Primary tabs

क्लाउड कम्प्युटिंगच्या विश्वात

share on:

कंप्युटर तंत्रज्ञानाचा झपाट्याने होणारा विकास पाहता या क्षेत्रात नवनवीन भन्नाट कल्पनांना मोठ्या प्रमाणात प्रत्यक्षात साकार व्हायला वाव आहे. त्यामुळेच प्रत्येक दशकात नवनवीन संकल्पना येथे प्रत्यक्ष साकार होत, मानवी जीवनशैलीत महत्वाचे परिणामकारक ठरतात. असाच नवीन आविष्कार आहे तो क्लाऊड कम्प्युटिंगचा!

१९६० साली जेव्हा कंप्युटर क्षेत्र नवीन होते, त्यावेळी सॉफ्टवेअर सेवा सुरु झाल्या. त्यावेळी ‘कन्सोल बेस्ड सॉफ्टवेअर’ बाजारपेठेत नुकतेच आले होते. त्या आधारावर व्यवसाय होत असे. त्यानंतरच्या १९८० च्या दशकात काळात ‘स्टॅन्डअलोन सॉफ्टवेअर्स’ बाजारपेठेत आले. त्यांनी एकूण सॉफ्टवेअर क्षेत्राची पद्धती बदलली. १९९० च्या दशकात नुकतेच विकसित झालेल्या इंटरनेटने मात्र या क्षेत्रात मोठी क्रांती घडवून आणली. त्याआधारावर नवीन तंत्रज्ञान देखील विकसित झाले, आणि सॉफ्टवेअर क्षेत्र सामान्यांपर्यंत जलदगतीने पोहोचले. सन २००० च्या दशकात मोबाईल कम्प्युटिंगचे क्षेत्र देखील बहरले. आज आपण एक छोटा कंप्युटर मोबाईलच्या स्वरुपात खिशात घेऊन फिरतो, ते याच आधारावर. अशा पार्श्वभूमीवर गेल्या दशकात कंप्युटर क्षेत्राने नवीन तंत्रज्ञानात पाऊल टाकले आहे, ते म्हणजे क्लाऊड कम्प्युटिंगच्या.

काय आहे क्लाऊड कम्प्युटिंग ?

एखादा कंप्युटर प्रोग्राम सेट अप करण्यासाठी वेगवेगळ्या सॉफ्टवेअर्सची गरज भासत असते. क्लाऊड कम्प्युटिंगने ते मात्र खूप सोप्पं केलं आहे. कुठलाही कंप्युटर प्रोग्राम सेटअप करण्याची आवश्यकता यात भासत नाही, त्यामुळे सॉफ्टवेअर्स बनवण्याची पद्धती अधिक सुकर होते. शिवाय हा सेटअप कुठेही सहजरीत्या काम करत असतो, त्याला जागेचा, स्थानाचा प्रश्न उरत नाही. त्याचबरोबर मोबाईल, टॅब, लॅपटॉप अशा कुठल्याही उपकरणावर हा सेटअप काम करू शकतो.

क्लाऊड कम्प्युटिंगमध्ये सर्व सेट अप एका क्लाऊडवर अर्थात एका सर्व्हरवर केलेला असतो, ज्याची हाताळणी भौतिकदृष्ट्या करणे सोयीचे असते. हा क्लाऊड एका विशिष्ट ठिकाणी असतो, जेथे सामान्य युजर्सना अॅक्सेस नसतो. मात्र त्यात युजर्सना आवश्यक सर्व सॉफ्टवेअर्स उपलब्ध असतात. त्याद्वारे केवळ उपकरण असणे पुरेसे होते. तसेच जागतिक पाळतीवर काम करणाऱ्या सर्व उद्योगांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होतो.

सामान्यत: रोज सॉफ्टवेअर्सची हाताळणी करणारा प्रत्येक युजर क्लाऊड कम्प्युटिंगचा प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष वापर करत असतो. जर तुम्ही ई-कॉमर्स, ई-मेल, ऑनलाईन कागदपत्रे हाताळणी, ऑनलाईन टी.व्ही., गेम्स, चॅटिंग, या सर्वांचा वापर करत असाल तर तुम्ही नक्कीच क्लाऊड कम्प्युटिंगचा वापर केला आहे.

प्रकार - 
साधारणतः क्लाऊड कम्प्युटिंग तीन प्रकारात मोडते.
१. Software as a Service (SaaS) – या प्रकारात युजर्ससाठी सॉफ्टवेअर्सचा संपूर्ण सेट अप केलेला असतो. एखादे अॅप्लिकेशन तयार करण्यासाठी आवश्यक असलेले सगळे सॉफ्टवेअर्स यात तयार केले गेले असतात. त्यामुळे केवळ लॉग इन करून थेट कामाला सुरुवात करता येते. याचबरोबर त्या अॅप्लिकेशनच्या सुरक्षा, बॅक अप, डेटा बेसची सगळी सुविधा उपलब्ध करून दिलेली असते.
२. Platform as a Service (PaaS) – या प्रकारात सॉफ्टवेअर डेव्हलपरला सॉफ्टवेअर्स तयार करण्यासाठीचे आवश्यक सगळे टूल्स उपलब्ध करून दिलेले असतात. तेथे कुठल्याही वेगळ्या सॉफ्टवेअर्सची मदत घेण्यासाठी वेगळे श्रम घेण्याची आवश्यकता भासत नाही. त्याचबरोबर त्यात डेटाबेस देखील पूर्णपणे सुरक्षित रित्या हाताळला जात असतो. यामुळे सॉफ्टवेअर्सची किंमत कमी होत असून माफक दरात ते ग्राहकाला मिळू शकतात.३. Infrastructure as a Service (IaaS) – या प्रकाराचा वापर पूर्णपणे सॉफ्टवेअर्स सुविधा पुरविण्यासाठी होत असतो. सामान्य युजर्सचा या प्रकाराशी फारसा संबंध येत नाही. यात सर्व्हर होस्टिंग, ऑपरेटिंग सिस्टीम, व्हर्चुअल मशीन्स या सर्व सुविधा पुरवल्या जातात.

फायदे -
माहिती तंत्रज्ञानाच्या जगतात क्लाऊड कम्प्युटिंग मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध होत आहे. पारंपारिक सर्व्हर प्रणालीतून माहिती तंत्रज्ञान क्षेत्र क्लाऊड कम्प्युटिंगकडे वळत आहे, त्याचे अनेक फायदे असल्यामुळेच. सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे सॉफ्टवेअर्सची किंमत यामुळे मोठ्या प्रमाणात घटत असते. जागतिक पातळीवर कोठेही सहजरीत्या हाताळता येण्याचा देखील मोठा फायदा या क्षेत्राचा आहे. त्यामुळे लहान व्यवसाय देखील जागतिक स्तरावर आपल्या कक्षा वाढवू शकतो. आज अनेक स्टार्टअप्स क्लाऊड कम्प्युटिंगचा मोठा वापर करताना दिसतात. सुरक्षेची हमी क्लाऊड आधारित सॉफ्टवेअर्सची मोठ्या प्रमाणात असते. त्यासाठी वेगळी किंमत देखील मोजण्याची आवश्यता नसते.

- हर्शल कन्सारा

content@yuvavivek.com

लेखक: 

No comment

Leave a Response