Primary tabs

share on:

केवळ वैद्यकीय, इंजिनिअरींग हीच सन्मानाची क्षेत्रं आहेत, या गैरसमजातून पालकांनी स्वतः बाहेर पडून मुलांनाही बाहेर काढलं पाहिजे. निसर्गाने सर्वांना एकाच प्रकारच्या अभिक्षमता बहाल नाही केल्या. निसर्ग न्यायाने वागतो. तो क्षमतांचा समतोल साधतो. त्यामुळे आपली आर्थिक परिस्थिती, सामाजिक दर्जा याचा सहसंबंध आपलं मूल क्लास वन ऑफिसर बनण्याशी लावणं योग्य आहे का, याचा विचार व्हावा.

करिअर काउन्सेलिंग हा तसा तांत्रिक आणि शुष्क काउन्सेलिंगचा एक प्रकार असावा, असं नावावरून वाटतं. काही टेस्ट घेणं, त्यातील निकालावरून योग्य पर्याय सुचवणं हा त्याचा महत्त्वाचा भाग. पण या काउन्सेलिंगदरम्यान पालकांचे, मुलांचे अनेक पैलू समोर येतात.

करिअर काउन्सेलिंगमध्ये आलेले हे काही अनुभव नमुन्यादाखल देत आहे. या अनुभवांकडे डोळसपणे पाहिलं तर आपल्या किशोरवयीन मुला-मुलीकडे पाहण्याची, त्यांच्या भविष्याकडे पाहण्याची एक नवी दृष्टी नक्कीच मिळेल. करिअर टेस्टिंगच्या पहिल्या सेशनमध्ये काही पालक संभ्रमित अवस्थेत असतात, तर काही पालकांचा निर्णय निश्चित असतो. आपल्या मुलाने कशात करिअर करावं हे त्यांनी आधीच ठरवलेलं असतं. केवळ second opinionचा सोपस्कार म्हणून ते करिअर टेस्ट करत असतात.

मुलगी, आई आणि वडील तिघंही माझ्यासमोर बसले. मुलीचा रिपोर्ट समजावून सांगायला सुरुवात केली. सायन्समध्ये तिला बिलकूल रस नव्हता अन aptitude ही scienceला अनुकूल नव्हत्या. तिला आलेले सारे पर्याय आर्ट्सवर आधारित आहेत, हे ऐकताच वडिलांचा चेहरा एकदम पडला. माझं बोलणं मध्येच थांबवत ते म्हणाले, ''M.B.B.S. नाही आलं ना यात? मग काय उपयोग? आणि आता तुम्ही हे मुलीसमोरच सांगितलं, आता ती मुळीच मान्य करणार नाही. मी तिच्या मनाची तयारी करून घेतली होती. M.B.B.S.साठी माझी आर्थिक क्षमताही आहे तेवढी...'' मी सहज मुलीकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर संमिश्र भाव होते. तिला रिपोर्ट पटत होता असं दिसलं, पण वडिलांच्या बोलण्याने तिचे खरे भाव दडवण्याचा तिचा प्रयत्न सुरू असावा असं वाटलं. मग दोघांना बाहेर पाठवून मी आईकडून सर्व प्रकार समजून घेतला. एमबीबीएसला जाण्याची वडिलांची इच्छा अपुरी राहिली. आज ती मुलीने पूर्ण करावी अशी त्यांची धारणा. पण मुलीला त्यात अजिबात रस नाही. तिला भाषांमध्ये खूप रस होता.

असेच एक पालक मुलाला घेऊन माझ्याकडे आले. तो ऑटोमोबाइलला दुसऱ्या वर्षाला होता. सारखा आजारी पडत होता. सगळया टेस्ट्सचे रिपोर्ट नॉर्मल. शेवटी त्यांनी काउन्सिलरकडे न्यावं, असा डॉक्टरांनी सल्ला दिला. याच्या केसचा अभ्यास करताना लक्षात आलं - मुलाला आवडतं म्हणून पालकांनी त्याला इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतली, पण हळूहळू मुलाच्या लक्षात आलं की, यात आपण फारसे यशस्वी होत नाही. मग केटीचा सिलसिला सुरू झाला. आपणच निवडलेलं फील्ड आपणच निभावू शकत नाही, यामुळे त्याला हळूहळू डिप्रेशन येऊ लागलं.

कधी पालकांना वाटतं म्हणून मूल करिअर निवडतं, तर कधी मुलाला वाटतं म्हणून पालक त्याच्या निवडीला पाठिंबा देतात. अनेक मुलांशी गप्पा मारण्याची संधी मिळते, तेव्हा मी करिअरबाबत आवर्जून प्रश्न विचारते. काही जणांनी अजून ठरवलेलं नसतं, तर काही जणांकडे एकापेक्षा जास्त पर्याय असतात.

किशोरावस्था ही अशीच असते. मुलांच्या आवडीनिवडी बदलत असतात. त्यामुळे पालकांनी संयम ठेवणं खूप आवश्यक आहे. कधी मित्र-मैत्रिणी जी माहिती पुरवतात, त्यावरून मुलांची मतं बनतात; किंवा काही गोष्टींचा एखादाच पैलू त्यांना आवडतो, म्हणून त्यांना त्या करिअरबद्दल आकर्षण वाटू लागतं.

कधी मुलांना त्यातून मिळणारा मानसन्मान हवाहवासा वाटतो, तर कधी त्यातून येणारी आर्थिक आवक. अमूर्त गोष्टींचा विचार करण्याची क्षमता अद्यापि संपूर्ण विकसित झालेली नसल्याने किशोरवयीन मुलांना करिअरच्या निवडीमध्ये पालकांच्या मदतीची आवश्यकता असते. आणि करिअर क्षेत्रात होणाऱ्या विकासामुळे पालकांना या क्षेत्रातील तज्ज्ञांची मदत हवी असते.

