Primary tabs

मराठी खाद्यसंस्कृती जपणारे मुक्तछंंद किचन

share on:

 मराठी पदार्थ लोकप्रिय करणं, त्यांना ग्लॅमर देणं हा ‘मुक्तछंद किचन’चा मुख्य उद्देश आहे. इतर पदार्थ आवडीने चाखताना आपले मूळ पदार्थही तितक्याच आवडीने खाल्ले जावेत असं सागर दामले यांना प्रामाणिकपणे वाटतं. ‘मुक्तछंद किचन’ येणार्‍या काळात मराठी पदार्थांची स्वतंत्र ओळख निर्माण करण्यात यशस्वी होईल, हे नक्की!

एकदा एका शाळकरी मुलाने आई मंडईत गेलेली असताना कांदे-पोहे आणि मँगो मिल्कशेक करण्याचा घाट घातला. पोहे इतके भिजवले की सगळे एकजीव झाले. मिरच्या घालायला विसरल्याने त्यात लाल तिखट घातलं. एकीकडे एक लीटर दूध गरम करायला ठेवलं, पण धांदलीत ते उतू गेलं. गरम दूध टेबलावर ठेवताना पातेलं हातातून निसटलं. शेगडी, ओटा, फरशी सगळ्यांना दुग्धाभिषेक झाला. कसंबसं साफसूफ करून नंतर पोह्याचा लाल गोळा आणि मँगो मिल्क शेक तयार झाला.

आईने घरी आल्यावर दोन्ही पदार्थ कौतुकाने खाल्ले. ओशट ओटा, शेगडी आणि फरशी मायलेकांनी मिळून स्वच्छ केली. सगळं झाल्यावर रडवेला चेहरा करत मुलगा आईला बिलगला. ओरडा नाही, मार तर मुळीच नाही, ती फक्त म्हणाली की “मी असताना करत जा!” तेव्हापासून तो कुणाच्याही स्वयंपाकाला नावं ठेवत नाही. कारण त्याच्यामागचे त्यांचे कष्ट आणि स्वत:च्या पोह्यांचा लाल गोळा त्याला आठवतो. तो मुलगा म्हणतो, “त्या दिवशी आई रागावली असती किंवा माझ्या करण्याला तिने नावं ठेवली असती, तर आज मी जो कोणी आहे तो कधीच झालो नसतो.”

ठाण्यातील ‘मुक्तछंद किचन’ हा खाद्यव्यवसाय सुरू करणार्‍या सागर दामलेंच्या आयुष्यातील हा प्रसंग, त्यांच्या निर्णयाला बळकटी देणारा ठरला. मूळचे सांगलीचे रहिवासी असणारे सागर एका बहुराष्ट्रीय नामंकित कंपनीतील नोकरीच्या निमित्ताने ठाण्या-मुंबईत आले, तेव्हा त्यांच्या आवडीच्या तीन विषयांचे - फोटोग्राफी, सुलेखन आणि खाद्यक्षेत्र यांचे - वेगवेगळे आयाम दिसू लागले. त्यापैकी पहिल्या दोन गोष्टी छंद म्हणून जोपासायचं ठरवून, रोजी-रोटीचा व्यवसाय म्हणून त्यांनी खाद्यक्षेत्राची निवड केली. त्यासाठी कौटुंबिक पार्श्वभूमीही कारणीभूत ठरली. 

आई गृहिणी, वडील वनस्पतिशास्त्राचे प्राध्यापक. आई-वडील आणि त्यांचे काकाही उत्तम स्वयंपाक करणारे. एकुलत्या एक मुलाला स्वयंपाकासकट घरातील सर्व कामं करता आली पाहिजेत ह्यावर त्यांचा भर होता. सागर सांगतात, “कांदा चिरण्यापासून पिठलं ढवळण्यापर्यंत स्वयंपाकघरातल्या सगळ्या गोष्टी मला आईकडून शिकायला मिळाल्या.”

बारावी पास झाल्यानंतर इंजीनिअरिंग व मेडिकल ह्यातलं काय निवडायचं? त्यांचे आजोबा (आईचे वडील) शंकर लक्ष्मण लेले त्या काळातले इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल अशा दोन्ही क्षेत्रांतले इंजीनिअर आणि गारगोटीच्या मौनी विद्यापीठाचे प्राचार्य होते. ते म्हणाले, “सागरला इंजीनिअरिंगच्या अभ्यासात जी मदत लागेल ती मी करेन.” त्याप्रमाणे अ‍ॅप्लाइड मेकॅनिक्स, स्ट्रेन्थ ऑॅफ मटेरिअल्स आणि थिअरी ऑॅफ मशीन्स हे तीन राक्षस-विषय आजोबांनी शिकवले. भल्याभल्यांना कठीण वाटणार्‍या परीक्षांत सागर प्रथम श्रेणी आणि शेवटच्या वर्षी उच्च योग्यता श्रेणी मिळवून पास झाले.

