करियर
कधी ऐकतो आपण हा शब्द प्रथम? तुम्हाला आठवत आहे? बघा मी आठवण करून देतो....
निबंधाला विषय असायचा – “मी मोट्ठेपणी कोण होणार?” किंवा वक्तृत्व स्पर्धेत विषय असायचा “मला कोण व्हायचं आहे?” त्या वयात हे सर्व घरातले जे सांगतील तसेच लिहिले जायचे किंवा बोलले जायचे. मला आठवत आहे...मला इंजिन ड्रायव्हर व्हायचे होते. कोणी विचारले असते तर मी सरळ सांगितले असते...तो आखी एक ट्रेन ओढतो...आणि कसा ऐटीत बसलेला असतो...वगैरे वगैरे....
जशी १०वी जवळ येते तसे हे मनोरंजन मागे पडते...आणि घरात खूप गंभीरपणे ह्यावर चर्चा सुरु होते...”पुढे कोण होणार आहे हा किंवा ही”. ह्यात त्याचे किंवा तिचे विचार फारसे महत्वाचे नसतात. आई वडील “त्याला/तिला काय कळतंय?” ह्या स्वरात महत्वाच्या स्टेक होल्डरची वासलात लावतात. ते निर्णय घेतात..कशाच्या आधारावर? तर सध्या आजूबाजूचे काय शिकताहेत....नोकरी कशी चटकन मिळेल? एमबीए ला म्हणे कोटीचे प्याकेज मिळते, आय टी म्हणजे भावी सुखी आयुष्याची हमी...नवरा मिळेल का? अमेरिकेला जायचे चान्सेस आहेत का? आणि शेवटी तो जे काही शिकेल त्यामुळे आमच्या प्रतिष्ठेत काही भर पडेल का?
बहुतांश मुलं...ह्या अनुभवातून जातात. मग स्पेशल क्लासेस, अठरा तास अभ्यास, टिव्ही बंद...(जे काही वाईट नाही), खेळ बंद(हे खूपच वाईट), मित्र बंद, ट्रेकिंग बंद (हे सुद्धा वाईट). एकूण काय “बंद” ची यादी खूप मोठ्ठी होते आणि मुले आणि पालक गंभीर. क्लासेसवाले खुश अशी परिस्थिती निर्माण होते.
अशा परिस्थितीत बऱ्याच शोकांतिका पुढे नजरेस येतात. दहावी आणि बारावी मध्ये ८०-९० टक्के मार्क मिळालेली मुलं, पुढे कुठे गायब होतात कळत नाही आणि “ओवाळून” टाकलेली मुलं, एखाद्या उद्योगाचे मालक, स्टार्टअपचे मालक, आर्थिक सुबत्ता मिळवून परदेशी वाऱ्या करताना दिसतात.
Somebody was quoted as saying “I was never a brilliant boy…but I was brilliant enough to
employ thousands of brilliant boys and girls”
ह्यातच “करियर” ह्या शब्दाची मेख आहे...
मला काय व्हायचं आहे ह्या प्रश्नाचे उत्तर शोधण्या आधी प्रथम “मी कोण आहे” ह्या प्रश्नाचे उत्तर शोधणे आवश्यक आहे.
आपण ह्या लेखांची मालिका ह्या पहिल्या प्रश्ना पासून करणार आहोत...
क्रमश:
No comment