Primary tabs

भटकंतीतले अनुभव - भाग २

share on:

दि. १ जून २०१६. आज जरा (जास्तच) लवकर डोळे उघडले. मागच्या लिखाणानंतर इतक्यात काही लिहीन असंं वाटलंं नव्हतंं. ते खूप उत्स्फूर्त होतंं. पण नंतर वेगवेगळे प्रसंग आठवतच राहिले. भीमाशंकरला जाण्याआधी १५-२० दिवस आंध्रप्रदेश मधील चेंचू जनजाती राहतात तिथे भटकण्याची संधी मिळाली. श्रीशैलम  हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक. त्याच्या आजूबाजूलाच पसरलंय भलंमोठं जंगल आणि त्यात रहातात हे चेंचू लोक. मुख्य समाजापासून दूर, स्वतःच्याच मस्तीत जगणारे.

पहिल्यांदाच एकटा सह्याद्रीच्या बाहेर जाणार होतो. विवेक, संजय, उत्कर्ष, नलावडे सर, अंकुर यानी जे जंगल वाचायला शिकवलं त्याची पहिली परिक्षाच होती. तिथल्या वन विभागाला वन पर्यटन आराखडा बनवायचा होता. मला फिल्ड वर्क करुन रिपोर्ट द्यायचा होता. बस्स! मी 'हो' म्हणालो. वन पर्यटन आराखडा कशाशी खातात हे काहीच माहीत नव्हतंं. त्या वेळी भटकणे हे एकच उद्दीष्ट होतंं आयुष्याचंं. सकाळी मी हैद्राबादला पोहोचलो. तेव्हा बस हेच आवडतंं वाहन होतंं. धोपट घेतलंं की निघालंं. आरक्षण वगैरे नो भानगड! तिथे गेल्यावर साहेब ११ वाजता भेटतील असंं उत्तर मिळालंं. IFS अधिकाऱ्याला एकट्याने भेटायचा पहिलाच प्रसंग होता आणि हे उत्तर ऐकण्याचाही. रानावनात हे काम वरील पैकी कोणी करायच? आपण फक्त भटकणे. नविन परिस्थितीची जाणिव झाली. पण साहेब फार जिंदादिल निघाले. सगळे सोपस्कार पटकन करून दिले. २ वाजता एस. टी. स्टँँडला जाणारी शेवटची बस गेली होती आणि दुसऱ्या दिवशी महाशिवरात्र होती. तुम्हीच कल्पना करा. एकाने सांगितलं की समोर उभ्या बसने एका गावात जा, तिथेच बस मिळेल सहा वाजता. हिंमत करून चढलो. भाषा येत नव्हती, आपण कोणत्या गावात पोहोचणार याची कल्पना नव्हती. ५.४५ ला पोहोचलो. बस यायची होती. थोड्या वेळाने ती आली. कंडक्टर म्हणाला फक्त टपावर जागा आहे. महिलांना त्याने कसंंतरी आत घेतलंं. पुरषांवर कसा अन्याय होतो बघा! पण तो एक जबरदस्त अनुभव होता. लोक सोडत आम्ही जात होतो. ९ वाजता श्रीशैलमला पोहोचलो. ३ तासात एकही दुसरी एसटी दिसली नाही. पाताळगंगेपाशी आल्यावर त्यांंनी बस मधे घेतलंं. १००० मीटर सरळ खाली उतरून परत वर चढायचंं होतंं. मला तर आत जायचंंच नव्हतंं. पण मन मोडावंं लागलंं. श्रीशैलमला एकदम royal treatment मिळाली. मी साहेबाचा माणूस होतो. एवढ्या गर्दीत वेगळी रूम, थेट पुजारी जिकडून जा ये करतात त्या दरवाजाने जाऊन दर्शन. साला में तो सातवे आसमान पर!!!!

त्या दिवशी एक गार्ड बरोबर दिला. आता १५ दिवस तोच 'सगळंं' होता. मस्त माणूस. त्याला थोड हिंदी यायचंं. परत एसटीने आम्ही कामाच्या गावात आलो. जंगलाच्या सीमेवर होतंं ते. नंतर फक्त चेंचू लोकांचे पाडे होते. पहीले दोन दिवस जवळचा भाग बघणंं, कामासाठी माणसं शोधणंं यात गेले. तिसऱ्या दिवशी खऱ्या जंगलात शिरलो. भारताला 'जम्बुद्विप' का म्हणतात याचा प्रत्यय येत होता. एका दिवसात २०-२२ अस्वलंं दिसली. आम्हाला एकूण ३ ट्रेल नक्की करायचे होते. ७-८ दिवस फिरून ते मार्क केले. यातले दोन अनुभव कायम स्मरणात रहातील. ५ व्या दिवशी रात्री गार्ड दोन माणसांंना घेऊन आला. मला वाटलंं मित्र असतील. त्या दोन माणसांंनी माझी चौकशी सुरु केली. छान हिंदीत बोलत होता तो. पण........ १० मिनिटांनी त्याने त्याची रायफल बाहेर काढली. मला म्हणाले, फार आत जंगलात यायचंं नाही. प्राणी-पक्षी सोडून इतर काही दिसलंं तर बघायचंं नाही. माझी जाम टरकली होती. दरदरून घाम फुटला होता.नंतर ते गेले. गार्ड म्हणाला हे नक्षलवादी होते. मी फक्त वाचून होतो. जंगलाच्या रोमँटीक कल्पना मोडल्या होत्या. गार्डबरोबर रात्रभर बोलत बसलो.
त्या दिवशी पहिल्यांदा मरणाची भीती वाटली. पण सुर्योदयात फार ताकद आहे, असंं म्हणतात. नवा दिवस नवीन आशा घेऊन आला. त्याच उत्साहाने आम्ही जंगलात गेलो. मी जिथे रहायचो त्या बाई हॉटेल चालवायच्या म्हणजे टपरी. त्यांच्याकडे डबा घ्यायचो. तिकडे सकाळी पुरी खायची पद्धत आहे. पण मला ती आजिबात आवडायची नाही. त्यामुळे बराच डबा परत यायचा. रात्री इडली वगैरे असायचंं ते मी चापून हाणायचो. तिसऱ्या दिवशी त्यांंनी मला वेगळा डबा दिला. गार्ड व इतरांंना वेगळा. दुपारी उघडला तर त्यात डोसे होते. संध्याकाळी परत गेलो. त्यांंनी डबा उघडून बघितला आणि फक्त हसल्या. २-३ दिवसांंनी मी विचारलंं सकाळी वेगळे डोसे करायला तुमचा वेळ जात असेल जास्त. नका करु. त्या हसल्या आणि म्हणाल्या मला मुलगा असता तर तुझ्याच वयाचा असता. त्याच्यासाठी केलंंच असतंं. त्यांच्या डोळ्यात टचकन पाणी आलंं.
असा हा देश आणि इथली माणसं. आणखी काही सुचत नाहीये. पुन्हा लिहीन!

- कपिल सहस्रबुद्धे, पुणे

yuvavivek@gmail.com

 

लेखक: 

No comment

Leave a Response