इंजीनिअर माणसाने कारखानातल्या शॉप-फ्लोअरवर वावरायचं सोडून स्वयंपाकघरात ओट्यासमोर उभं राहून पदार्थांना फोडण्या द्यायच्या म्हणजे किती विचित्र वाटू शकतं ना! पण अशा अनेक व्यक्ती कार्यरत असतात, ज्यांचं शिक्षण आणि ते करत असलेले व्यवसाय यांचा थेट संबंध नसतो. सागर यांनी आपलं कार्यक्षेत्र पूर्णपणे बदलण्यापूर्वी अशा लोकांची माहिती करून घेतली.

ह्या बदलामुळे मित्रपरिवाराच्या व इतर लोकांच्या निरनिराळ्या प्रतिक्रिया त्यांना ऐकायला मिळाल्या. “खाद्यक्षेत्रात शिरून इंजीनिअरिंगची एक अमूल्य सीट तू वाया घालवलीस” असंही म्हटलं गेलं. सागर यांचं त्यावर म्हणणं आहे की “मला इंजीनिअर म्हणून कारखान्यातील काम जमत नाही वा मी इंजीनिअरिंगला कमी लेखतोय असं अजिबात नाही. मी प्रॉडक्शन इंजीनिअर ह्या पदावर 13 वर्षं इंजीनिअरिंगचं सगळं ज्ञान व कौशल्यं वापरली, एका टप्प्यावर प्रशिक्षकाची भूमिकाही पार पाडली. नोकरी सोडली तेव्हा 80 माणसं माझ्या हाताखाली काम करत होती. म्हणजेच, स्वत:ला इंजीनिअर म्हणून सिद्ध करून नंतरच मी त्यातून बाहेर पडलो. नकोसं झालं म्हणून मी ते सोडलं नाही, तर एकमेव आयुष्यात माझ्या आवडीच्या क्षेत्रात काम करण्यासाठी मी एक प्रकारे स्वेच्छानिवृत्तीच घेतली.”

व्यवसाय सुरू करताना त्यांच्या साध्या राहाणीचा आणि अर्थसाक्षरतेचा फायदा झाला. महागडे मोबाइल फोन्स, कपडे, गाड्या अशा गोष्टींच्या मोहात ते अडकले नाहीत. पैशांची सुनियोजित बचत करून व्यवसायासाठी लागणारं भांडवल त्यांना आपलं आपण उभं करणं शक्य झालं.

कारखान्यातल्या नोकरीचा फायदा असा झाला की उत्पादन प्रक्रिया आणि त्याच्याशी संबंधित प्रक्रियांशी थेटपणे कसं भिडायचं ह्याचं सखोल प्रशिक्षण मिळालं. अंतिम उत्पादन उत्तम दर्जाचं व आखलेल्या पद्धतीने आणि नेमून दिलेल्या वेळात पूर्ण करणं अंगवळणी पडलं. त्या वेळी येणार्‍या अडचणी लक्षात घेऊन कामाची आखणी, वेळेचं नियोजन, कच्च्या मालाची व्यवस्था आणि पुरेशी उपलब्धता सांभाळणं, ठरवलेल्या योजनांची काटेकोर अंमलबजावणी करणं अशा महत्त्वाच्या बाबी खाद्यक्षेत्रातही उपयोगी ठरतात.

नोकरी सोडण्याच्या सागर यांच्या निर्णयात सुविद्य पत्नीची, अदितीची संपूर्ण साथ होती, “तुला जे आवडतंय ते तू खुशाल कर, मी नेहमीच तुझ्याबरोबर आहे.” जेव्हा जेव्हा मोकळा वेळ मिळतो, तेव्हा वा जास्त खाद्यपदार्थांची मागणी असते तेव्हाही पहाटे लवकर उठून मदतीसाठी त्या सज्ज असतात. त्यांचे आई-बाबा आणि सासू-सासरे ह्यांचीदेखील सक्रिय साथ मिळते. त्यांचे सासरे उत्तम स्वयंपाकी व पट्टीचे खवय्ये आहेत आणि मुख्य टेस्टरही आहे. त्यांना एखादा पदार्थ आवडला तर सागर खात्रीने सांगू शकतात की तो इतरांनाही आवडणार.

खवय्या-घरातली सागर-अदिती यांची 6 वर्षांची कन्याही जणू त्यांच्या तालमीत तयार होतेय, अशी एक गंमत ह्या मुलाखतीच्या वेळी अनुभवली. थोडा वेळ आमच्या गप्पा ऐकल्यानंतर ती जवळ आली आणि म्हणाली, “तुम्ही खाऊच्या गप्पा मारताय ना, म्हणून हा बघा मी तुमच्यासाठी केक करून आणलाय.” चिकणमातीचा हिरवागार केक तिने केला होता.

