Primary tabs

दानोत्सवातून रोजगार

share on:

वाचकांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवून त्यांच्यातील वाचनसंस्कृती जागृत ठेवणारी डोंबिवलीची 'पै यांची फ्रेंड्स लायब्ररी'. या लायब्ररीचा एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजे 'आदान-प्रदान महोत्सव'. पुंडलिक पै वाचकांकडून त्यांना नको असलेली पुस्तकं मागवून घेतात. त्यातली चांगल्या अवस्थेतली पुस्तकं ठेवून घेतात आणि बाकीची एकतर त्या वाचकाला परत करतात किंवा ग्रामीण भागातील शाळांना, झोपडपट्टयांतील शाळांना विनामूल्य देऊन तरी टाकतात. अशा रितीने गोळा झालेली पुस्तकं मग आदान-प्रदान महोत्सवात मांडली जातात.

गेल्या आठवडयात डोंबिवलीच्या पै फ्रेंड्स लायब्ररीचे पुंडलिक पै काही कामानिमित्ताने भेटले. पै तसे कारवारचे, परंतु पोटापाण्यासाठी मुंबईत आले आणि डोंबिवलीत स्थायिक झाले. पैंचं शिक्षण कानडीतून झालं, परंतु वाचनाची आवड असल्याने आणि लोकांनी वाचावं अशी पै यांना वाटणारी कळकळ असल्याने त्यांनी लायब्ररीचा व्यवसाय सुरू करायचं ठरवलं आणि पै फ्रेंड्स लायब्ररी सुरू झाली.. पाहता पाहता लायब्ररीच्या सहा शाखा डोंबिवलीत सुरू झाल्या आणि आधीच साक्षर असलेल्या डोंबिवलीत वाचनानंदाचं वारं खेळू लागलं. तशी महापालिकेची लायब्ररी डोंबिवलीत होतीच, काही खाजगी लायब्रऱ्याही होत्या; पण पैंनी जशी आणि जेवढी जान लायब्ररीत ओतली होती, तशी जान ओतणारा कुणीच लायब्ररीचालक नव्हता. नवनव्या पुस्तकांची ग्रंथखरेदी होत नसेल, तर वाचकाला लायब्ररीत इंटरेस्ट राहायचा कसा? नेमकं तेच आणि तसंच घडत गेलं आणि अनेक खाजगी लायब्रऱ्यांनी राम म्हटला.

पैंनी काही उपनगरात शाखा सुरू केल्या आणि त्या काही कारणाने बंदही केल्या. ज्या जागेत त्या सुरू झाल्या होत्या, त्यांचं भाडं न पेलणारं तरी होतं किंवा म्हणावं तितके सभासद मिळाले नव्हते, मिळत नव्हते. खरं तर कुठलीही शाखा सुरू करण्यापूर्वी पैंची टीम त्या परिसराचं सर्वेक्षण करीत असते. पण असं घडतं हे खरंच. 'जे जे नवं, ते ते डोंबिवलीने द्यावं' अशी एक म्हण महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रात लोकप्रिय आहे. सर्व वैद्यक शाखा एकत्र येतात आणि नव्याने पदवीधर होणाऱ्या शहरातील वैद्यक विद्यार्थ्यांना गौरवतात, व्यवसायात पडण्यापूर्वीच्या शुभेच्छा देत त्यांच्या पंखात बळ भरतात हा उपक्रम डोंबिवलीनेच तब्बल तीस वर्षांपूर्वी सुरू केलेला. 'जन गण मन' हे मुळात पाच कडव्यांचं गीत. त्याचं पहिलंच कडवं राष्ट्रगीत म्हणून स्वीकारलं गेलं, पण डोंबिवलीने 'जन गण मन'ला 100 वर्षं होत असताना ते पाचही कडव्यांचं गीत संगीत देऊन गाऊन घेतलं, शाळाशाळांना त्याच्या सीडी दिल्या आणि 3500 मुलांनी ते क्रीडासंकुलात एका सुरात, एका तालात गायलं. पै त्या संयोजनात होतेच. नववर्ष स्वागत यात्रा डोंबिवलीने सुरू केली आणि मग ती जगभर गेली. पैंचा आदान-प्रदान महोत्सव त्याच माळेतला.

