Primary tabs

माझी परदेशवारी भाग ३

share on:

गेले दोन दिवस हेग शहरातील बीच आणि स्थानिक पार्क पादाक्रांत केल्यानंतर खाशा स्वाऱ्या Den Haag Market Street (आपल्यासाठी उच्चारी हेग मार्केट स्ट्रीट, हेच बरं आहे)कडे कूच करत्या झाल्या.

हेगमध्ये रुळत चाललेल्या लेकीच्या मार्गदर्शनाखाली मोहिमेची आखणी करण्यात आली होती. राजे साहेबांनी स्वतः सर्व सूत्र हाती घेतल्याने राणीसाहेब निर्धास्त होत्या. त्यांचा जामानिमा वेळेत आटपून त्यांना घराबाहेर काढणे या मोहिमेच्या पहिल्या भागाची फतेह जाहली. स्वाऱ्या मजल दरमजल करीत बस स्टॉपकडे रवाना झाल्या. जवळ Ovi chip kaart नामे स्मार्ट कार्ड असण्याची खातरजमा करून स्वाऱ्या बस स्टॉपवर विसावल्या. इये नगरीत प्रत्येक बस स्टॉपवर बसच्या आगमनाची minute to minute माहिती देणारा इलेक्ट्रॉनिक  display असतो आणि तो चक्क correct वेळ दाखवतो.
ह्याची एव्हाना सवय झाल्यामुळे हाती असलेल्या वेळेचा सदुपयोग बस स्टॉपवर  फोटो काढण्यासाठी करण्यात आला.  ठरलेल्या मिनिटात बस येती झाली. आत शिरताना राणीसाहेबांना बिलकूल चिंता नव्हती, कारण इथल्या बसेस आमच्यासारख्या लोकांसाठी अतिशय मैत्रभाव जपणाऱ्या असतात. (सहसा मेरा भारत सोडला तर ही चिंता राणीसाहेबांना बाहेर कुठेही जाणवली नाही.) असो तर आत शिरतानाच Ovi Card बसच्या दरवाज्यात असलेल्या स्क्रीनसमोर धरलं आणि आमच्या entry pointची नोंद झाली. तुमच्या stopला उतरायच्या अगोदर पुन्हा स्मार्ट कार्ड स्क्रीनसमोर पकडलं की आपल्या exit point ची नोंद  होते. तुमच्या कार्ड बॅलन्समधून पैसे वजा होतात इतका सोपा मामला. आता इथे काही चलाख लोकांच्या मनात येईल की कार्ड read केलंच नाही तर चकटफू जाता येईल का? तर नाही! कारण ड्रायव्हर तुम्ही चढताना लक्ष ठेवून असतो आणि तुम्ही कार्ड read नाही केलं तर कमीत कमी 4 युरो दंड म्हणून तुमच्या कार्डमधून वजा होतात! मुळात इथे अशी सुपीक डोकी नसावीत असं आपलं मला तरी वाटतं.
हेग सेंट्रल बस स्टेशनला पाय उतार होऊन स्वाऱ्या ट्राम (पक्षी मेट्रो) स्टेशनकडे निघाल्या. सगळीकडे नजरेत भरेल इतकी स्वच्छता. कार्यालयीन कामाची वेळ असली तरीही बेताचीच असलेली गर्दी ह्यामुळे जरा चुकल्या चुकल्यासारखं वाटलं राणीसाहेबांना राजेसाहेब ह्या देशी आणि एकूणच जगभर मुक्त संचार करत असल्याने त्यांना ह्याचे काही अप्रूप नव्हते. सुरळीत सुरू असलेल्या सरकत्या जिन्यांचा वापर करून स्टेशनात आलो. लगोलग ट्राम अवतीर्ण झाली आणि स्वाऱ्या चढाई करून Spui नामक पुढच्याच  स्टेश नात पायउतार झाल्या.  इथे पुन्हा राणीसाहेबांना गाडीत अत्यंत सहज चढता आल्याने सुखद धक्का बसला . इथे चढता उतरताना परत Ovi कार्डचा इमानदारीने वापर केला गेला.
एकदाच्या स्वाऱ्या मुक्कामी पोहोचल्या. दुतर्फा smart shopping destinations खुणावतच होती. सगळीकडे उत्साहाने सळसळलेली लोकं (गर्दी म्हणवतच नाही याला, ही कसली गर्दी) मुलांना summer vacation असल्याने ती गटागटाने भटकायला निघालेली. कुठे senior citizens, कुठे आमच्यासारखे मधलेच, कुठे, शॉपिंगला आतुर तरुणी अशी सगळी माणसं अवतीभवती.