दरमहा हुुकमी मिळणार्‍या कमाईवर पाणी सोडण्याआधी नव्या व्यवसायात नक्की काय काय करायचं, ह्याची पूर्वतयारीही सागर यांनी अर्थातच केली. ज्या भागात राहतो, तिथे न मिळणारे पदार्थ कोणते आहेत ह्याचा शोध घेतला. लक्षात आलं की खास मराठी पदार्थ - उदा., पाकातल्या पुर्‍या, खपली गव्हाची खीर, कडबू, लवंग-लतिका (मूळ बंगाली, पण कमलाबाई ओगलेंमुळे महाराष्ट्रातही प्रसिद्ध पावलेली), कुळथाची उसळ वा कुळथाचं कढण, काजूची उसळ, चिकन कोल्हापुरीचा तांबडा वा पांढरा रस्सा, चिकन खिमा, गोळी पुलाव असे पदार्थ सहजी मिळत नाहीत. म्हणून अशा पदार्थांवर त्यांनी लक्ष केंद्रित केलं. आपल्याकडे जी पालेभाज्यांची विविधता आहे, ती रोजच्या जेवणात कशी समाविष्ट करता येईल हादेखील त्यांच्या अभ्यासाचा भाग आहे. उदा. शेपू आणि भोपळ्याचा पाला अशी मिश्र भाजी, राजगिर्‍याच्या पाल्याची भाजी.

त्याचप्रमाणे, भटकंतीचीही आवड असल्याने जळगाव, सोलापूर, कोल्हापूर, वेंगुर्ला, कोकण अशा ठिकाणी जाऊन वाड्या-पाड्यांना भेटी देत तिकडचे खास पदार्थ तिथल्या रहिवाशांकडून थेट शिकून घेतले. हे करताना एक वैशिष्ट्य लक्षात आलं की ज्या-त्या पदार्थात आलं-लसणीच्या पेस्टचा वापर न करता मूळ पदार्थाचा स्वाद टिकून राहण्यातच खरी गंमत आहे.

मराठी पदार्थ लोकप्रिय करणं, त्यांना ग्लॅमर देणं हा ‘मुक्तछंद किचन’चा मुख्य उद्देश आहे. इतर पदार्थ आवडीने चाखताना आपले मूळ पदार्थही तितक्याच आवडीने खाल्ले जावेत असं त्यांना प्रामाणिकपणे वाटतं. पदार्थ बनवून, वितरणासाठी त्यांनी स्वत:च जायला सुरुवात केल्याने ग्रहकांशी प्रत्यक्ष ओळख होऊन त्यांचा प्रतिसाद थेट आजमावणं शक्य होतं. सागर म्हणतात, “आजची मुलं आपल्यापेक्षा जास्त मोकळी, चौकस, नवनवीन पदार्थांचा आस्वाद घेणारी वाटतात. ग्लोबल फूड तसेच आपली मुळं असलेले पदार्थही त्यांनी आवडीने खाल्ले पाहिजेत

लग्नकार्यासारख्या समारंभांत पंजाबी, चाट, दाक्षिणात्य, चायनीज अशा पदार्थांचे वेगळे काउंटर्स असतात. मराठी खाद्यपदार्थांचा मात्र कधीच नसतो. खानदेशी मांडे, उकडीचे मोदक, पुरणाचे कडबू, वाटली डाळ अशा पदार्थांचा समावेश तिथे व्हावा आणि इतर लोकांना मराठी पदार्थांची ओळख व्हावी, त्यांची गोडी लागावी यासाठीचे प्रयत्न आपणच केले पाहिजेत.”

‘मुक्तछंद किचन’चा पुढचा बेत म्हणजे घाऊक प्रमाणात त्यांना हा व्यवसाय पुढे न्यायचा आहे. सागर म्हणतात, “एकाच ठिकाणी सर्व पदार्थ बनतील आणि ठाणे, पुणे अशा ठिकाणी त्यांचे आउटलेटस असतील.” ह्या ‘स्टार्ट-अप’साठी आवश्यक असणारे निरनिराळे परवाने घेण्यासारख्या कायदेशीर बाबींच्या पूर्ततेलाही त्यांनी सुरुवात केली आहे. ब्रँड, लोगो, टॅग-लाइन अशा आजच्या काळातील आवश्यक गोष्टींचा वापर आत्तापासूनच सुरू केला आहे.

सागर सांगतात, “जसजसा व्यवसाय वाढेल, तसतसं मला मनुष्यबळही वाढवावं लागेल. इंजीनिअरिंगची जशी तंत्रं-कौशल्यं असतात, तशी ती स्वयंपाकघरातल्या कामांचीही असतात. अगदी साधं उदाहरण म्हणजे कांदा चिरणं. इंजीनिअरिंगच्या आयटीआयप्रमाणे काही संस्था स्वयंपाकघरातील तंत्रं-कौशल्यं शिकवतात. तिथल्या प्रशिक्षित मुलांची मदत घेता येईल, जेणेकरून त्यांनाही अनुभव मिळेल व रोजगाराच्या संधी अनायसे उपलब्ध होतील.”

‘मुक्तछंद किचन’ येणार्‍या काळात मराठी पदार्थांची स्वतंत्र ओळख निर्माण करण्यात यशस्वी होईल, हे नक्की!

चित्रा राजेंद्र जोशी  

 

लेखक: 

No comment

Leave a Response