Primary tabs

 क्रांतिकारी USB तंत्रज्ञान

share on:

कॉम्प्यूटर प्रणालीत हार्डवेअर जोडणी संबंधात आज आपल्याला जी सहजता दिसते, ती केवळ USB तंत्रज्ञानामुळे आज शक्य झाली आहे. त्यामुळे याच्याविषयी तपशीलात जाणून घेऊ या...

कदाचित तुम्ही त्या काळाबद्दल अनभिज्ञ असाल, जेव्हा कॉम्प्युटर हार्डवेअर जोडणी म्हणजे एक मोठे आणि कठीण काम असे. मोठमोठी हार्डवेअर जोडणी ही एखाद्या टेक्निशियनवाचून तुलनेने कठीण होती. आत्तासारखी 'प्लग ऍंड प्ले'ची सुविधा तेव्हा अस्तित्वात नव्हती. सी.पी.यू.ला प्रत्येक हार्डवेअर जोडण्यासाठी सिरिअल पोर्ट, पॅरलल पोर्ट तसेच पॉवर चार्जेस यांची जोडणी, त्यासाठी लागणारे ड्रायव्हर्स या सर्वांचा सेट-अप करता दमछाक होत असत. आजच्यासारखे सहज आणि सोपे नव्हते. आणि म्हणूनच USB तंत्रज्ञानाचे महत्त्व विशद करणे आवश्यक होऊन जाते. कॉम्प्यूटर प्रणालीत हार्डवेअर जोडणी संबंधात आज आपल्याला जी सहजता दिसते, ती केवळ USB तंत्रज्ञानामुळे आज शक्य झाली आहे. त्यामुळे याच्याविषयी तपशीलात जाणून घेऊ या.

काय आहे USB?

USB अर्थात 'युनिव्हर्सल सिरियल बस' असे याचे पूर्ण नाव आहे. १९९०च्या दशकात USB इम्प्लिमेंटर फोरमद्वारे हे तंत्रज्ञान विकसित केले गेले आहे. १९९०च्या काळात की-बोर्डची अथवा माउसची जोडणी करायची असेल, तर  PS/२ किंवा सिरियल पोर्ट असणे आवश्यक होते. प्रिंटर किंवा स्कॅनर जोडण्यासाठी मोठे पॅरलल पोर्ट असावे लागत, कॉम्प्युटर गेम खेळण्यासाठी त्यातील जॉय स्टिकची जोडणी करण्यासाठी गेम पोर्ट वेगळा इन्स्टॉल करावा लागत होता. USB तंत्रज्ञान विकसित झाल्यामुळे या सर्व पोर्ट्सची आवश्यकता संपली. सर्व हार्डवेअर उपकरणांसाठी एकच पोर्ट आवश्यक ठरले. त्यामुळे प्रत्येक उपकरणाची गती (स्पीड)देखील वाढायला मदत झाली, परिणामी कॉम्प्युटर प्रणाली अधिक सहज, सोपी आणि गतिशील बनली.

USB जनरेशन

वेगवेगळया काळात या USB तंत्रज्ञानातदेखील बदल होत गेले आहेत. १९९४ साली आय.बी.एम., इंटेल, एच.पी, ऍपल, मायक्रोसॉफ्ट या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींनी एकत्र येऊन USB इम्प्लिमेंटर फोरमची स्थापना केली. मूळ भारतीय असलेल्या अजय भट्ट यांच्याकडे त्या वेळी या फोरमचे नेतृत्व सोपविले गेले होते. अजय भट्ट यांच्या मार्गदर्शनाखाली १९९५ साली USBचे संशोधन झाले, ही सर्व भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे. पहिले USB पोर्ट हे की-बोर्ड, माउस, प्रिंटर, स्कॅनर यांसाठी विकसित केले गेले. त्याची गती 1.5 ते 12 एम.बी.पी.एस. एवढी होती.

साल 2000च्या मध्यात USB 2.0 विकसित केले गेले. याची गती पहिल्या जनरेशनपेक्षा अधिक होती, त्याचबरोबर क्षमतादेखील प्रचंड मोठी होती. यात USB फ्लॅश ड्राइव्ह अर्थात पेन ड्राइव्ह बाजारपेठेत आणले गेले, ज्यामुळे सी.डी.ची, डी.व्ही.डी.ची आवश्यकता संपुष्टात आली, तसेच गतीदेखील वाढायला मदत झाली. USB 2.0ची गती 480 एम.बी.पी.एस. एवढी होती. यात वाय-फाय, इथरनेट यासारख्या उपकरणांचादेखील समावेश झाला.

2008 साली USB 3.0 बाजारपेठेत आले, त्याला 5 जी.बी.पी.एस. एवढी प्रचंड क्षमता असलेली गती देण्यात आली. त्यामुळे USBची मागणीदेखील मोठया प्रमाणात वाढू लागली.

USBमुळे कॉम्प्युटर प्रणालीने कात टाकून गती पकडली आहे. त्यामुळे अनेक उपकरणांचीदेखील उत्पत्ती झाली आहे. आज कॉम्प्युटरच्या सहजतेमुळे त्याचा वाढता वापर होऊ शकला आहे. आणि मला वाटते यात USB तंत्रज्ञानाचा सिंहाचा वाटा आहे.

- हर्षल कंसारा

content@yuvavivek.com 

 

लेखक: 

No comment

Leave a Response