Primary tabs

साधनेतून ‘सिद्धी’कडे...

share on:

‘संगीत अभिनेत्री' म्हणून स्वतःची ओळख निर्माण केलेली आणि ‘सारेगमप'च्या मंचावरून अवघ्या महाराष्ट्राला परिचित झालेली सिद्धी बोंद्रे ही रत्नागिरीची एक युवा गायिका. तिच्यातला माणूस आणि कलाकार उलगडणारी ही छोटीशी मुलाखत...           

संगीतविश्वात तुझा प्रवेश कसा झाला? तेव्हापासून आतापर्यंतची तुझी एकंदर वाटचल जाणून घ्यायला आवडेल.

मी तसं म्हटलं तर सहा वर्षांची असल्यापासून गाते. पण संगीताचं औपचारिक शिक्षण जरा उशिरा सुरु झालं. शास्त्रीय संगीतातल्या माझ्या पहिल्या गुरु म्हणजे सौ. मुग्धा भट-सामंत या होत. त्यांच्याकडे २ वर्षं शिकल्यानंतर सध्या मी पं. निवृत्तीबुवा सरनाईक यांचे शिष्य प्रसाद गुळवणी यांच्याकडे जयपूर अत्रौली घराण्याचं शास्त्रीय गायनाचं शिक्षण घेत आहे. नाट्यसंगीताचे धडे मला सुप्रसिद्ध हार्मोनिअम आणि ऑर्गन वादक मकरंद कुंडले आणि पं. विश्वनाथ कान्हेरे यांच्याकडून मिळाले. सध्या मी मुख्यतः शास्त्रीय संगीत शिकते आणि त्याला जोडून नाट्यसंगीतही शिकते. लहानपणापासून संगीत शिक्षणासाठी माझ्या घरच्या सगळ्याच माणसांचा मला भरपूर पाठिंबा मिळत राहिला आहे. सांगीतिक जडणघडणीसाठी घरात जे एक पोषक वातावरण असावं लागतं, ते मला लहानपणापासून मिळालं. माझे आईवडील आणि माझे आजोबा माझ्या गाण्याच्या बाबतीत माझ्यापेक्षाही जास्त सतर्क असतात. 

संगीत नाटकांमध्ये काम करण्याच्या तुझ्या अनुभवांबद्दल सांग…

खरं तर मी अपघाताने संगीत नाटकांमध्ये आले. संगीत रंगभूमीवर मला काम करायची संधी मिळेल असं अगोदर कधीच वाटलं नव्हतं. पण आज मला निश्चित असं वाटतंय की, संगीत नाटकांमध्ये काम करताना जुन्या काळातली कलात्मक श्रीमंती मला अनुभवायला मिळते आहे. मी ‘संगीत मत्स्यगंधा' नाटकात ‘सत्यवती', ‘संगीत मानापमान' नाटकात ‘भामिनी', ‘संगीत स्वयंवर' नाटकात ‘रुक्मिणी' आणि ‘संगीत धाडिला राम तिने का वनी' या नाटकात 'कैकयी'ची भूमिका केली आहे. अभिनयाच्या दृष्टीने मला सत्यवतीची भूमिका विशेष आवडली, तर गाण्याच्या दृष्टीने रुक्मिणीची भूमिका आवडली. लहानपणी मी बालनाट्यांमध्ये कामं करायचे. त्यामुळे अभिनयकला तशी लहानपणापासून होती. त्याला गायनाची जोड नंतर मिळाली. गायक-नट हे खूप भाग्यवान असतात कारण गायन आणि अभिनय या दोघांची उत्तम सांगड रंगमंचावर घालता येते. ‘फक्त गाण्यासाठी’ वा ‘फक्त अभिनय करण्यासाठी’ जी तयारी करावी लागते त्यापेक्षा जरा वेगळी तयारी संगीत नाटकांमध्ये काम करण्यासाठी लागते. कारण सगळेच नट हे गायक नसतात आणि सगळेच गायक हे नट नसतात. संगीत नाटकांमध्ये अभिनयकौशल्याबरोबरच सांगीतिक व्यवधानं सांभाळण्याचं कसब लागतं. गाणं आणि अभिनय हे दोन्ही तितक्याच ताकदीने केलं तरच ते रसिकांपर्यंत पोहोचतं. संगीत नाटकांमध्ये काम केल्याचा माझ्या वैयक्तिक आयुष्यावरही खूप प्रभाव पडला. जुन्या नाटकांतले संवाद,  प्रसंग आणि कथानकं यांचा माझ्या मनावर बराच प्रभाव पडला आणि आपल्या आयुष्यात येणारे प्रश्न कसे सोडवायचे त्याचीही प्रेरणा मिळाली. चार माणसांमध्ये वावरण्याची सवय झाली.