वाचकांचं पुस्तकवेड जागतं ठेवण्यासाठी पैंनी अनेक उपक्रम राबवले. वाचककट्टा, पुस्तक प्रकाशनं हे त्यापैकीच. ग्रंथवाचनाचं वेड लावण्यासाठी पैंनी एका दिवसात विक्रमी सभासद नोंदवण्याचा संकल्प सोडला आणि एका दिवसात 1021 नवे सभासद केले. लिम्का बुकने त्याची नोंदही घेतली. पैंच्या ग्रंथालयातल्या एकूण पुस्तकांची संख्या आता दोन लाखांच्या पलीकडे गेली आहे. त्याशिवाय सुमारे 850 नियतकालिकं घेतली जातात ती वेगळीच.

 

पैंचं शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण डोंबिवलीतच झालं. आईने लावलेली वाचनाची आवड बी.कॉम. झाल्यानंतर पैंना स्वस्थ बसू देईना. भावाकडून पैसे घेऊन अवघ्या 100 पुस्तकांनिशी पैंनी लायब्ररी सुरू केली. रोज सकाळी पै टिळकनगरच्या मुख्य लायब्ररीत येतात, सरस्वतीची पूजा करतात, कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत प्रार्थना म्हटली जाते आणि मग सहाही शाखांना भेट देऊन पै मुख्यालयात जातात. याला अपवाद असतो सोमवारचा. लायब्ररी बंद असते, पण पैंच्या पायाची भिंगरी फिरतच असते.

पैंना मुलांची अभ्यासासाठी शांत जागेची गरज लक्षात येत होती, पण उत्तर सापडत नव्हतं. सी.ए., सी.एस., स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यास करणाऱ्या मुलांसाठी खाजगी प्रयत्नातून सुरू झालेल्या काही अभ्यासिका डोंबिवलीत होत्या, परंतु तरीही आणखी जागांची गरज होती. पैंनी अशी एक अभ्यासिकाही सुरू केली आणि त्या मुलांसाठी पुस्तकांचीही व्यवस्था केली. गेल्या दोन-तीन वर्षांपासून पै आणखी एक अनोखा उपक्रम राबवताहेत. त्या उपक्रमाचं नाव आहे 'आदानप्रदान महोत्सव'. पुस्तकं देण्याघेण्याचा महोत्सव. तो भरतो एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवडयात. शाळांना सुट्टया लागल्यावर पालकांना बाहेर जायचे वेध लागतात, त्याच्या संधिकाळात हा महोत्सव भरतो.

आपल्याला नको असलेली आपल्या संग्रहातली पुस्तकं एरवी आपण रद्दीत देतो, नाहीतर मोठं उदार अंत:करण दाखवून दुसऱ्या कुणाला तरी देऊन टाकतो. अनेकदा ती पुस्तकं चुकीच्या घरी पडतात आणि मग त्यांचंही तेच होतं, जे आपण रद्दीच्या दुकानात करीत असतो. पैंनी यावर मार्ग काढला. मार्ग नवा नव्हता, याआधी जगभरच्या लायब्रऱ्यांनी तो हाताळलेला होता. अमेरिकेतल्या वास्तव्यात त्या त्या शहरातल्या पब्लिक लायब्ररीला भेट देणं, हा माझा छंदच असायचा. तुम्ही नागरिक नसलात, तरी केवळ तुमच्या पासपोर्टच्या भरवशावर त्या लायब्रऱ्या मेंबरशिप देतात, हे मी अनुभवलं होतं. एका वेळेस दहा दहा पुस्तकं, सीडीज घरी न्यायला परवानगी असे, आणि मुख्य म्हणजे लायब्ररीची वेळ संपली, तरी तुम्ही ती पुस्तकं ड्रॉप बॉक्समध्ये टाकून वेळेवर परत केल्याच्या आनंदात राहू शकता. पुस्तकं जुनी झाली, (म्हणजे फाटलीबिटली नव्हे) नवी आवृत्ती आली की लायब्ररी जुनी आवृत्ती काढून टाकत असे. त्या पुस्तकांमधलं कुठलंही पुस्तक मग एका डॉलरमध्ये विकत घेता येत असे. एका शहरातल्या लायब्ररीचं पुस्तक दुसऱ्या शहरातल्या लायब्ररीत परत करता येत असे आणि गंमत म्हणजे तुमच्या शहरातल्या लायब्ररीत तुम्हाला एखादं पुस्तक नाहीच मिळालं, तर ते जवळच्या शहरातल्या ज्या लायब्ररीत उपलब्ध असेल तिथून ते आणून द्यायची व्यवस्था तिथे उपलब्ध असे.

