ज्येष्ठ मराठी लेखिका, कवयित्री व साहित्यसमीक्षक अशी ख्याती असलेल्या प्रा. डॉ. प्रभा गणोरकर यांचा आज जन्मदिवस. त्यानिमित्त त्यांच्या साहित्य लेखनाचा या लेखातून घेतलेला हा मागोवा...
प्रभा गणोरकर यांचा जन्म ८ जानेवारी १९४५ रोजी अमरावती येथे झाला. त्यांनी शाळेत असतानाच कविता लिहायला सुरुवात केली होती. त्या लहान असताना त्यांच्या भावाला ऐकवण्यासाठी त्यांनी द्वारका ही कविता लिहिली होती. ती त्यांची सर्वात आवडती कविता आहे. मानवी मनाला लगेच भावातील अशा उपमा त्यांच्या कवितांमध्ये वापरलेल्या दिसतात.
मराठी साहित्याचे शिक्षण घेत असताना त्यांनी इंदिरा संत, केशव सुत, पाडगावकर, करंदीकर, बालकवी, बापट, बोरकर, मर्ढेकर अशा अनेक कवींच्या कवितांचा अभ्यास केला. परंतु त्यांच्यावर बोरकर आणि इंदिरा संत यांचा जास्त प्रभाव दिसतो.
प्रभा गणोरकर यांच्या मते 'कविता म्हणजे वाक्य नसून, ती मानवी मुल्यांची अभिव्यक्ती असते.’ त्यांच्या आतापर्यतच्या प्रसिद्ध लेखनामध्ये व्यतीत, विवर्त, व्यामोह, किनारे मनाचे, एकेकाची कथा, बोरकरांच्या निवडक कविता, मराठीतील स्त्रियांची कविता, शांता शेळके यांच्या निवडक कविता इत्यादींचा समावेश आहे. चि. त्र्यं. खानोलकर यांच्या वाङ्मयातील शोकात्मभाव' या विषयावर त्यांनी प्रबंध लिहून डॉक्टरेट मिळवली.
प्रभा गणोरकर यांना शांता शेळके पुरस्कार, पुणे येथील साहित्यप्रेमी भगिनी मंडळातर्फे दिला जाणारा काव्ययोगिनी पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषदे तर्फे भा. रा तांबे पुरस्कार आणि कृष्ण मुकुंद पुरस्काराने सन्मानित केले आहे.
प्रभा गणोरकर या ज्येष्ठ साहित्यिक व समीक्षक म्हणून विशेष प्रसिद्ध आहेत. प्रभा गणोरकर यांना जन्मदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा आणि युवाविवेकच्या वाचकांसाठी त्यांची ही एक छानशी कविता
माणसाला माणूस दिसत नाही
अशी गडद संध्याकाळ
जवळपास रात्रच
पण बोळांतून गल्ल्यांतून घराकडे वळत गेलेली
पायाखालची वाट दिसत जाते
रस्त्यावर दिवे नसतानाही
पायांना सापडत जाते
जुन्या घराचे सारवलेले अंगण
वर्षानुवर्षे तेल पिऊन गुळगुळीत झालेल्या
दरवाजाचा काळा मखमली स्पर्श
वेचीत माझे हात दार ढकलतात
साखळी वाजते
आतून हळू आवाज येतो
आलीस बाई, ये.
- युवाविवेक
No comment