Primary tabs

भटकंतीतले अनुभव - भाग १

share on:

महाराष्ट्रातलं भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य हे निसर्गप्रेमींना भटकंतीसाठी आवडतं ठिकाण. अख्खं भीमाशंकर अभयारण्य पालथं घालून तिथला निसर्ग आणि त्या निसर्गाच्या सहवासात राहणारी माणसं यांविषयीचे अनुभव सांगत आहेत कपिल सहस्रबुद्धे...    

परवा येळवली कँप साईटचं फेसबुक पेज पाहीलं. काहींना पाठवलंही, आणि ते जुने दिवस आठवले. फार नाही, १३-१४ वर्षे झाली असतील. ‘रानवा’च्या comfort zone मधुन बाहेर पडायचं हे नक्की झाल होतं. ‘पुढे काय?’ हा प्रश्न मी सोडून सगळे विचारत होते आणि मी अजून भटकण्यासाठी काय संधी आहे हे बघत होतो. आणि भीमाशंकर अभयारण्यात वर्षभर रहायची संधी मिळाली. फार विचार न करता हो म्हटलं. महिन्याचे १५ दिवस तिथे रहायचं. बिबट्याच्या जंगलातल्या खाद्याची काय स्थिती आहे, असा अभ्यास होता. खरं सांगायचं तर भटकायला मिळेल म्हणून मी तिथे जाणार होतो. अभ्यास वगैरे महत्त्वाच्या गोष्टी सरच करणार होते. 
२००३-४ ची गोष्ट आहे. सुरवातीला मुकुल महाबळेश्वरकर आणि नंतर धर्मराज पाटील या दोघांबरोबर अख्खं भीमाशंकर पालथं घातलं. एकही दरी सोडली नाही. बऱ्याच गावांत राहिलो. लोक म्हणायचे, ‘प्राण्यांची जनगणनावाले आले!’ मजा वाटायची.
पण या एक वर्षाने आयुष्याचं चित्र बदललं. लोक आणि निसर्ग यांना वेगळं बघताच येणार नाही, अशी पुस्तकातली वाक्यं रोज दिसत होती. अगदी बारीक बारीक गोष्टींसाठी लोक कसे निसर्गावर अवलंबून आहेत ते दिसत होतं. लोकांच्या बोलण्यातून होणारे बदल जाणवत होते. किसन असवले, ज्यांनी हे सगळं जंगल दाखवलं, त्यांच्या घरात रहाताना आयुष्य किती खडतर आहे, पण त्याला हसत हसत कस जगावं याचंच शिक्षण होत होतं. पक्षी बघायला गेलेला मी माणसं बघायला लागलो होतो.

ऑक्टोबर महिन्यातल्या पौर्णिमेला येळवलीच्या धनगरपाड्यात मुक्काम होता. किसनचे पाहुणे होते ते. म्हातारा-म्हातारी दोघंच राहायचे. आम्ही ट्रानसेक्ट मार्क करत होतो. डिसेंबरमध्ये गरवारे कॉलेज मधील मुलांबरोबर सगळे १९ ट्रानसेक्ट एकावेळी मॉनिटर करण्याचा घाट होता.
तर, दिवसभर कारवीच्या रानात काम करून वैताग आला होता. आंघोळ करायची होती. पाड्यावर आलो, तर घरी हंडाभर पाणी होतं. खाली जाऊन पाणी नव्हतं आणलं. मनात खूप राग आला, पण काही बोललो नाही. शिधा घरात दिला. अंधार होता. वीज पोहोचेल याची आशाच नव्हती. थोड्या वेळाने जेवायचं ताट दिलं आजीने. पहिला घास खाल्ला आणि कळ टाळक्यात गेली. भाजी तिखट झाली होती! म्हातारा पण म्हणाला, तेव्हा आजींनी बघीतलं. अंधारात मीठाच्या ऐवजी दोनदा तिखटच घातलं गेलं होतं. तिचा जीव कळवळला असेल. पण घरात गुळाचा खडा नव्हता द्यायला. भूक जाम लागली होती. तसंच जेवलो. अंगणात पडलो होतो. मजबूत थंडी होती. चांदणं पसरलं होतं. तेवढ्यात एका बाईचा रडण्याचा आवाज आला. पाहीलं तर दुसऱ्या घरातला सुसंवाद होता. थोड्या वेळाने सगळं शांत झालं. जाग आली, तर एक माणूस तेल मागायला आला होता. तेल घेतलं आणि गेला. आजींना रात्रीचं रडणं सांगितलं, तर त्या म्हणाल्या, “हाच मुडदा होता तो! दारू पिऊन रात्री बायकोला मारतो आणि सकाळी औषधपाणी करतो.” मी म्हटलं, “एवढा मार खाण्यापेक्षा सोडून का नाही देत?” आजी पटकन म्हणाल्या, “एकट्या बाईला जगू द्यायची नाही लोक. कसा का असंना, टिळा हाय तर डोळं वर कऱून बघत नाही कुणी.’’ विषय संपला. आम्ही पुढ गेलो. ३-४ महीन्यानी कळलं की तो दारुडा दरीत पडून गेला. एकदम आजीचं वाक्य आठवलं. त्या दिवशीचं वाक्य ४ महिन्यांनी काळीज चिरून गेलं. मनात प्रश्नांचं काहूर उठलं. अजूनही ते तसंच आहे!
तर, बिबट्याच्या या अभ्यासात आणि नंतरही अनेक अनुभव आले. लिहायचा मुड लागला की, ते तुम्हाला वाचायचा त्रास देईनच!

 

- कपिल सहस्रबुद्धे,

पुणे

९८२२८८२०११

content@yuvavivek.com

लेखक: 

No comment

Leave a Response