Primary tabs

खड्डेमुक्तीचा मार्ग दाखविणारा अभियंता

share on:

मुंबईकरांची रस्त्यांवरील खड्ड्यांपासून सुटका होण्यासाठी मुंबई महापालिकेचे साहाय्यक अभियंता डॉ. विशाल ठोंबरे यांनी ‘अल्ट्रा थिन व्हाइट टॉपिंगसंशोधन केले असून त्यामुळे २० वर्षे रस्ते खड्डेमुक्त राहतील.

मुंबईतील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघात होण्याच्या घटना नियमितपणे घडत असतात. त्यामध्ये अनेकांचा नाहक बळी जातो. या खड्ड्यांवरुन पालिकेवर टीकेची झोडही उठवली जाते. मग वंडरपॅच, मिडास टच, मास्टिक, कधी हॉटमिक्स, तर कधी कोल्डमिक्स आदी प्रयोग केले जातात. त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्चही केले जातात. पण, खड्डे ‘जैसे थे’च राहतात. असे असताना टिकाऊ आणि मजबूत रस्तेबांधणीचा मार्ग पालिका अभियंता डॉ. विशाल ठोंबरे यांनी शोधून काढला.

धुळ्याच्या विशाल यांनी मुंबईतील व्हिजेटीआयमधून ‘कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट’ या विषयाचे पदव्युत्तर शिक्षण घेतले. व्हिजेटीआयमध्ये असताना ‘अल्ट्रा थिन व्हाइट टॉपिंग’ या विषयावर त्यांनी प्रकल्प सादर केला होता. पुढे त्याच विषयावर त्यांनी पीएच.डी केली. तेच तंत्रज्ञान त्यांनी मुंबईतील डांबरी आणि काँक्रिटच्या रस्तेबांधणीसाठी वापरले आहे. ठोंबरे हे १९९४ ते १९९७ अशी तीन वर्षे एका खाजगी कंपनीत कार्यरत होते. आपल्या ज्ञानाचा उपयोग मुंबई शहराला व्हावा, यासाठी चांगल्या पगाराची नोकरी सोडून ते १९९७ साली मुंबई महापालिकेत कनिष्ठ अभियंता म्हणून रुजू झाले. कनिष्ठ अभियंता पदापासून ते साहाय्यक अभियंता असा त्यांचा प्रवास सुरू आहे. सध्या ते पालिकेच्या ‘कोस्टल रोड’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी काम करत आहेत.

मुंबईत डांबरी रस्ते बांधले जात होते. परंतु, पाऊस पडल्यानंतर पुन्हा त्या रस्त्यांवर खड्डे पडायचे. त्यानंतर क्राँक्रिटचे रस्ते पाच ते सात वर्षे टिकतील, असे पालिकेने सांगितले. परंतु, दोनच वर्षांत त्यांची चाळण झाली. मग ठोंबरेंनी विकसित केलेले ‘अल्ट्रा थिन व्हाइट टॉपिंग’ हे नवे तंत्रज्ञान खड्डे बुजवण्यासाठी वापरायचे ठरले. ते पर्यावरणपूरकही आहे. रस्ता बांधल्यानंतर त्यावर पुढची २० वर्षे तरी ओरखडा उमटणार नाही. ठोंबरे यांनी विकसित केलेल्या ‘अल्ट्रा थिन व्हाइट टॉपिंग’चा १२ सेमीचा थर डांबरी रस्त्यावर देऊन त्याचे पुष्टीकरण(क्युरिंग) २४ ते ७२ तास केल्यावर रस्ता रहदारीसाठी सुरू करता येतो. एरवी जर या रस्त्याचे काँक्रिटीकरण केले, तर ३० सेमीचा थर द्यावा लागला असता आणि पुष्टीकरणासाठी २८ दिवस लागले असते. ठोंबरे यांच्या तंत्रज्ञानामुळे फक्त तीन दिवसांत रस्ता बनवला जातो हे वैशिष्ट्य आहे.

