Primary tabs

काव्याचे जादुगार : मिर्झा गालिब

share on:

"ज़रा कर जोर सीने पर की तीर -ऐ-पुरसितम् निकले जो,

वो निकले तो दिल निकले, जो दिल निकले तो दम निकले"

अशा उर्दू आणि फारसी कवितांनी आणि शायरीने असंख्य रसिकांना भुरळ पडणाऱ्या मिर्झा असदुल्लाखान गालिब यांचा आज जन्मदिवस. ते सुधारक वृत्तीचे, सर्व धर्मांना समान मानणारे, नमाज न पडणारे, रोजा न ठेवणारे, कलेचे आसक्त, रसिक व्यक्ती होते.

मिर्झा गालिब यांचा जन्म २७ डिसेंबर १७९७ रोजी आग्र्यातील काळा महालमध्ये झाला. तेव्हा भारतात मुघलांचे राज्य होते. मिर्झा गालिब हे थोरल्या पेशव्यांची पत्नी मस्तानी यांच्या वंशात जन्माला आले होते. ते चार वर्षाचे असतानाच त्यांचे वडील वारले, त्यामुळे त्यांचा सांभाळ त्यांचे काका आणि आजोबा यांनी केला.

आपल्या साहित्यातून त्यांनी जीवनाविषयीचे गंभीर तत्वज्ञान मांडले आहे. आयुष्यात मिळालेले कटू अनुभव आणि समस्या देखील त्यांनी शब्दबद्ध करून शायरीच्या रुपात रसिकांपर्यंत पोहोचवल्या. त्यांनी ११व्या वर्षापासून त्यांनी शायरी लिहायला सुरुवात केली. ते लहान असतानाच त्यांनी फारसी भाषेचे धडे घेतले होते. त्यांनी फारशी भाषेत १८००० पेक्षा जास्त शेर लिहिले आहेत. मित्राच्या आग्रहाखातर त्यांनी यापैकीच १०००-१२०० शेर हे उर्दू भाषेत लिहिले. गालिब यांना प्रसिद्धीचा हव्यास कधीच नव्हता, कारण ते म्हणत, 'माझ्या  कविता माझ्या मृत्यूनंतरही अजरामर राहणार असल्याने माझे नाव आपोआपच सर्वत्र पसरणार आहे.'

मिर्झा गालिब यांच्या कवितांवर मीर आणि खुसरो यांच्या रचनांचा प्रभाव होता. आपल्या काव्यातून गालिबने परंपरेला नाविन्याची झालर लावली. अभिजात सौंदर्याची बूज राखायला शिकवले. त्यांच्या घराण्याला सैनिकी पार्श्वभूमी असल्याने गालिबदेखील बंडखोर होतो.

मिर्झा गालिब यांच्या काव्यातील काही सुप्रसिद्ध काव्यपंक्ती : 

  • काबां किस नूर से जाओगे गालिब, शर्म तुमको मगर नहीं आती
  • दिल-ए-नादाँ तुझे हुआँ क्या आखि़र इस दर्द की दवा क्या है
  • नुक्ताचीं है ग़म-ए-दिल उस को सुनाये न बने
  • ये न थी हमारी किस्मत कि विसाल-ए-यार होता
  • हजारो ख्वाईशें ऐसी के हर ख्वाईश पे दम निकलें
  • हैं और भी दुनियामें सुखन-वर बहुत अच्छे, कहते हैं कि गालिब का अंदाज-ए-बयाँ और

मिर्झा गालिब यांच्यावर हिंदीत दोन चित्रपट निघाले. पहिला १९५४ साली तर दूरचित्रवाणीसाठी १९८८ साली दुसरा चित्रपट बनवला. या चित्रपटाचे दिग्दर्शक गुलझार हे होते. सेतू माधव पगडी, वसंत पोतदार आणि विद्याधर गोखले या मराठी लेखकांनी गालिबच्या कवितांचा परिचय करून दिला आहे तर डॉ. अक्षयकुमार काळे यांनी 'गालिबचे उर्दू काव्यविश्व : अर्थ आणि भाष्य' हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथात त्यांनी शब्दांचे अर्थदेखील दिले आहेत, जेणेकरून वाचकांना अवघड शब्दांचे अर्थ कळतील. या ग्रंथासाठी त्यांनी बरीच मेहनत घेतली आहे. १५ फेब्रुवारी १८६९ रोजी दिल्लीतील चांदणी चौक भागातील गली कासिम जान येथे त्यांचे निधन झाले. मिर्झा गालिब आणि गुलजार यांचे अनोखे नाते होते. गुलजार यांनी गालिब यांचे चरित्र लिहिले असून त्याचा मराठी अनुवाद अंबरीश मिश्र यांनी केला आहे.

- युवाविवेक

content@yuvavivek.com

 

 

 

 

 

 

 

लेखक: 

No comment

Leave a Response