Primary tabs

बहिणाबाई चौधरी

share on:

अनेक मान्यवर आणि रसिकांनी ज्यांना ‘निसर्गकन्या’, ‘भूमिकन्या’ अश्या उपमा दिल्या त्या बहिणाबाई चौधरींचा आज स्मृतिदिन! त्यानिमित्ताने त्यांच्याविषयी थोडेसे !...

 

लौकिक अर्थाने लिहिता वाचता न येणारी पण प्रतिभेच अलौकिक देणं लाभलेली तरल हृदयाची कवयत्री म्हणजे बहिणाबाई चौधरी. बहिणाबाईंना लिहिता येत नव्हतं म्हणून त्यांच्या कितीतरी उत्तम काव्यरचना  काळाच्या ओघात अदृश्य झाल्या. तर काही रचना या त्यांचा मुलगा सोपानदेव आणि मावस भाऊ पितांबर चौधरी यांनी जमेल तश्या उतरवून काढल्या. बहिणाबाईंच्या निधनानंतर, सोपानदेव यांनी जेव्हा या काव्यरचना आचार्य अत्रे यांना दाखवल्या तेव्हा ते म्हणाले ‘हे बावनकशी सोनं असून ते महाराष्ट्रापासून लपून ठेवणं हा गुन्हा आहे!.’ अशाप्रकारे आचार्य अत्रे यांनी बहिणाबाईच्या कविता प्रकशित करण्यासाठी पुढाकार घेतला. आणि अत्रे ह्यांच्या प्रस्तावनेसह बहिणाबाईंची गाणी १९५२ मध्ये प्रकाशित होऊन ही अज्ञात कवयित्री अवघ्या महाराष्ट्राला परिचित झाली. या संग्रहात त्यांच्या फक्त ३५ कविता आहेत.

 

बहिणाबाईंचा जन्म ११ ऑगस्ट १८८० साली जळगाव जिल्यातील असोदे या गावी झाला. खान्देशातल हे छोटंसं गाव. बहिणाबाई घरातली कामं करता करता काव्य रचत आणि म्हणत. त्यांच्या काव्यातून अतिशय सोप्या पद्धतीने जीवनाचे तत्वज्ञान मांडलेले असायचे. माहेर, संसार, शेती, माती, कापणी, मळणी, सण-समारंभ, निसर्ग हे त्यांच्या कवितांचे विषय असतं. खान्देशी/लेवा गणबोली भाषा आणि तिथला परिसर त्यांच्या कवितांमधून आपल्यापर्यंत पोहोचतो. झाडं, फुलं, पानं, पक्षी, प्राणी, नदी, वेली या सर्वांशी त्या कवितेतून संवाद साधायच्या. माहेरच्या रस्त्यात असलेलं शेवरीचं झाड थोडं मोठं झाल्यावर त्या त्याच्याजवळ थांबून, ‘केवढी मोठी झाली व तू!’ अशी विचारपूस करायच्या. शेतामध्ये असलेल्या जुन्या वडाच्या झाडाला, ‘असे बाप्पा, तू युगाचा उभा, पिढी पिढीचा अन् लांब्या दाढीचा! त्याच्या पारब्यांना पाहून त्याच्याशी असं बोलायच्या, तर वाड्यातील निंबाच्या वृक्षाला, ‘निंबाजीबोवा’ व गुलमोहराच्या झाडाला ‘फुलाजी महाराज’ असं म्हणायच्या, तर केळीच्या बागेतील घड आलेल्या केळीला बघून म्हणायच्या ‘लेकरं कडेवर घेऊन उभी, कशी माझी लेकुरवाळी रंभा!’ आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टीबद्दल त्याचं अत्यंत बारीक निरीक्षण असायचं.  

 

 ‘अशी धरित्रीची माया, असे तिले नाही सीमा, दुनियाचे सर्वे पोट तिच्यामधी झाले जमा’ असं म्हणत धरती माता सर्वांची पोशिंदी कशी आहे, हेही त्या काव्यातून सांगत.  पहिल्या पावसावर कविता करताना त्या म्हणत, “आला पहिला पाऊस शिपडली भुई सारी, धरतीचा परिमय माझं मन गेलं भरी, शेतात कोंब टरारून वरती आले की, शेताला गहिवरून येते ‘..... शेत जसं अंगावरती शहारे.”

 

 

संगीत दिग्दर्शक व गायक दत्ता चौगुले आणि माधुरी आशिरगडे यांची निर्मिती असलेला  "खानदेशचा मळा आणि मराठवाड्याचा गळा" हा सांस्कृतिक कार्यक्रम बहिणाबाईंच्या काव्यरचनांवर आधारित असून मराठवाड्यातील गायकांच्या आवाजात सादर केला जातो.

 

माधुरी शानबाग यांनी बहिणाबाईंच्या काव्यांचा इंग्रजी अनुवाद केला आहे. त्या काव्यसंग्रहाचे नाव आहे ‘फ्रॅग्रन्स ऑफ दि अर्थ. या पुस्तकात बहिणाबाईंचे अल्पचरित्र, आचार्य अत्रे, बा.भ.बोरकर, पु.ल.देशपांडे, इंदिरा संत यांनी लिहिलेली स्फुटे आणि मालतीबाई किर्लोस्कर व प्रभा गणोरकर यांची समीक्षा देखील आहे.  माधुरी शानबाग यांच्या आधी प्रा. के.ज.पुरोहित यांनीही बहिणाबाईच्या निवडक कवितांचा अनुवाद केला होता. तसेच दूरदर्शनने बहिणाबाईंवर एक लघुपट तयार केला होता. तर अतुल पेठे यांनी देखील बहिणाबाईंच्या कवितांवर आधारित लघुपट तयार केला होता. बहिणाबाईंच्या कवितांचा शैक्षणिक अभ्यासक्रमातही समावेश असतो. 

 

 

स्वत:च्या प्रतिभाशक्तीची कोणतीही जाणीव नसताना आपल्या रोजच्या जगण्यातून आणि सहजधर्म म्हणून बहिणाबाईंनी काव्य रचना केल्या होत्या. वयाच्या एकाहत्तराव्या वर्षी जळगावात ३ डिसेंबर १९५१ रोजी त्यांचा मृत्यू झाला.

 

- content@yuvavivek.com

 

 

लेखक: 

No comment

Leave a Response