ठोंबरे यांचे हे तंत्रज्ञान ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, चेन्नई, बंगळुरू, दिल्ली, गाजियाबाद, जयपूर, हैद्राबाद महापालिका व विविध सरकारी यंत्रणा सध्या वापरत आहेत. देशभरात रस्तेबांधणीचे नियम ठरवणार्‍या इंडियन रोड काँग्रेसच्या मानकांनुसार ठोंबरे यांनी हे तंत्रज्ञान बनवले आहे. पारंपरिक पद्धतीने रस्ता बनवताना त्याचे खोदकाम केले जाते. तसेच भूपृष्ठावरचा टणक थर खोदून काढला जात होता. ठोंबरे या तंत्रज्ञानात रस्त्यावरून गाड्यांच्या वाहतुकीमुळे टणक झालेल्या पृष्ठभागाचा वापर करतात. रस्त्याचे भूपृष्ठ १०० ते १५० मिमी खरवडून काढल्यानंतर ‘अल्ट्रा थिन व्हाइट टॉपिंग’मध्ये ‘एम-६०’ हे काँक्रिट टाकून फक्त सहा दिवस पाण्याचा मारा देऊन रस्ता सुकवला जातो. सुकवण्याचे हे काम खरेतर तीन दिवसांत होऊ शकते. मात्र, मुंबईत जडवाहतूक तसेच काही तासांत हजारो वाहनांची वर्दळ असल्याने रस्त्याला बळकटी आणण्यासाठी आणखी चार दिवस अशा एकूण सात दिवसांत एक रस्ता ठोंबरे यांच्या तंत्रज्ञानाने पूर्ण होतो. त्यानंतर वाहतुकीसाठी हा रस्ता खुला केला जातो. मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळ कॅपिटल, स्टर्लिंग चित्रपटगृह, टाइम्स ऑफ इंडिया बिल्डिंगशेजारचा रस्ता, कुलाब्याला ताजमहाल हॉटेल, मुलुंडचा गणेश गावडे रोड, व्ही. पी. रोड यासह मुंबईतील पन्नासहून अधिक रस्ते याच तंत्रज्ञानाने बनवले गेले आहेत. या रस्तेबांधणीसाठी काँक्रिटचा वापर केला जातोच, शिवाय थर्मल पॉवर प्लांटमधून फेकून दिलेली राखदेखील प्रक्रिया करून वापरली जाते. तसेच मायक्रो सिलिका व फायबर वापरले जाते. त्यामुळे रस्त्यांना खड्डे व ओरखडे पडत नाहीत,असे ठोंबरे सांगतात. या तंत्रज्ञानामुळे पालिकेचा वेळ, श्रम व पैसा मिळून ३० टक्के बचत होते. या रस्त्यांचे आयुर्मान १५ ते २० वर्षे असून त्याच्या देखभालीवर पालिकेला खर्च करावा लागत नाही.

ठोंबरे यांच्या ‘अल्ट्रा थिन व्हाइट टॉपिंग’चा पहिला प्रयोग पालिकेने सन २००६ मध्ये चेंबूर येथील आरसी मार्ग व माहुल रोड येथे केला. या भागात रासायनिक कारखान्यांमध्ये ट्रक, टेम्पो, ट्रेलर येत असल्याने तसेच मुंबईच्या बाहेरून जड वाहने येण्याचे प्रमाण जास्त असल्याने हे रस्ते वारंवार उखडले जात होते. ठोंबरे यांच्या तंत्रज्ञानाने बनवलेले हे दोन्ही रस्ते आजही सुस्थितीत आहेत. प्रायोगिक तत्त्वावर केलेल्या या कामाची दखल घेऊन पालिकेने हे तंत्रज्ञान नंतर मुंबईभर राबवले. विशेष म्हणजे, इंडियन रोड काँग्रेसने ‘व्हाइट टॉपिंग’चा कोड २००८ मध्ये प्रसिद्ध केला. त्याच्या दोन वर्षे आधीच ठोंबरे यांनी तो अंमलात आणून रस्तेबांधणीत आपल्या कामाचा आदर्श उभा केला आहे. रोड काँग्रेसच्या समितीत ठोंबरे हे एक सदस्य होते. त्यांच्या ज्ञानाचा उपयोग प्राधिकरणाने केला, याची आवर्जून नोंद पालिकेने घेतली आहे. 

- नितीन जगताप

content@yuvavivek.com

 

लेखक: 

No comment

Leave a Response