Primary tabs

‘लेथ जोशी’ : कालबाह्यतेचं सावट

share on:

आपल्याला आवडणारी गोष्ट उराशी कवटाळून बसण्याचा स्वभाव तसा सार्वत्रिकच. काही जण काळ पुढे सरकतो तसतसे पूर्वी घट्ट धरून ठेवलेल्या वस्तू, आठवणी, समजुती, धारणा सोडून देऊन नवीन काहीतरी पकडायला धावतात. पण सगळ्यांनाच हे जमत नाही. काही जण जातील तिथे आपलं एक जुनं गाठोडं घेऊन जातात. त्यांना मान्य करायचं नसतं. त्याचा स्पर्शच त्यांना हवाहवासा वाटत असतो. पण काळ क्रूर असतो, तो थोडाच कुणासाठी थांबणार असतो? या साचून राहिलेल्या माणसांना तो ढकलत ढकलत एका काळ्याकभिन्न दरीच्या मुखाशी आणून ठेवतो....

प्रॉब्लेम हा असतो की त्यांना याचाही पत्ता नसतो…

‘लेथ जोशी’ ही अशीच काळाबरोबर जाऊ न शकणारी वृत्ती आहे.

३५ वर्ष एका वर्कशॉपमध्ये लेथमशीनवर अगदी जीव ओतून काम करणाऱ्या विजय जोशींना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना एके दिवशी अचानक वर्कशॉप बंद होत असल्याचं सांगण्यात येतं. इतकी वर्ष जोशींचं विश्व लेथ मशीनभोवतीच घुटमळत असतं. बाहेरच्या जगात काय उलथापालथ चाललीये, काळाचा रेटा काय आहे या गोष्टी त्यांनी जाणून घ्यायचा प्रयत्नच केलेला नसतो. त्यांना ना घरचा रिमोट धड वापरता येतो, ना मोबाईल वापरायची इच्छा होते. ऑटोमेशनच्या या नव्या जगात लेथ मशीनही जवळपास इतिहासजमा झालंय. मग जोशींनी काम करायचं कुठलं? मन गुंतवायचं कुठे? नव्या जगाबद्दल संपूर्ण अनभिज्ञ असणाऱ्या जोशींना त्या जगाच्या सुरात सूर मिळवणं जमतच नाही. मुलगा मोबाईल, कंप्यूटर रिपेअर करण्यात निष्णात आहे तर बायको स्वयंपाकात. दोघांनीही आपापले व्यवसाय चालवले आहेत आणि मुख्य म्हणजे काळासोबत होणारे बदल त्यांनी व्यवसायात अंगिकारले आहेत.

चित्रपटाच्या सुरुवातीला पुरणपोळ्या वगैरे पारंपरिक स्वयंपाकाच्या ऑर्डर्स घेणाऱ्या सौ. जोशी नंतर फूड चॅनेलवर कॉन्टिनेन्टल पदार्थ पाहताना, चायनीजची ऑर्डर घेतलेल्या दिसतात. सारखी सारखी घरातल्यांवर करवादणारी आज्जीसुद्धा नातवाने हॉटेलात नेल्यावर, नव्या कारमधून फिरवल्यावर खुश होते, पण जोशींना यातल्या कशाचाही आनंदच घेता येत नाही. जगण्याच्या शर्यतीत ते फार मागे पडलेले असतात. त्यांच्या कुटुंबातही त्यांचं बिनमहत्वाचं असणं, त्यांची नोकरी गेल्यावरही घराला आर्थिकदृष्ट्या फारसा काहीच फरक न पडणं हे उत्तरोत्तर जास्तच ठळक होत जातं.

चित्रपटाला कथानक म्हणावं असं फारसं नाहीच. जेव्हा अशी परिस्थिती असते, तेव्हा प्रेक्षकाला गुंतवून ठेवण्यासाठी संवाद फार कळीचे असतात. 'लेथ जोशी'मध्ये संवादाचाही फार मोठा वाटा नाही. पण मग असं काय आहे की, चित्रपट खिळवून ठेवतो? याचं उत्तर आहे पटकथा! घटना फार घडत नसल्या तरी पटकथा काळाच्या बदलाचं प्रतिबिंब फार प्रभावीपणे दाखवते. प्रत्येक प्रसंगात काळाच्या वेगवान प्रवाहाचे संदर्भ आहेत. नव्याजुन्यांचं द्वंद्व आहे. असं असलं तरी दिग्दर्शक मंगेश जोशी यांच्या संयत हाताळणीमुळे या द्वंद्वात कुठेही कर्कश्शपणा येत नाही. लयाला जाणाऱ्या गोष्टींबद्दल, माणसांबद्दल ओलावा जरूर आहे पण उमाळे नाहीत. सगळं कसं 'मॅटर ऑफ फॅक्ट' पद्धतीने दाखवलं आहे. चित्रपटाचा आशय गंभीर असला तरीही चित्रपट मात्र अथवा अतिगंभीर वा उदासवाणा नाही. आजी आणि नातू यांच्या संवादांमधून वातावरण हलकंफुलकं राहील याचीही काळजी दिग्दर्शकाने घेतली आहे.

