Primary tabs

विनोदाचा बादशाह हरपला!

share on:

विलक्षण अभिनय कौशल्य, दिलखुलास हास्य आणि विनोद बुद्धीच्या जोरावर नव्वदचे दशक गाजवणारे ज्येष्ठ अभिनेता कादर खान यांचे काल वृद्धापकाळाने निधन झाले. आपल्या सर्वच भूमिकांमधून प्रेक्षकांना त्यांनी खळखळून हसवले आहे.

सन १९४२ सालची गोष्ट, साधारण ९-१० वर्षांचा एक मुलगा नमाज पढायला म्हणून घरातून बाहेर पडत असे मात्र मशिदीत न जाता तो निरव शांतता आणि निर्मनुष्य असणाऱ्या स्मशानभूमीत जाऊन एकटाच चित्रपटातील संवाद म्हणायची हौस पूर्ण करत असे. त्याच दरम्यान ‘रोटी’ या चित्रपटात अभिनेता म्हणून काम केलेले अशरफ खान हे ‘रोमिओ-ज्युलियट'वर आधारित नाटक बसवत होते. त्याचे नाव होते 'वामक-आजरा'. या नाटकात ९ वर्षाच्या प्रिन्सच्या भूमिकेसाठी अशरफ खान एका लहान मुलाच्या शोधात होते. एकदा त्यांनी या लहानग्याला आपले हे अभिनयाचे उद्योग करताना पाहिले.त्या मुलाला जवळ बोलावून त्यांनी त्याला त्याचे नाव विचारले. ‘कादर खान’! तो लहानगा उत्तरला. त्यांनी जेव्हा कादर खान यांना त्या भूमिकेसाठी विचारले तेव्हा 'पण मला तर अभिनयाबद्दल काहीच माहित नाही', असे उत्तर कादर खान यांनी दिले. त्यावर, 'मी शिकवतो तुला,' म्हणून अशरफ खान यांनी कादर खान यांना अभिनयाचे धडे द्यायला सुरुवात केली. आणि बरोबर एक महिन्यानंतर कादर खान यांनी 'वामक-आजरा' या नाटकात यंग प्रिन्सची भूमिका साकारली. त्यावेळी त्यांनी केलेला अभिनय प्रेक्षकांना इतका आवडला की प्रेक्षकांनी उभं राहून टाळ्या वाजवत त्यांच्या अभिनयाला दाद दिली. आणि अशाप्रकारे त्यांच्या अभिनयाची सुरुवात झाली. 

कादर खान यांचा जन्म २२ ऑक्टोबर १९३७ रोजी काबूलमध्ये झाला. लहानपणापासूनच त्यांना अभिनयाची, लेखनाची आवड होती. लहानपण गरिबीत घालवलेल्या कादर खान यांनी प्रचंड मेहनत घेऊन चित्रपट सृष्टीत अशी ओळख निर्माण केली की, त्यांनी चित्रपट क्षेत्रातून निवृत्ती घेतल्यानंतरही ते तेवढेच चाहत्यांच्या लक्षात राहिले जेवढे आधी होते. त्यांनी १९७३ मध्ये दाग या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले.

आपल्या कारकिर्दीत त्यांनी जास्तकरून सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिका केल्या. गोविंदा आणि कादर खान यांची विनोदी जोडी प्रेक्षकांना खूप भावली. गोविंदासोबत त्यांनी भूमिका केलेले राजा बाबू, दुल्हे राजा, कुली नं १, आँँखे हे एव्हरग्रीन चित्रपट ठरले. कादर खान यांचा बुलंद आवाज आणि त्यांचे  विनोदाचे टायमिंग हे अफलातून होते. एकूण चार दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी ३०० हून अधिक चित्रपटांत त्यांनी काम केले आहे. त्यांचा २०१५ मध्ये आलेला 'दिमाग का दही' हा चित्रपट शेवटचा ठरला.   

'कुली, मुकद्दर का सिकंदर, लावारिस, शराबी आणि अमर-अकबर-अ‍ॅँथनी’ सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांसाठी त्यांनी संवाद लेखन केले. कादर खान यांना तीन वेळा फिल्मफेअर पुरस्कार तर २०१३ मध्ये 'साहित्य शिरोमणी' पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.

युवाविवेक परिवारातर्फे त्यांना भावपूर्ण आदरांजली!

- युवाविवेक

content@yuvavivek.com

 

 

 

लेखक: 

No comment

Leave a Response