मी माझ्या लेखनासाठी संदर्भ म्हणून एखादं पुस्तक मागितलं, तर पै ते ज्या शाखेत असेल तिथून मागवून घेत, ही सुविधा अमेरिकेच्या त्या सुविधेचीच आठवण करून देणारी होती. पैंनी त्या आदान-प्रदान सुविधेला थोडं वेगळं स्वरूप दिलं. एप्रिल महिन्याच्या महोत्सवाआधी संपूर्ण मार्च महिनाभर पै वाचकांकडून त्यांना नको असलेली पुस्तकं मागवून घेतात. त्यातली चांगल्या अवस्थेतली पुस्तकं ठेवून घेतात आणि बाकीची एकतर त्या वाचकाला परत करतात किंवा ग्रामीण भागातील शाळांना, झोपडपट्टयांतील शाळांना विनामूल्य देऊन तरी टाकतात. अशा रितीने गोळा झालेली पुस्तकं मग आदान-प्रदान महोत्सवात मांडली जातात. आणि महोत्सव सुरू झाला की ज्याने जितकी पुस्तकं दिली असतील, तितकी त्याच्या आवडीची दुसऱ्यांनी ठेवलेली पुस्तकं घेऊन जायची सुविधा त्याला मिळते. यात तत्त्व एकच असतं - पुस्तकाला पुस्तक न्यायचं, आपण किती किमतीचं दिलं आणि त्या बदल्यात किती किमतीचं घेतलं हा प्रश्नच नसतो. कथेला कथा, कादंबरीला कादंबरी, मराठीला मराठी, इंग्लिशला इंग्लिश, वैचारिकला वैचारिक असा प्रश्नच नसतो. महत्त्वाचं असतं ते देणं आणि त्या बदल्यात घेणं. पैंनी डोंबिवलीबरोबरच मुंबई-पुण्यात राहणाऱ्या सुमारे 2000 अनिवासी सभासदांना मागणीनुसार 24 तासांच्या आत घरपोच पुस्तक देणारी लायब्ररीची आणखीही एक सेवा सुरू केली आहे. पै फ्रेंड्स लायब्ररीचं अद्ययावत संकेतस्थळ आहे, त्यावर सर्व लायब्ररीत उपलब्ध असलेल्या लाखाहून अधिक पुस्तकांची सूची आहे.

एका अर्थाने, पै फ्रेंड्स लायब्ररी हा आता वाचनसंस्कृती जोपासणारा ब्रँड बनला आहे. पैंनी 2018मध्ये वाचनवेड जोपासणारा आणि तपासणारा एक अनोखा उपक्रम करून पाहिला. 'पुस्तक शोधा आणि एक लाख रुपये मिळवा' हा तो उपक्रम. लायब्ररीच्या सहाही शाखांमध्ये काही पुस्तकं अन्य पुस्तकांमध्येच अशा रितीने दडवून ठेवण्यात आली होती की ती सर्व शाखांमध्ये जाऊन ठरावीक वेळात शोधून काढणं हे मोठंच आव्हान वाचकांसमोर होतं. जो वाचक लपवलेली सर्व पुस्तकं शोधून काढेल तो लाख रुपयांच्या बक्षिसाला पात्र ठरेल, असं घोषित करण्यात आलं होतं. कुणीच जिंकलं नाही, याचंच पैंना मनस्वी वाईट वाटलं.