बदलाचा वेग प्रचंड असला तरी चित्रपटाचा ओघ मात्र स्वाभाविकपणे आहे, कारण हा चित्रपट भौतिक प्रगतीच्या वेगाशी स्पर्धा न करू शकणाऱ्या व्यक्तीवरचा आहे. शीर्षक भूमिका करणारे चित्तरंजन गिरी यांचा या भूमिकेसाठीचा लुक एकदम परफेक्ट आहे. चित्रपटाचा बहुतांश भाग त्यांच्या चेहऱ्यावर हरवल्याचे भाव आहेत, जे स्वाभाविक आहे. परंतु संवादफेकीत मात्र ते काहीसे कमी पडतात. त्यांच्या कुटुंबीयांची भूमिका करणारे अश्विनी गिरी, ओम भुतकर आणि आजी झालेल्या सेवा चौहान हे अन्य कलाकार छाप पडून जातात.

चित्रपटातल्या काही फ्रेम्स लक्षात राहणाऱ्या आहेत(छायांकन : सत्यजित श्रीराम). आजी, वडील आणि मुलगा या तीन पिढ्यांचा संवाद एकाच खोलीच्या ३ वेगवेगळ्या खिडक्यांमधून दाखवण्याची कल्पकता वाखाणण्याजोगी आहे. चित्रीकरण स्थळं ही विचारपूर्वक निवडलेली आहेत. उदा. जोशी राहात असलेला वाडा त्यांच्यासारखाच बदलांपासून लांब असलेला आहे. वेगवेगळी वर्कशॉप्स, त्यातून दिसणारं यंत्रवैविध्यं, बदलत्या काळाचं त्यात दिसणारं प्रतिबिंब या गोष्टी चित्रपटाचा आशय ठसवायला मदत करतात. ध्वनीचा वापरही लक्षवेधी आहे (ध्वनी आरेखन : पियुष झा). पहिल्याच प्रसंगात ते जाणवतं. सुरुवातीला एकही आवाज नाही आणि ज्या क्षणी जोशी लेथमशीन सुरू करतात तेव्हा एकदम यंत्रासह आजूबाजूचे अन्यही आवाज खाट्कन चालू होतात. पुढे वर्कशॉप बंद होणार हे कामगारांना कळल्यानंतरच्या प्रसंगात आणि शेवटच्या प्रसंगात भंगारवाला ओरडण्याचा आवाज तर अगदी सिक्सरच! सारंग कुलकर्णी यांचं पार्श्वसंगीत अगदी मोजकं आणि नेमकं आहे. चित्रपट संपतो तेव्हा ऐकू येणारे सरोदाचे स्वर आपल्याला चित्रपटगृहाच्या बाहेर आल्यावरही सोबत करतात.

हा चित्रपट म्हणजे काळासोबत बदललं नाही, तर काय होईल याचा आरसा आहे. बदलांची धग क्रूर आहे. तुम्ही काळाच्या प्रवाहात उडी न घेता कोरडे राहिलात, तर तुम्हाला ती धग वेढणारच. मग तुम्ही कामात पाट्या टाकणारे आहेत, की कामाकडेही कला म्हणून बघणारे आहात हे ती बघत नाही. चित्रपटाच्या शेवटाकडे जोशी जेव्हा आपल्या वर्कशॉपच्या मृत्युशय्येवर असलेल्या मालकाला भेटायला जातात तेव्हा मालक त्यांच्या बायकोला म्हणतात “हे लेथ जोशी… कलाकार आहेत कलाकार…” ऐकताना आत कुठेतरी हलल्यासारखं होतं. रुटीन काम असूनही लेथ मशीनवर एवढं प्रेम करणारा आणि त्यावर बनवल्या जाणाऱ्या जॉब्जवर जणू कलाकुसर करण्याची भावना बाळगणारा माणूस कालबाह्य होतोय हे पाहून वाईट वाटून घ्यायचं, की अद्ययावत न झाल्याबद्दल त्याला नावं ठेवायची अशी द्विधा मनस्थिती करून जाणारा हा क्षण... तांत्रिक बदलांची अपरिहार्यता अधोरेखित करणं आणि तरीही कथानकाला असणारा मानवी स्पर्श कुठेही कमी होऊ न देणं हे या चित्रपटाचं मोठं यश आहे. जोशींची घालमेल पाहताना 'व्यक्ती आणि वल्ली'मधल्या नारायणाच्या झोपलेल्या मुलाची आठवण आली. झोपेतही त्याने मुठीत धरून ठेवलेला लाडू काळवंडलेला असतो... लेथ जोशींचंही फारसं वेगळं नाहीये. हातातलं सोडवतही नाहीये आणि ते आता आस्वाद घेण्याच्या परिस्थितीतही राहिलेलं नाहीये... आता सावट आहे अंधाराचं …

टोकाच्या भावना उद्दीपित न करता, कुठलेही 'क्लिशे' न दाखवता विचारप्रवण करायला लावणारे चित्रपट फार कमी असतात. म्हणूनच 'लेथ जोशी' चुकवू नये...

- प्रसाद फाटक

content@yuvavivek.com

 

 

लेखक: 

No comment

Leave a Response