 

'सारेगमप' सारख्या मोठया मंचावर गाण्याचा अनुभव कसा होता? त्याचा तुझ्या सांगीतिक जडणघडणीवर काय परिणाम घडून आला?

तरुण पिढीतल्या प्रत्येक गायकाचं स्वप्न असतं की मला कधी ना कधी 'सारेगमप'च्या मंचावर गायला मिळावं. मला ती संधी मिळाल्यामुळे संगीताबद्दलचं मार्गदर्शन तिथल्या अनेक मान्यवरांकडून तर मिळालंच, पण एकंदर सादरीकरण (Performance) उत्तम होण्यासाठी जे काही तांत्रिक ज्ञान असावं लागतं, ते मला तिथे भरपूर मिळालं. उदा. प्रकाशझोतात कसं उभं राहायचं, माईकवर आवाजाची पातळी कशी सांभाळायची, इत्यादि. ‘स्टेज डेरिंग’ वाढलं. असं काही ज्ञान मला अशाप्रकारे मिळेल याची मला कल्पना नव्हती. शास्त्रीय संगीतामध्ये बसून गावं लागत असल्यामुळे स्टेजवर उभं राहून कसं गावं याचं शिक्षण मला तिथे जाऊन मिळालं.

संगीत आणि करियर या दोघांचा मेळ तू कसा घातलास?

खरं तर संगीत आणि करियर या दोघांमध्ये संघर्षाची वेळ बऱ्याचदा आली. दहावीनंतर मी कॉमर्स शाखेत प्रवेश घेतला होता आणि सी.ए., सी.एस. करायचं मनात होतं. त्यादृष्टीने अभ्यास सुरु असल्यामुळे गाणं थोडं मागे पडलं होतं. पण २०१४ साली ‘संगीत मत्स्यगंधा' नाटकात काम करायची संधी मिळाली. तो माझ्या आयुष्यातला एक ‘टर्निंग पॉईंट' ठरला. आपलं नेमकं शक्तीस्थान आपल्याला माहीत नसतं आणि कुठल्या तरी क्षणी ते आपल्याला अचानक कळतं, तसं त्यावेळी झालं. त्यानंतर संगीतशिक्षणावरच माझं सगळं लक्ष केंद्रित झालं. सध्या माझं अॅकॅडमिक शिक्षण सुरु आहे, पण दोघांमध्ये निवड करायची वेळ आली तर मी संगीतच निवडेन, कारण या क्षेत्रात मी चांगली प्रगती करू शकेन याचा आत्मविश्वास आता मला आला आहे.

एक कलाकार म्हणून स्वतःला घडवण्यासाठी रत्नागिरी हे शहर कितपत अनुकूल वाटतं?            

कोकणच्या मातीतच कला आहे. रत्नागिरी हे कला जोपासणारं शहर आहे. संगीतक्षेत्रातल्या अनेक तज्ज्ञ मंडळींचा सहवास मला लाभला. २०१४ पासून आतापर्यंत माझ्यातल्या कलाकाराला जागृत करण्यात रत्नागिरीचा मोठा वाटा आहे. पण कलाकार म्हणून स्वतःला घडवायचं असेल तर कुठल्याही एका प्रांतात न राहता जिथे जिथे कला आहे तिथे तिथे माणसाने गेलं पाहिजे. त्या त्या प्रांतानुसार असलेलं कलेतलं वैविध्य तिथे तिथे जाऊन अभ्यासलं पाहिजे आणि आत्मसात केलं पाहिजे, असं माझं मत आहे.

तुझे आवडते गायक/गायिका कोण? कोणत्या गायक/गायिकेचा तुझ्यावर विशेष प्रभाव आहे? संगीतातलं पुढे आणखी काय शिकण्याची इच्छा आहे?

प्रत्येक गायक आणि गायिकेची धाटणी वेगळी असते. त्यामुळे आवडीचे गायक-गायिका खूप आहेत. पण विदुषी किशोरी आमोणकर आणि पं. कुमार गंधर्व यांचा माझ्यावर खूप प्रभाव आहे. शास्त्रीय आणि सुगम हे दोन्ही गायनप्रकार अत्यंत लीलया हाताळणाऱ्या अशा भोसले मला विशेष आवडतात. संगीत हा एक महासागर आहे. त्यातलं जेवढं घेऊ तेवढं थोडंच आहे. त्यामुळे जे मला आत्तापर्यंत अवगत झालेलं नाही, ते मला पुढे शिकायला आवडेल. सध्या जरी फक्त शास्त्रीय संगीत मी शिकत असले तरी भावगीत, ठुमरी, लावणी हे सगळे संगीतप्रकर मला पूजनीय आहेत. यातलं जेवढं काही शिकता येईल तेवढं शिकायला मिळावं, असं मला वाटतं.