करिअर निवडीचा निर्णय हा किशोरावस्थेतील अपरिहार्य असतो. मग तो योग्य पध्दतीने घेतला गेला, तरच मुलांचं भविष्य सुखकारक होईल. म्हणूनच करिअर घडवण्यासाठीचे महत्त्वाचे घटक आपण समजून घेऊ.

 

 

आवड - मुलाची आवड ही पालकांच्या सहज लक्षात येणारी गोष्ट आहे. पण आवड ही तशी परिवर्तनशील असते. त्यामुळे आपल्या मुलाचा 'Interest Pattern' पालकांनी लक्षात घ्यावा. त्याला/तिला कोणत्या स्वरूपाचं काम आवडतं, कोणती कामं तो/ ती टाळतो हे लक्षात घ्यावं.

अभिक्षमता - निसर्गाने मुलांमध्ये जन्मजात काही क्षमता भरभरून दिलेल्या असतात. या क्षमतांना साजेसं काम आपल्या पाल्याला मिळालं, तर ते त्याच्या कामात समाधान आणि दीर्घकाळ यश मिळवू शकतं. जुजबी स्वरूपात या क्षमता आपल्या कामातील अचूकता, गती, त्रिमितीय संवेदन इ. परंतु विशिष्ट क्षमता मापन चाचण्याद्वारे यथायोग्य मार्गदर्शन मिळतं.

व्यक्तिमत्त्व - कोणतंही काम असो, व्यक्तिगत गुणवैशिष्टयांचा त्यावर परिणाम होतच असतो. यासाठी आपल्या मुलाच्या व्यक्तिमत्त्वाला अनुरूप क्षेत्रात काम करायला मिळालं, तर तो त्या कामाला निभावू शकेल. ज्या व्यक्तीला रक्त पाहून चक्कर येते, त्याला आपण मेडिकलला, पॅरामेडिकलला पाठवल्यास त्याच्यावर तो अन्यायच आहे.

आर्थिक क्षमता - सगळयात महत्त्वाचा घटक आहे. केवळ हा घटक अपुरा असल्याने अनेक व्यक्ती वरील तीन घटकांना न्याय देऊ शकत नाहीत. पण आर्थिक क्षमता योग्य नियोजनाने वाढवता येऊ शकते.

या चारही गोष्टींनी मुलाचं करियर घडणार असतं. त्यामुळे तज्ज्ञांकडून तीन गोष्टी शास्त्रशुध्द पध्दतीने समजून घेऊन योग्य आर्थिक नियोजन केल्यास पालकांवरही ताण येणार नाही आणि मुलासाठी योग्य पर्याय निवडल्याचं समाधानही मिळेल.

केवळ वैद्यकीय, इंजिनिअरिंग हीच सन्मानाची क्षेत्रं आहेत या गैरसमजातून पालकांनी स्वतः बाहेर पडून मुलांनाही बाहेर काढलं पाहिजे. निसर्गाने सर्वांना एकाच प्रकारच्या अभिक्षमता बहाल नाही केल्या. निसर्ग न्यायाने वागतो. तो क्षमतांचा समतोल साधतो. त्यामुळे आपली आर्थिक परिस्थिती, सामाजिक दर्जा याचा सहसंबंध आपलं मूल क्लास वन ऑफिसर बनण्याशी लावणं योग्य आहे का, याचा विचार व्हावा.

नांदेडला काउन्सेलिंगदरम्यान मला एक आई भेटायला आली. ती स्वतः डॉक्टर होती आणि मुलाचे रिपार्ट कॉमर्स रिलेटेड करियर्स दाखवत होते. शांतपणे त्यांनी सारं ऐकून घेतलं आणि मला म्हणाल्या, ''छान, त्याला मी इतकी वर्षं पाहतेय. त्याचा कल अगदी योग्य पध्दतीने उतरलाय तुमच्या टेस्टमधून. पण खरं सांगू मॅडम, माझी एकच इच्छा आहे. त्याने चांगला माणूस म्हणून काम करावं. त्याने निवडलेल्या क्षेत्रात त्याने प्रामाणिकपणे काम करावं.''

करियरचा खरा अर्थ त्यांना उमगला, म्हणून त्या हे म्हणू शकल्या. 20 वर्षापासून 60 वर्षापर्यंतच्या कालावधीचा विचार करता 40 वर्षं होतात. त्यातील 1/3 भाग करियरचा, म्हणजे जवळजवळ 13 वर्षं आपण या क्षेत्रात वावरणार, काम करणार, पैसे कमावणार. मग केवळ मुलाला वाटलं किंवा पालकांच्या प्रतिष्ठेला शोभलं म्हणून ते क्षेत्र निवडावं का? माझं मूल त्याच्या गुणांची, बुध्दिमत्तेची, कल्पकतेची अभिव्यक्ती ज्या क्षेत्रात आनंदाने करू शकेल आणि ते त्यातून तो समाजमान्य होईल, त्यातून त्याचं अर्थार्जन होईल असं क्षेत्र निवडणं ही खरी गरज आहे.

आज लेखाच्या निमित्ताने आपल्या मुलाच्या, मुलीच्या भविष्याला अपेक्षांच्या धुक्यातून मोकळं करून वास्तवाच्या प्रकाशात पाहण्यासाठी आपली भूमिका समजून घेऊ आणि त्याला/ तिलादेखील 'जे कामं करेन त्याचं सोनंच करेन' अशा सकारात्मकतेने भविष्याकडे पाहायला प्रोत्साहित करू.

- सुचिता रमेश भागवत

suchitarb82@gmail.com

 

लेखक: 

No comment

Leave a Response