Primary tabs

मी देवळात जातो....

share on:

मी देवळात गेलो तेव्हा...

 

मागच्याच शनिवारी पर्वती पायथ्याशी एका व्यक्तीची वाट पाहत थांबलो होतो. थांबलो होतो त्याच्याबरोबर मागे एक प्रसिद्ध शनी मारुती मंदिर आहे. आत जाऊन दर्शन घेतलं आणि तिथल्या बाकावर बसलो होतो, फोनची वाट पाहात. 

 

एक ओळखीचे गृहस्थ भेटले. 

"बघ! पकडलं तुला", मी लपूनछपून अण्णाकडे आकडा लावत असताना मला पाहिल्यासारखं ते म्हणाले. 

"अरे काका, कसे आहात? पकडलं म्हणजे?", मी.

"मग! देवा-धर्माबद्दल काय काय लिहितोस फेसबुकवर आणि इकडे मात्र रितसर शनिवारी शनी मंदिरात येतोस काय दर्शनाला." सोवळं ओवळंं  करून बिहारी मंत्रोच्चार करत छट्पूजेला बसलेत आणि आपण त्यांना पकडलं असलं काहीतरी फिलिंग त्या व्यक्तीला येत असावं. 

 

"हा हा अहो मग काय झालं? मी देवा धर्माबद्दल मी जे काही लिहितो ते खरोखरंच माझे विचार आहेत; मला वाटतं तेच लिहितो मी. आणि मी असं कधी म्हणालो की मला देवळात जायला आवडत नाही? देवळातमध्ये असलेलं प्रसन्न वातावरण, उदबत्ती, फुलं, गंध, प्रसाद यांचा दरवळणारा सुगंध, पवित्र श्लोकांचे मंत्रोच्चार हे सगळं आवडतं मला. पण देवत्व फक्त मंदिरात आहे, मूर्तीमध्ये आहे हे मला पटत नाही; म्हणून त्या मूर्तीच्या दर्शनासाठी दोन दोन तास रांगेत उभं राहणं, मूर्तीवर तेल, दूध, तूप ओतणं, नवस बोलणं, नवस फेडणं, दानपेटीमध्ये दान टाकणं वगरे मी करत नाही; म्हणजे त्यावर विश्वास नाही." 

 

"मग शनिवारी शनी मंदिरात आलास बरोबर ते?" काका

 

"अहो आज अगदी गणेश चतुर्थी असती, महाशिवरात्री असती किंवा आषाढी एकादशी असती तरीही मी आलोच असतो. कारण मी इकडे आलोय वेगळ्या कारणासाठी. ह्या देवळापाशी एका व्यक्तीची वाट पाहतोय, वेळ होता म्हणून आत आलो, बसलो. आज आवर्जून या मंदिरात आलेलो नाही. बाजूला मंदिर असेल तर त्या देवाला वाटून दिलेल्या दिवसाची वाट कशाला पहायची?"

 

काका शांत झाले. त्यांचा हा शोध फोल ठरला म्हणून बहुधा निराश झाले असावेत. मग गरम गरम शिरा प्रसाद म्हणून घेतला मारुतीला पुन्हा एकदा नमस्कार केला आणि निघून गेले. 

 

फरक समजून घ्यायला हवा नाही का? 

माझ्यासारखा मी एकटाच आहे असं माझं म्हणणं नाही. असंख्य लोक असतील असे. माझंं देवाशी वैर नाही, मला देवाचा राग नाही, मला देवाबद्दल घृणा, द्वेष, चीड हे काही काही नाही. उलट देवाच्या अनेक रुपांबद्दल, अवतारांबद्दल मला कुतूहल, आस्था आणि आदर आहे, देव-देवतांबद्दलच्या कथा, आख्यायिका, पुराण संदर्भ मला भावतात, लक्षातही राहतात. त्यांचा नक्कीच आदर आहे! 

 

हे अथांग विश्व चालवणारी, समस्त विश्वाला चालना देणारी, कार्यरत ठेवणारी माणसाच्या आकलनाच्या पलीकडची एक नैसर्गिक शक्ती आहे यावर ठाम विश्वास आहे माझा. पण ही अथांग शक्ती एका गाभाऱ्यात कोंडून राहू शकते आणि तिथेच जाऊन तिची अनुभूती मिळते हे माझं मत नाही.

 

म्हणून मंदिरात मी जायचंच नाही का? 

 

'तुम्ही जाऊन या मी बाहेरच बसतो' म्हणायला मी काही 'दिवार'चा अमिताभ नाही. मी तरी असं करत नाही आणि करणारही नाही. सारसबागेत फिरायला म्हणून जायचं आणि मुद्दाम म्हणून मंदिरातच जायचं नाही हे करण्याइतका पराकोटीचा नास्तिक मी नाही. पण गर्दीत रांगेत तासभर थांबून दर्शन घेणारा पराकोटीचा आस्तिकही मी नाही. 

 

मी मंदिरात जातो. तिथलं प्रसन्न वातावरण, भिंतीवर कोरलेले संस्कृत वेद, शिल्पांची कलाकुसर, देवाच्या मूर्तीचं सुंदर रूप आवर्जून पाहतो. तिथलं प्रसन्न वातावरण अनुभवतो. पण इकडे आल्यामुळेच आपल्यावर देवाची कृपा बरसत राहील आपल्या मार्गातली सगळी संकटं दूर होतील, आपला उध्दार, कल्याण, भलं होईल असे कोणतेही (गैर)समज करून घेत नाही.

घेणारही नाही.

 

त्यामुळेच यापुढे अजून कोणालाही मी चुकून माकून कोणत्याही मंदिरात भेटलोच तर लगेच असे प्रश्न पडू नयेत म्हणजे झालं! 

 

...रविराज गोसावी

 

लेखक: 

No comment

Leave a Response