Primary tabs

पर्यावरणशास्त्र - भाग ३: प्रकाशसंश्लेषण (Photosynthesis)

share on:

प्रकाशसंश्लेषण (Photosynthesis) हे परिसंस्थेतलं एक प्राथमिक कार्य. त्याच्यावरच पुढची सगळी जीवसृष्टी अवलंबून असते. अगदी आपण जिवंत आहोत तेही वनस्पती प्रकाशसंश्लेषण करतात म्हणूनच!

प्रकाशसंश्लेषण म्हणजे वनस्पतींच्या पानांनी प्रकाश ऊर्जेचं रासायनिक ऊर्जेत केलेलं रूपांतर होय. सूर्यप्रकाश, पाणी आणि कार्बन डाय ऑक्साईड यांच्यापासून तयार केलेली ही रासायनिक ऊर्जा 'कार्बोहायड्रेट्स' (Carbohydrates) च्या रूपात साठवली जाते. प्रकाशसंश्लेषण (Photosynthesis) हा शब्द Photo आणि Synthesis या दोन शब्दांपासून बनला आहे. Photo म्हणजे प्रकाश आणि Synthesis म्हणजे एकत्र करणे. प्रकाशसंश्लेषणाच्या प्रक्रियेत प्रकाश, कार्बन डाय ऑक्साइड आणि पाणी एकत्र केलं जातं म्हणून त्या प्रक्रियेला Photosynthesis म्हणतात. या प्रक्रियेत उत्सर्जित केला जाणारा पदार्थ म्हणजे ऑक्सिजन. म्हणजेच अन्नपुरवठा आणि ऑक्सिजनपुरवठा या दोन्ही अर्थांनी प्रकाशसंश्लेषण क्रिया मानवासाठी आणि सर्व प्राण्यांसाठी उपयुक्त आहेत.

पृथ्वीवर आलेला सूर्यप्रकाश वनस्पतींमधली हरितद्रव्य असलेली प्रथिनं शोषून घेतात. वनस्पतींच्या पेशींमध्ये असणाऱ्या हरितलवकांमध्ये हरितद्रव्य साठवलेलं असतं. हे हरितद्रव्य सूर्यप्रकाश शोषून घेतं. झाडांची मुळं जमिनीतून पाणी शोषून घेतात आणि पानं हवेतून कार्बन डाय ऑक्साईड शोषून घेतात. सूर्यप्रकाशाच्या सहवासात कार्बन डाय ऑक्साइड आणि पाणी यांचा संयोग होऊन साखरेची निर्मिती होते आणि ऑक्सिजन वायू हवेत सोडला जातो. या प्रक्रियेत पाण्यातून वेगळ्या झालेल्या हायड्रोजनपासून 'निकोटिनामाईड अडेनिन डायन्यूक्लिओटाइड फॉस्फेट' आणि 'अडेनोसीन ट्रायफॉस्फेट' ही ऊर्जेचा साठा करून ठेवणारी दोन संयुगं तयार होतात. कार्बन डाय ऑक्साईडचं साखरेत रूपांतर होण्याच्या प्रक्रियेला म्हणतात. प्रकाश संश्लेषण करणाऱ्या सजीवांना 'स्वपोषी' सजीव म्हणतात.

प्राचीन काळापासून वनस्पतींची मुळं जमिनीतून अन्नग्रहण करतात, असं ज्ञात होतं. १७७२ मध्ये स्टीफन हेलेस या शास्त्रज्ञाने वनस्पती हवेतूनही अन्नग्रहण करतात, आणि या प्रक्रियेत प्रकाशाचाही काही वाटा आहे, असं प्रतिपादन केलं. १७७५ साली प्रिस्टले या शास्त्रज्ञाने वनस्पती हवेतून अन्नग्रहण करताना ऑक्सिजन वायू हवेत सोडतात, असं सिद्ध केलं. १७७९ मध्ये इंजिन हाउस याने असं प्रतिपादन केलं की, वनस्पती सूर्यप्रकाशाच्या सहवासात कार्बन डाय ऑक्साइड ग्रहण करतात आणि ऑक्सिजन हवेत सोडतात. १८०४ साली डी. ससूर यांनी सांगितलं की, वनस्पती एकाच वेळी श्वसन आणि प्रकाशसंश्लेषण या दोन्ही क्रिया करतात. श्वसनक्रियेत वनस्पती ऑक्सिजन घेऊन कार्बन डाय ऑक्साइड सोडतात आणि प्रकाशसंश्लेषण क्रियेत वनस्पती कार्बन डाय ऑक्साइड घेतात आणि ऑक्सिजन सोडतात. सास या शास्त्रज्ञाने १८८७ मध्ये सिद्ध केलं की, प्रकाश संश्लेषणाच्या क्रियेत ग्लुकोजची निर्मिती होते.

- हर्षद तुळपुळे

content@yuvavivek.com

 

लेखक: 

No comment

Leave a Response