पुरंदरे यांनी यांनी मुठा नदी परिसरात आढळणाऱ्या धोबी पक्ष्याच्या अधिवासाचा बारकाईने अभ्यास करून लिहिलेलं ‘मुठेकाठचा धोबी’ पुस्तक प्रसिद्ध आहे. वन्यजीव अभ्यासक धर्मराज पाटील हेही गेली अनेक वर्षे मुठा नदीच्या प्राणीवैविध्याचा अभ्यास करत आहेत. थोरला धोबी (White browed Wagtail), चित्रबलाक (Painted Stork), काळा शराटी (Black Ibis), पाणकोंबडी (Waterhen), ताम्रमुखी टिटवी (Red-wattled Lapwing) हे पक्षी मुठा नदी परिसरात आढळणारे स्थानिक पक्षी आहेत. पांढरा धोबी (White Wagtail), तुतवार (Common Sandpiper), करडा धोबी (Grey Wagtail), पिवळा धोबी (Yellow Wagtail), ठिपकेवाला तुतवार  (Wood Sandpiper), चक्रवाक (Ruddy Shelduck), तलवार बदक (Pintail Duck), लालसरी ( Common Pochard) इ. पक्षी थंडीच्या दिवसांत उत्तर भारतातून स्थलांतर करून मुठा नदी परिसरात येतात. या स्थलांतरित पक्ष्यांची संख्या झपाट्याने कमी झाल्याचं अभासाकांना आढळलं आहे. नदीत कुठल्या वनस्पती आणि प्राणी आढळतात हा नदीचं पाणी स्वच्छ आहे की प्रदूषित आहे, हे ओळखण्याचा एक ठोकताळा असतो. मुठा नदीच्या प्राणिवैविध्याचा वर्षानुवर्षे अभ्यास करणाऱ्या संशोधकांना प्रदूषणामुळे इथल्या प्राणीजीवनात झालेले अनेक बदल आढळून आलेले आहेत. एकेकाळी नदी जेव्हा स्वच्छ होती तेव्हा या नदीत  कमलपक्षी (Pheasant-tailed Jacana), कवड्या (Pied Kingfisher), नदी सुरय (River Turn), पाणडुबी (Little Grebe) असे स्वच्छ पाण्याचे निदर्शक असलेले पक्षी दिसायचे, जे हल्ली क्वचित दिसतात. आज प्रदूषणाची पातळी प्रचंड वाढल्याने ओला कचरा खाणारे कावळा, घार, तसंच जलपर्णीमुळे वाढलेले किडे खाणारा वंचक (Pond Heron) या पक्ष्यांची संख्या नदीवर वाढलेली दिसते.

 

एकेकाळी मुठा नदीचं वैभव असणारा  ‘महासीर’ हा मासा आपलं नदीतलं आपलं अस्तित्व पूर्णपणे गमावून बसला आहे. १९५० च्या सुमारास दीडशेच्या आसपास माशांच्या प्रजाती मुठा नदीत आढळत होत्या, ज्यांच्यापैकी फक्त सात-आठ प्रजाती आता शिल्लक राहिल्या आहेत. कमी होणारं जैववैविध्य, जलपर्णीसारख्या नको असलेल्या वनस्पतींची बेसुमार वाढ या गोष्टी मुठा नदी ‘मृत’ होत चालल्याचं गंभीर वास्तव दर्शवतात.

- हर्षद तुळपुळे 

content@yuvavivek.com

 

     

 

 

 

 

 

 

 

 

लेखक: 

No comment

Leave a Response