Primary tabs

राष्ट्रकवी मैथिलीशरण गुप्त

share on:

'जो भरा नहीं है भावों से जिसमें बहती रसधार नहीं.

वह हृदय नहीं है पत्थर है, जिसमें स्वदेश का प्यार नहीं.'

या ओळी वाचल्या की आठवण येते ती हिंदी साहित्य विश्वातील असाधारण लेखक, राष्ट्रकवी मैथिलीशरण गुप्त यांची. आज त्यांचा स्मृतिदिन...

राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनी, मैथिलीशरण गुप्त यांना हिंदी साहित्यातील योगदानाबद्दल राष्ट्रकवी हा मान दिला. मैथिलीशरण हे देशभक्त होतेच पण जेव्हा ते महात्मा गांधीजींच्या संपर्कात आले, तेव्हा त्यांची देशाप्रतीची भावना आणखी तीव्र झाली. त्यांनी देशभक्तीपर आणि स्वातंत्र्यावर लेखन केले म्हणून त्यांना राष्ट्रकवीचा मान मिळाला नसून ते स्वत: स्वातंत्र्य चळवळीची भाषा बनले, यातून अनेक लोकांना प्रेरणा मिळाली, साहस मिळाले. आणि म्हणून त्यांना राष्ट्रकवीचा मान मिळाला. एकदा व्यक्तिगत सत्याग्रह केल्याच्या कारणास्तव त्यांना १९४१साली जेलमध्ये देखील जावे लागले होते.

मैथिलीशरण हे ‘दद्दा’ या नावानेच ते सर्वपरिचित होते. त्यांचा जन्म ३ ऑगस्ट १८८६ रोजी, उत्तर प्रदेशमधील झाशी जिल्ह्यातील चीरगाव येथे झाला. ज्या हिंदी भाषेत लिहिले वाचले जाते त्याच भाषेला कवितेची भाषा बनवण्यात मैथिलीशरण यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांनी वयाच्या बाराव्या वर्षापासूनच कविता लिहायला सुरुवात केली होती. ब्रज या भाषेत ‘कनकलता’ या नावाने कविता लिहायला सुरुवात केली. पण जेव्हा ते महावीर प्रसाद द्विवेदी यांच्या संपर्कात आले तेव्हापासून ते खड्या भाषेत लिहायला लागले.

यही पशु-प्रवृत्ति है कि आप आप ही चरे,

वही मनुष्य है कि जो मनुष्य के लिए मरे.

‘रंग में भंग’ हा त्यांचा पहिला कविता संग्रह होता. १९१४मध्ये प्रसिद्ध झालेले ‘भारत-भारती’ आणि १९३१मध्ये प्रसिद्ध झालेले ‘साकेत’ या दोन्ही साहित्यकृती आजच्या काळातदेखील अचूक लागू होतात. ‘भारत-भारती’ या पुस्तकात भारताच्या भूतकाळ आणि वर्तमानच्या चित्रणबरोबरच एका चांगल्या भविष्याची आशा होती. म्हणूनच या पुस्तकाचे राष्ट्राच्या उत्कर्षात विशेष योगदान दिले असे म्हणता येईल.

‘साकेत’मध्ये त्यांनी रामायणातील ‘उर्मिला’ या कथानकाच्या माध्यमातून त्या काळातील महिलांच्या परिस्थितीवर भाष्य केले होते. या साहित्यकृतीतून त्यांनी उर्मिलाने केलेला त्याग किती त्रासदायक होता हे दाखवून दिले आहे. त्यानंतर १९३२मध्ये ‘यशोधरा’ ही साहित्यकृती प्रसिद्ध झाली. यातून त्यांची महिलांप्रती असणारी संवेदना जाणवते. याप्रमाणेच ‘पंचवटी’, ‘द्वापर’, ‘झंकार’, ‘जयभारत’ या महत्त्वाच्या साहित्यकृतींपैकी आहेत.

अबला जीवन हाय! तुम्हारी यही कहानी आंचल में है दूध और आंखों में पानी!

मैथिलीशरण यांनी लहान मुलांसाठी देखील काव्य-लेखन केले आहे. त्यापैकीच ‘माँ, कह एक कहाणी’, ‘सर्कस’, ‘ओला’ या काही प्रसिद्ध कविता आहेत. १२ डिसेंबर १९६४रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांना साहित्यातील योगदानाबद्दल भारत सरकारने ‘पद्मभूषण’ पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.

- ज्योती बागल

content@yuvavivek.com

लेखक: 

No comment

Leave a Response