Primary tabs

जलतरण‘वीर’

share on:

आज १४ नोव्हेंबर. हा दिवस बालदिन म्हणून भारतात साजरा केला जातो. त्यामुळे बालकांसाठी प्रेरणादायी ठरेल, असा जागतिक कीर्तीचा जलतरणपटू वीरधवल खाडेचा एकूणच जीवनप्रवास... लहानपणी पोहण्याची आवड नसणारा वीरधवल आज एकदम माशासारखा पाण्यात लीलया सूर मारतो. त्याच्या वडिलांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे आणि मेहनतीमुळे वीरधवलला आज आंतरराष्ट्रीय पातळीवरही जलतरणमध्ये अगदी मानाचे स्थान प्राप्त झाले आहे. तेव्हा, आज बालदिनानिमित्ताने वीरधवल खाडेची ही प्रवाही कहाणी...

आता कोणाला सांगितलं तर खरचं आश्चर्य वाटेल पण, वीरधवलला लहानपणी जलतरणात मुळीच रस नव्हता. परंतु, वडिलांच्या आग्रहाखातर वीरधवलने पोहण्याचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली आणि त्याच्या आयुष्याला कलाटणीच मिळाली. प्रशिक्षकांनीही वीरधवलची जलतरणातील प्रगती पाहून त्याचे प्रशिक्षण पुढे सुरूच ठेवण्याचा सल्ला दिला. वीरधवल आणि त्याच्या वडिलांनीही मग जलतरणाला गांभीर्याने घेतले आणि आज जागतिक स्तरावर एक यशस्वी जलतरणपटू म्हणून वीरधवलने आपली ओळख सिद्ध केली आहे. वीरधवल सध्या महाराष्ट्र शासनाच्या प्रशासकीय सेवेत असून तो मालवण येथे तहसीलदार म्हणून कार्यरत आहे. त्याने यापूर्वी ऑलिम्पिक जलतरण स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केले होते. २००६ साली सहा सुवर्णपदकांसह पाच राष्ट्रीय विक्रमांचीही नोंद वीरधवलच्या नावावर आहे. त्याने देशासाठी केलेल्या या ‘सुवर्ण’ कामगिरीची दखल घेत २०१० साली ‘अर्जुन’ पुरस्काराने वीरधवलला सन्मानित करण्यात आले.

वीरधवलचे वडील एक बास्केटबॉल खेळाडू. त्यामुळे जात्याच घरात क्रीडामय वातावरण. वीरधवलच्या वडिलांनी पोहण्यासाठी त्याला कोल्हापूरच्या एका उन्हाळी शिबिराला पाठवले. सुरुवातीला पोहण्यासाठी नाकं मुरडणाऱ्या वीरधवलच्या अंगी मात्र प्रशिक्षकांना विशेष गुण आढळले. प्रशिक्षकांनीही वीरधवलच्या वडिलांना त्यांचे पोहणे सुरूच ठेवण्याचा सल्ला दिला. वीरधवलने १९९५ साली पोहणे सुरू केले आणि पुढच्याच वर्षी १९९६ साली तो पहिली जलतरण स्पर्धाही जिंकून मोकळा झाला. त्यानंतर मात्र वीरधवलने कधीही मागे वळून पाहिले नाही. त्याच्यामध्येही जिंकण्याची एक आवड, ऊर्मी निर्माण झाली आणि मग एकामागोमाग एक तो जलतरण स्पर्धांच्या विजेतेपदावर आपले नाव कोरतच गेला. वीरधवलने तालुका, जिल्हा, राज्य, राष्ट्रीय स्तरांवरही अशीच अनेक पदके खिशात घातली. जलतरण स्पर्धेविषयी सांगताना वीरधवल सांगतो की, “मी ज्या ५० मीटर फ्री स्टाईल गटात पोहतो, त्यासाठी रोज सात ते आठ तास सराव करावा लागायचा. सुरुवातीला असे कोणी आदर्श डोळ्यांसमोर नव्हते, पण पोहण्यात अमेरिकेच्या मायकल फ्लेप्सने अनेक विक्रम केले आहेत आणि म्हणूनच मी त्याला आदर्श मानतो,”असे वीरधवल सांगतो.

