Primary tabs

भीमपराक्रमी प्रियांका...

share on:

‘गिर्यारोहण’ हे क्षेत्र कायम पुरुषप्रधान समजलं गेल आहे. पण, तिला हा समज मान्य नाही. म्हणूनच महिलाही यात कुठेही मागे नाहीत, हे ती जगभरातील उंच शिखरं सर करून सिद्ध कराण्याचा प्रयत्न करत आहे.”

उणे १३ अंश सेल्सिअस तापमान आणि विरळ प्राणवायू अशा प्रतिकूल परिस्थितीत प्रचंड दमश्वास ठेवणाऱ्या साताऱ्याच्या प्रियांका मंगेश मोहिते या ‘एव्हरेस्ट कन्ये’ने अठरा तासांच्या खडतर संघर्षानंतर नेपाळच्या हद्दीतील जगातील चौथ्या उंच ल्होत्से शिखरावर अखेर पाय ठेवला आणि जगातील तब्बल सात उंच शिखरांना पादाक्रांत करणारी जगातील सर्वात तरुण गिर्यारोहणाचा दुर्मीळ मान पटकावला. बुधवार दि. १६ मे रोजी दुपारी दीड वाजता प्रियांकाने या भीम पराक्रमाची नोंद केली. लहानपणी साताऱ्याच्या अजिंक्य तारा गडाच्या निमित्ताने तिला गिरी-भ्रमंतीचा छंद जडला आणि आता जगभरातील उंच शिखरं तिला खुणावू लागली आहेत. वयाच्या २१व्या वर्षी म्हणजे २०१३ साली तिने माऊंट एव्हरेस्टला गवसणी घातल्यानंतर पुढे काय, असा प्रश्न होताच. मग माऊंट ल्होत्से तिला खुणावू लागलं. ८,५१६ मीटर उंचीचं हे शिखर तसं जगातलं चौथ्या क्रमांकाचं उंच शिखर. मात्र, चढाई भलतीच कठीण. एव्हरेस्टनंतर पुढच्या वर्षी ल्होत्से सर करायचं तिनं ठरवलं; पण बदलणार्‍या हवामानानं ती संधी दिली नाही. अखेर चार वर्षांनंतर तिनं ल्होत्से सर केलं. या कठीण शिखरावर तिरंगा फडकावला. 

न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिकणारी ही मुलगी नृत्यातही पारंगत. सातवीतच प्रियांकाने ट्रेकिंगला सुरुवात केली. रोज सकाळी लवकर उठणं, व्यायाम, योगासन, धावणं, ट्रेकिंग असा तिचा दिनक्रमच बनून गेला. जोडीला अभ्यास आणि नृत्याचा क्लास होताच. सातारच्याच यशवंत चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधून तिने बी. एससी. केलं. सुरुवातीला सातार्‍यातील गड-किल्ल्यांचे ट्रेक्स केले. मग इतर जिल्ह्यातील गड-किल्ल्यांचा अभ्यास आणि भेटी सुरू झाल्या. प्रत्येक गड-किल्ल्यांचा इतिहास जाणून घेताना हा गड आपल्याशी संवाद साधतोय, त्याचं सौंदर्य पाहण्यासाठी आपल्याला खुणावतोय, असं नेहमी वाटायचं, असं ती सांगते. तिथवर पोहोचण्याचा हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. प्रियांकाने यापूर्वी अनेक हिमालयीन मोहिमा पूर्ण केल्या आहेत. तिनं काही उंच शिखरं सर केली आहेत. वयाच्या एकविसाव्या वर्षी प्रियांकाने जगातलं सर्वोच्च शिखर मानलं जाणारं एव्हरेस्ट सर केलं होतं. गिर्यारोहणातलं शिक्षण तिनं नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माऊंटेनिअरिंग इथून घेतलं. ‘बंदरपूछ’ या शिखरापासून सुरुवात करत तिचा गिर्यारोहणातला प्रवास सुरू झाला. त्यानंतर ‘फ्रे पीक’, ‘एव्हरेस्ट’ अशा अनेक शिखरांवर तिने चढाई केली. प्रियांका म्हणते, “छत्रपती शिवाजी महाराजांना मी माझा आदर्श मानते. त्यांनी जी यशाची उंची गाठली होती त्याला तोडच नाही. त्यांचा आदर्श ठेवून माझं गिर्यारोहण सुरू आहे.” सह्याद्रीमध्ये तिनं पहिल्यांदा ट्रेक केला होता. त्यानंतर तिला गिर्यारोहणाची आवड निर्माण झाली.

बंगळुरुच्या एका बायोटेक कंपनीमध्ये प्रियांका संशोधक म्हणून काम करते. सकाळी ८ ते संध्याकाळी ५ अशी नोकरी झाल्यानंतर उरलेल्या वेळात ती धावण्याचा सराव करते. वीकेंडला ती रॉक क्लायम्बिंगचा सराव करत असते. तिला जगातली सर्वच आठ हजार मीटर्स उंचीची शिखरं सर करायची आहेत. म्हणूनच येत्या ऑक्टोबर महिन्यात ती मानसलू किंवा मकालू यापैकी एक शिखर सर करणार आहे. प्रियांका महिलांना संदेश देताना म्हणते की, “तुम्ही कधीही स्वतःला कमकुवत समजू नका. जगातली कोणतीही गोष्ट करणं कठीण नसते,” ल्होत्से सर करतानाचा तिला लक्षात राहिलेला एक प्रसंग सांगताना ती म्हणाली की, “मोहिमेच्या अखेरच्या टप्प्यात मी एका गिर्यारोहकाचा मृतदेह पाहिला. तो पाहून मी खूप अस्वस्थ झाले. मनातून खूप भीती वाटत होती. पण, त्यावर मात करत पुढे जाण्याचा निर्धार केला. जिद्दीने चढाई करत ल्होत्से शिखर सर केलं.”

‘गिर्यारोहण’ हे क्षेत्र कायम पुरुषप्रधान समजलं गेल आहे. पण, मला हा समज मान्य नाही. म्हणूनच महिलाही यात कुठेही मागे नाहीत, हे मी सिद्ध करायचा प्रयत्न करत आहे.” एव्हरेस्ट आणि ल्होत्सेच्या वातावरणात खूप तफावत आहे. ताशी १०० ते १५० कि.मी. वेगानं वाहणारे वादळी हिमवादळं, उणे ३० ते उणे ४० अंश सेल्सिअस तापमान, त्यामुळे हिमदंशाचा सततचा धोका. पायाखालील छुप्या हिमदऱ्यांची बेफाम दहशत, तर डोक्यावर सतत होणारा दगडराशींचा वर्षाव, अशा भीषण प्रतिकूल परिस्थितीत तब्बल ८० ते ८५ अंशातली भयंकर चढाई. यात पिण्याच्या पाण्याची समस्या, ऑक्सिजनचा अपुरा पुरवठा असं सारंही होतंच. मात्र, या सार्‍यावर मात करत तिनं १६ मे रोजी ‘ल्होत्से’वर अभिमानाने देशाचा तिरंगा फडकाविला. एक नवीन शिखर सर करायला आता ती सज्ज होत आहे.

- तन्मय टिल्लू

content@yuvavivek.com

लेखक: 

No comment

Leave a Response