'हल्लीची पिढी झटपट प्रसिद्धीच्या मागे लागते आणि कलेची साधना त्यांच्याकडून हवी तशी होत नाही' असं म्हटलं जातं. याबाबतीत तुझं मत आणि अनुभव काय? 

वास्तविक 'प्रसिद्धी' आणि 'साधना' या दोघांमध्ये कशाला प्राधान्य द्यायचं तो ज्याचा-त्याचा प्रश्न आहे. काहीजण गायनाचे क्लास लावून मिळणाऱ्या प्रसिद्धीवर समाधानी आहेत, तर काहीजण घरंदाज गायकीचं शिक्षण घेऊनही आपल्यामध्ये काहीतरी अपूर्ण आहे, या विचारात आहेत. पण शेवटी कसदार गायकी, तन्मयतेने केलेला रियाज आणि घेतलेली मेहनत हीच आपल्याला  चिरंतन स्थान देते. अल्प श्रमात मिळालेली प्रसिद्धी ही जेवढ्या झटपट आपल्याला वर घेऊन जाते तेवढ्याच चटकन खालीही आणते. त्यामुळे कुठल्याही कलाकाराने ‘सादरकर्ता’ होण्याअगोदर ‘साधक’ झालं पाहिजे, असं माझं मत आहे.

संगिताव्यतिरिक्त तुझ्या इतर आवडीनिवडी, छंद काय आहेत?

रोजच्या जगण्यातल्या प्रत्येक गोष्टीतला aesthetic sense शोधणं मला फार आवडतं. कुठलीही छोटीशी गोष्ट असो, त्यातली कलात्मकता शोधायला मला आवडते. मी एकांतप्रिय मुलगी आहे. पुस्तकवाचनाचीही मला आवड आहे. पु. लं., वपु काळे, इ. लेखकांचं साहित्य, तसंच रहस्यकथा मला वाचायला आवडतात. विविध देशांमधील पौराणिक आणि ऐतिहासिक साहित्य वाचण्यात मला विशेष रस आहे.

संगीत नाटकांना चांगलं भवितव्य आहे, असं तुला वाटतं का? त्यात कोणकोणती आव्हानं जाणवतात?

मुळात नाटकांमध्ये काळानुरूप होणारे बदल हा संगीत नाटकांच्या विकासातील एक महत्वाचा मुद्दा आहे. सध्याची परिस्थिती पहिली तर ती संगीत नाटकांच्या विकासाला फारशी अनुकूल नाही.दर्जेदार नाटक आणणा-या फार थोड्या संस्था अस्तित्वात आहेत. प्रेक्षकांची बदलती आवड, संगीतात काळानुरूप होणारे बदल आणि सध्याची समाजव्यवस्था  लक्षात घेऊन पठडीला धक्का न लावता केलेली नाट्यपदांची रचना, या सर्व गोष्टी अंमलात आणल्यास संगीत नाटकांचं भवितव्य चांगलं होऊ शकतं. पूर्वीचा काळ बघितला तर गोविंद बल्लाळ देवलांच्या ‘संगीत शारदा’ तसंच किर्लोस्करांच्या  ‘संगीत सौभद्र’ पासून विद्याधर गोखलेंच ‘संगीत स्वरसम्राज्ञी’ तसंच मो.ग.रांगणेकर यांचं ‘संगीत कुलवधू’ पर्यंत झालेला बदल आपल्या लक्षात येतो. नाट्यपदांचा दर्जा कायम ठेवून बदलत्या समाज व्यवस्थेची सुयोग्य मांडणी नाटकाच्या संहितेत केली गेली. त्या काळामध्ये लेखकांनी सूक्ष्म निरीक्षण करून हे शिवधनुष्य पेललं. तशाच प्रकारच्या दर्जेदार संहिता या काळात होणं खूप गरजेचं आहे. त्याचप्रकारे नेपथ्य तसंच सांगीतिक बाजू यांच्यामध्ये आवश्यक ते बदल करून कर्ण आणि नेत्रसुखद सादरीकरण झाल्यास संगीत नाटकाला अधिकाधिक लोकाश्रय मिळेल.

शब्दांकन – हर्षद तुळपुळे

harshadtulpule@gmail.com

 

 

 

लेखक: 

No comment

Leave a Response