पण, वीरधवलचा आजवरचा प्रवास वाटतो तितका सोपा निश्चितच नव्हता. जलतरणासाठी वडिलांचे संपूर्ण पाठबळ असले तरी, आर्थिक चणचण होतीच. घरची आर्थिक परिस्थिती अगदी बेताची असल्यामुळे स्पर्धेला जाण्याइतपत पैसेही वीरधवलच्या खिशात नसायचे. एवढचे काय, तर पोहण्यासाठी आवश्यक सामग्रीही वीरधवलच्या नशिबी नव्हती. जलतरण असो अथवा अन्य क्रीडाप्रकार, बरेचदा केवळ आणि केवळ आर्थिक विवंचनेपोटी या खेळाडूंना क्रीडासाहित्याची खरेदी करता येत नाही. स्पॉन्सर्रसही सहजासहजी मिळत नाहीत. पण, वीरधवलचे नशीब बलवत्तर म्हणून ‘स्पीडो’ त्याच्या मदतीला धावून आली. जलतरणपटूंसाठी खास स्विमसूट्स तयार करणाऱ्या ‘स्पीडो’ने वीरधवलसह इतर पाच ते सहा खेळाडूंनाही स्पॉन्सर केले. वीरधवल म्हणतो की, “असे कित्येक जण क्रीडापटूंवर गुंतवणूक करण्यासाठी तयारही असतात. परंतु, त्या खेळाडूमध्ये कष्ट करण्याचीही तितकीच तयारी असायला हवी.”

जलतरणपटू असो अथवा अऩ्य खेळाडू, त्यांना एक निश्चित आहार, व्यायाम, जीवनशैलीचा अवलंब करावा लागतो. वीरधवलही स्वाभाविकपणे आपल्या एकूणत फीटनेसबद्दल अतिशय जागरूक असतो. अतितिखट आणि अतिगोड पदार्थांचे तो अजिबात सेवन करत नाही. तसेच तो रोज पाच ते सहा तास पोहण्याचा सराव करतो. सकाळी ६ ते ८ दैनंदिन पोहण्याचा सराव आणि त्यानंतर थोडा वेळ आराम. मग पुन्हा ११ ते १ जिम, आराम आणि संध्याकाळी पुन्हा दोन तास पोहण्याचा सराव असा वीरधवलचा दिनक्रम. पण, तीन वर्षांपूर्वी फुटबॉल खेळताना वीरधवलच्या गुडघ्याला इजा झाली. त्यामुळे त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. त्यानंतर काही काळ वीरधवलला विश्रांती घ्यावी लागली. मात्र, आता तो पहिल्यासारखाच तंदुरुस्त असून नेटाने पोहण्याचा सराव करतो. जलतरणाच्या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांना काय कानमंत्र द्याल, असे विचारल्यावर वीरधवल सांगतो की, “सर्वप्रथम या क्षेत्रात येऊ इच्छिणार्‍यांची कष्ट करण्याची तयारी हवी. त्यांनी सरावामध्ये सातत्य ठेवले पाहिजे, जे कोणत्याही खेळासाठी आवश्यक आहे. त्यामुळे ज्यांची फारसे कष्ट करायची तयारी नाही, ज्यांना सामान्यच आयुष्य जगायचे आहे, अशा तरुणांनी जलतरणाकडे वळू नये.”

वीरधवलचे आशियाई स्पर्धेत ५० मीटर फ्री-स्टाईल गटात ०.०१ इतक्या कमी फरकाने पदक हुकले. चार वर्षांतून एकदा येणारी स्पर्धा आणि त्यामध्ये पदक जाणे, हे खूप वाईट. यामधून खूप शिकायला मिळाल्याची, सरावात कमी पडल्याची खंतही वीरधवलने यावेळी बोलून दाखविली. तेव्हा, आज बालदिनानिमित्त पालकांनी फक्त अभ्यासासाठी मुलांच्या पाठी न लागता, त्यांची आवड, खेळातील रस याकडेही तितकेच गांभीर्याने लक्ष द्यावे. मुलांना खेळापासून परावृत्त न करता त्यांना अधिकाधिक प्रोत्साहित करणे गरजेचे आहे. केवळ तेव्हा अन् तेव्हाच आपल्या घरीही असाच वीरधवल, सचिन, सायना घडतील...

"भारतात एक खड्डा खोदला आणि त्यामध्ये पाणी टाकले की जलतरण तलाव तयार. मात्र, जागतिक स्तरावर जलतरण तलाव हे १० बाय ५० मीटरचे असतात. भारतात अनेक ठिकाणी जलतरण तलाव बांधताना व्यवस्थित मोजणी केली जात नाही. तसेच योग्य त्या सुविधाही जलतरणपटूंना मिळत नाहीत. त्यामुळे चांगले जलतरणपटू घडवायचे असतील, तर सर्वात आधी त्यासाठी चांगल्या सुविधाही विकसित कराव्या लागतील."

 वीरधवल खाडे, जलतरणपटू

 - नितीन जगताप

content@yuvavivek.com

 

लेखक: 

No comment

Leave a Response