पै पुस्तकवेडे आहेतच. वाचकाने एखादं पुस्तक मागितलं आणि ते आपल्याकडे नाही असं लक्षात आलं की पै अस्वस्थ होतात. तसं तर कुठल्याही पुस्तकाच्या पंधराएक प्रती पै घेतातच. त्या लायब्रऱ्यांमध्ये जशा असतात, तशा त्या त्यांच्या मुख्यालयातही असतात आणि पुणे, मुंबई, नाशिकच्या वाचकांसाठीही वेगळया आरक्षित असतात. पैंचं पुस्तकप्रेम इतकं विलक्षण की एका वर्धापन दिनाला पैंनी टिळकनगरमधल्या मुख्य शाखेबाहेर पुस्तकांचीच कमान उभी केली.

पैंनी आदान-प्रदान महोत्सव सुरू केला आणि पहिल्या वर्षी 50-55 हजार पुस्तकं आली. गेल्या वर्षी ती संख्या 60 हजारांवर गेली. यंदा ती संख्या लाखाच्या घरात जाईल, असा पैंचा अंदाज आहे. पै केवळ पुस्तकांचं आदान-प्रदान करून थांबत नाहीत, शालेय विद्यार्थ्यांनी वाचनाकडे वळावं म्हणून आदान-प्रदान महोत्सवाच्या काळात रोज सकाळी पै 'ज्ञानानंद' नावाच्या संस्कारक्षम उपक्रमांचं आयोजन करतात. भाषण, मुलाखत, अभिवाचन, साहित्य रसास्वाद असे अनेक प्रकार त्यात असतात. त्याशिवाय संध्याकाळी साहित्यिक-सांस्कृतिक उपक्रम असतातच. दुपारी लहान मुलांसाठी संस्कार शिबिर असतं. दिवसभर आदान-प्रदान सुरू असतंच.

यंदा 7 ते 14 एप्रिल असा हा आदान-प्रदान महोत्सव आहे. महाराष्ट्र टाइम्स त्याचा मीडिया पार्टनर आहे आणि हावरे बिल्डर्सचे सुरेश हावरे, जे शिर्डी संस्थानचे अध्यक्ष या नात्याने अनेक समाजोपयोगी उपक्रमांना हातभार लावताहेत आणि ज्यांच्या व्यावसायिक प्रतिष्ठानाने महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात शंभरेक ग्रामीण वाचनालयं सुरू करून वाचनसंस्कृतीला मोठा हातभार लावला आहे, ते महोत्सवाचं उद्घाटन करणार आहेत. हावरेंना निमंत्रण द्यायला गेलो, तेव्हा हावरेंनी दोनच प्रश्न विचारले. पहिला असा की व्यवसायवृध्दीसाठी कुठल्या एखाद्या स्टार्ट अपशी जोडून का नाही घेत? त्याचं तंत्रज्ञान, तुमची मेहनत आणि स्टार्टअपमुळे येणारा गुंतवणूकदाराचा पैसा यातून परस्परसहाय्य तर होईलच, तसंच धंदाही वाढेल. धंदा करा पण दुसऱ्याच्या खिशातल्या पैशातून, हा हावरेंचा लोकप्रिय उद्योगमंत्र. हावरेंनी दुसरा प्रश्न केला - नोकरी किती जणांना दिलीत? पैंचं त्यावरचं उत्तर होतं, एकशेतीन जणांना. सरकारी अनुदानं वेळच्या वेळी मिळत नाहीत, अशी ओरड अ आणि ब वर्गातली ग्रंथालयं करीत असताना पैंसारख्या अमराठी माणसाने चालवलेली मराठी भाषिकांसाठीची खासगी लायब्ररी विक्रमी यश संपादत करत नवनवे उपक्रम आखते, महोत्सव भरवते ही अभिमानाने मान ताठ व्हावी अशीच बाब.

***

पै फ्रेंड्स लायब्ररी हा काही उद्योग क्षेत्रातला ज्ञात व्यावसायिक ब्रँड नव्हे, परंतु ग्रंथालयाच्या आणि ग्रंथव्यवहाराच्या आदान-प्रदानातून रोजगारनिर्मिती करणारा त्यांचा व्यवहार वाचकांपुढे ठेवावासा वाटला.

ssumajo51@gmail.com

 

लेखक: 

No comment

Leave a Response