Primary tabs

मातृभूमीस पत्र

share on:
 

 (पुढे लिहिलेले पत्र माझ्या तीन मातांपैकी एका मातेला लिहिलेले पत्र आहे. सर्वप्रथम तर माझ्या तीन माता कोण आहेत हे मी सांगू इच्छिते. माझी पहिली माता म्हणजे माझी जन्मदात्री आई, जिने मला जगायला आयुष्य दिले. माझी दुसरी माता म्हणजे माझी मातृभूमी, भारतमाता, जिने मला जगात एक ओळख, एक स्थान दिले. माझी तिसरी माता म्हणजे माझी मातृभाषा, माय मराठी, जिने मला संवादासाठी शब्द दिले.

तर हे पत्र आहे माझ्या दुसऱ्या मातेला, म्हणजेच माझ्या मातृभूमीला..)

 

प्रिय मातृभूमी,

      सुरुवात कुठून करू ते कळतच नाहीये. आज तुला पारतंत्र्याच्या बेड्यांतून मोकळी होऊन ७२ वर्षे झालीयेत! म्हणजे ७२ वर्षांपूर्वी तुझा जणू पुनर्जन्मच झाला असं म्हणायला हरकत नाही. आज तुझा वाढदिवस आहे आई! (मी तुला आई म्हणूनच संबोधणार.) या ७२ वर्षांत तू खूप काही पाहिलं आहेस, सोसलं आहेस, अनुभवलं आहेस. तुझ्या पुत्रांनी खूप कष्ट करून, खूप खस्ता खाऊन तुझी मान अभिमानाने उंचावली आहे, तुझी आन, मान, शान राखली आहे. पण आज काही मी तुझ्या मुलांचं कौतुक करायला हे पत्र नाही लिहिलं. आज मी तुझ्याकडे तुझ्या मुलांची तक्रार घेऊन आलीये. 

    सगळ्यात आधी तर मला हे सांगायचंय की तुझ्या मुलांमध्ये ठळकपणे दोन प्रकार दिसतात. एक म्हणजे ते, जे तुझ्यासाठी जीव द्यायलाही मागे - पुढे बघत नाहीत, आणि दुसरे ते, जे तुझ्यावर थोडासा जीव लावायचा म्हटला तरी "का? मीच का?" असा विचार करतात. एकाच कुटुंबात एवढं वैधर्म्य असतं का गं कधी? बरं, फरक आहे तर आहे, पण यांना एकत्र, गुण्यागोविंदाने राहताच येत नाही! आई तूच शिकवलेस ना, की सगळ्या कुटुंबीयांनी आपापले सगळे भेद विसरून, मिळून - मिसळून राहायचं? मग तुझ्या मुलांना तुझी शिकवण पाळता येत नाही? की त्यांना पाळायची इच्छाच नाहीये? मगाशी मी सांगितलेल्या तुझ्या मुलांच्या पहिल्या प्रकारात तुझ्या रक्षणासाठी, तुझ्या इतर मुलांच्या रक्षणासाठी एक आंतरिक इच्छा दिसून येते. तुझ्या ह्या मुलांनी नेहमी तुला, तुझ्या सेवेला प्राधान्य दिलं आहे, अगदी स्वतःच्या कुटुंबा पेक्षाही जास्त. आणि दुसरीकडे वेगळीच परिस्थिती दिसते, स्वतःच्या पुढे आम्हाला काही दिसतच नाही. आपल्यासाठी आपलेच बांधव मरत आहेत, तरीही आम्हाला फरक नाही पडत. देशात काय चाललंय, कुठे काय घडतंय, याच्याशी आम्हाला काही एक घेणं देणं नाही. "दुसऱ्यांना मरायचं असेल तर मरू दे, मी काही देशासाठी जीव वगैरे देणार नाहीये." अरे कुणीही मागत नाहीये जीव तुमचा! आई तुला खरंच सांगते, अशा लोकांना मला ओरडून सांगावं असं वाटतं की अरे कुणालाही जीव नकोय तुमचा! हवं असेल तर ते फक्त देशप्रेम, देशसेवा, देशनिष्ठा. आणि प्रत्येक वेळेला प्राण पणाला लावलेच पाहिजेत असं काही नाहीये. खरंतर मी म्हणते की देशासाठी मरायच्या आधी देशासाठी जगायला शिका. आपला संपूर्ण जन्म हा देशाला अर्पण करायला शिका. आणि ह्या सगळ्यात परतफेडीची अपेक्षा ठेऊ नका! आई, ही मतांतरे लवकरात लवकर संपायला हवीत. नाहीतर धर्म, जात, पंथ राहतील मागे, आपल्या देशात फूट पडायला ही मतांतरेच पुरेशी होऊन जातील.

     मी अजून काही बोलले तर आई तू खूप दुखावली जाशील. आणि आत्ता मी हे जे काही बोलले त्यासाठीही मला क्षमा कर. मला मनापासून इच्छा नव्हती गं एवढी मोठी तक्रार करण्याची, पण काही इलाज नाहीये. तुझ्यापर्यंत हे पत्र कधी पोहचेल, पोहचेल की नाही, हे मला माहीत नाही. पण मी शेवटी एवढंच म्हणेन की पुढच्या वर्षी असं तक्रार करण्यासाठी मला पत्र लिहायला लागू नये..

 

तुझ्या करोडो मुलांमधली एक मुलगी,

सानिका आपटे.

ReplyForward

 
लेखक: 

2 Comments

  1. avatar

    सुंदर लेख.असे संवेदनशील तरुण या भारतभूमीत असतील तर आपली भारतभूमी निश्चीतपणे खूप प्रगती करेल.अभिनंदन सानिका आपटे.

  2. avatar

    जमलय.

Leave a Response