कुठे जावं यावर थोडी खलबते झाल्यानंतर स्वाऱ्या Guess मध्ये शिरल्या. आधी, sale ची पाटी लावली होती ना! मग जायलाच पाहिजे एक चक्कर मारून परत आलो. तेच करावं लागणार हे माहीत होतं अशी एका पुढे एक अशी दुकाने (दुकाने म्हणवत नाही खरं तर) फिरत पायांना भरपूर व्यायाम दिला. काही ठिकाणी लेकीच्या घरासाठी वस्तू घ्यायला हात शिवशिवले. पण तिने दिलेली प्रेमळ दटावणी आठवली, "काहीही आणायचं नाही हा आई. उगाच सामान वाढवू नको माझं."  तिचंही बरोबरच आहे म्हणा, गेल्या पाच वर्षात दोन देश, चार राज्ये आणि पाच शहरे बदलावी लागल्या नंतर असंच वाटणार तर एकूण काय आम्ही रिकाम्या हाताने बाहेर. पण प्रत्येक ठिकाणी खरेदी करताना लोकांनी पाळलेली शिस्त, counter staff चं तत्परतेने मदत करणं हे बघून छान वाटत होतं. एकूणच The US पेक्षा मला इथली माणसं मोकळीढाकळी वाटली. एक सहजपणा जाणवला त्यांच्या वागण्यात, त्यामुळे उपरेपणा जाणवत नाही.
फ्रान्स किंवा जर्मनीपेक्षा इथे संवाद साधणे ही सोपे कारण इंग्रजी सगळ्यांना समजते.
तर अशा रीतीने फिरून पोटात कावळे ओरडू लागण्याआधीच HEMA नामक सुपर मार्केटमध्ये प्रवेश केला. आत शिरण्यापूर्वी, "हेमा मालिनीचं आहे बरं का हे दुकान" असा पांचट विनोद राजे साहेबांनी केलाच! त्याला यथायोग्य पावती दिलीच राणी साहेबांनी पुन्हा एकदा खिडकी खरेदी (विंडो शॉपिंग) करून  पोटपूजेचा मार्ग धरला सरळ. त्याची तिथेच सोय होती हे एक कारण होतंच तिथे जाण्यामागे. शाकाहारी पदार्थांचा नेहमी असतो तितपतच चॉईस होता; पण त्यातल्या त्यात healthy meal निवडून पुढे आलो. Desert काउंटरवर आल्यावर जीभ घसरलीच करता काय समोर carrot cake, red velvet cheese cake, chocolate cake आणि इतरही अपरिचित पण तोंडाला पाणी आणणारे केक्स होते. Red velvet चा अतीव  मोह पडला पण आकार आणि उष्मांक दोन्ही बघून भय दाटून आले. शेवटी राजेसाहेबांच्या पसंतीच्या chocolate pastry ची निवड झाली. Chocolate हा त्यांचा all time favourite flavour आहे. तर अशा रीतीने sinful indulgence झाला. सभोवती येणाऱ्या लोकांना बघत होते. इथल्या म्हाताऱ्या पण अगदी मस्त एकेकट्या फिरत असतात. आमच्या समोरच एक आजी तोच Red Velvet cake (आय हाय) आणि कॉफी मग घेऊन आपला छानसा walker ढकलत आल्या. Calories ची चिंता नाही की काही नाही. आजी होत्या एकदम फिटच. थोड्याच वेळात दुसऱ्या आजी तोच मेन्यू घेऊन अवतरल्या! इथल्या आज्यांचा असेल तो आवडता cake पण माझा मात्र  red velvet रूपी मेनकेकडून तपोभंग होता होता राहिला. वरती कडूशार कॉफी चे घुटके घेऊन स्वाऱ्या पुढे निघाल्या.
राजे पेनांचे शौकीन, त्यांनी मागल्या बारी दुकान हेरून ठेवले होते, तिकडे रवाना झालो. आपल्याकडे लोअर परेलला palladium मध्ये असतात त्या दर्जाची दुकानं. राजे साहेब आणि राजकन्या यांना अगदी साजेशी. राजे साहेबांना हव्या असलेल्या पेनाची खरेदी झाली. आणि स्वाऱ्या परतीच्या प्रवासाला लागल्या. वाटेत एक Icecream ची गाडी दिसली चक्क आणि मन बालपणात गेलं. वेड्यासारखे फोटो काढले.
परतीचा प्रवास उलट क्रमाने करून den haag सेंट्रल बस स्टेशनला आलो. आमची बस तीन वाजून अकरा मिनिटांनी निघायची होती. बरोबर तीन वाजून पाच मिनिटं झाल्यावर चालक महाशय बसमध्ये प्रवेश करते झाले. यायची ती मंडळी आली आणि बरोबर तीन वाजून अकरा मिनिटांनी टिंग टिंग, बस निघाली सुद्धा! निघताना आमची बस exit च्या अगदी जवळ होती, त्यामुळे अपेक्षेप्रमाणे कचकन उजवी कट मारून निघणार असं वाटत असताना त्याने डावे वळण घेऊन पूर्ण बस स्टेशनला वळसा घालून बस रस्त्यावर आणली! Saftey first हे काहीतरी अजबच होते बघा. आपल्याकडच्या ड्राइव्हर लोकांना दाखवण्यासाठी शूटिंग तेवढं करायचं राहिलं बघा. तर अशा रीतीने खाशा स्वाऱ्या भरपूर अनुभव गाठीशी बांधून परत आल्या!

© डॉ  वंदना कामत   

No comment

Leave a Response