Primary tabs

पालावरच्या शाळेची सावित्रीमाई

share on:

बदलत्या आधुनिक जीवनशैलीचा प्रभाव शहराइतकाच ग्रामीण भागातही दिसू लागला असला, तरी भटका विमुक्त समाज आजही लौकिक शिक्षणापासून वंचित आहे. कारण या समाजांना पूर्वापार लागलेलं अस्थिरतेचं आणि दारिद्रयाचं ग्रहण अद्यापही संपलेलं नाही. नळदुर्ग येथील मीराताई मोटे या गेल्या पाच-सहा वर्षांपासून पालावरच्या शाळेच्या माध्यमातून वंचित मुलांसाठी शैक्षणिक कार्य करत आहेत. भटक्या विमुक्तांसाठी जणू त्या आधुनिक सावित्रीमाईच ठरल्या आहेत.

मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये जन्मलेल्या मीराताई मोटे. शिक्षण संघाच्या शाळेत झाल्याने सुसंस्कारित वातावरणात वाढलेल्या. त्यामुळे सामाजिक जाणिवेचं बाळकडू लहानपणीच मिळालं. अन्याय करायचा नाही व अन्याय सहनही करायचा नाही असा प्रतिकारी स्वभाव घेऊन वाढलेल्या मीराताई वयाच्या अठराव्या वर्षी जेमतेम शिक्षण पूर्ण करून नळदुर्ग येथे विवाहबध्द झाल्या. या नवीन कुटुंबाची सून, पत्नी म्हणून नळदुर्ग या ग्रामस्थानी प्रवेश केला. नवीन घर, नवीन माणसं, नवीन समाज, परिसर आणि समाजमानस याचा अभ्यास त्यांनी सुरू केला. घरची सगळी कामं आटोपल्यावर स्वत:चा अभ्यास करू लागल्या. सुरुवातीपासून गणित आणि इंग्लिश विषय आवडायचा. त्यामुळे त्याचा अभ्यास पूर्णवेळ चालू केला.

सासरच्या घराच्या काही फुटांच्या अंतरावर मरगम्मा समाजाची वस्ती होती. येता-जाता मुलं भिक्षा मागताना दिसायची. ती अस्वच्छ असायची. अनेक वर्षं त्या हे दृश्य पाहत होत्या, पण त्यांच्यासाठी त्या काही करू शकल्या नव्हत्या.

त्यांच्या सुखाच्या संसारावर तीन गोंडस फुलं उमलली होती. त्यांच्यामध्ये आयुष्याची आणखी काही वर्षं निघून गेली. मग मुलांच्या जडणघडणीकडे त्या लक्ष देऊ लागल्या. आता मुलं मोठी झाली. स्वत:ची कामं स्वत: करू लागली आणि पुन्हा एकदा त्यांना रिकामा वेळ मिळू लागला. घरातील नवखेपणा गळून पडला. संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी घ्यायला त्या तयार झाल्या. रिकाम्या वेळेमध्ये आजूबाजूच्या मुलांची गणित व इंग्लिश विषयांची शिकवणी सुरू केली. मुलांची संख्या भरपूर होती. त्यांच्याबरोबर वस्तीतल्या मुलांनाही त्या शिकण्यासाठी बोलवत असत. या मुलांची स्मरणशक्ती उत्तम होती. शिकण्यात त्यांना रस वाटू लागला. शिकवण्यास उल्हास येऊ लागला. मुलांच्या मदतीने वस्तीची माहिती मिळू लागली आणि मनामध्ये समाजकार्याची मनीषा जोर धरू लागली.

वस्ती पालकांशी जवळीक वाढली. ते आस्थेने विचारायला येऊ लागले. कधीकधी मीराताई त्यांच्याकडे जाऊ लागल्या, पण म्हणावा तसा वस्तीशी संपर्क होतच नव्हता.

मीराताई सांगतात, ''भटके विमुक्त विकास परिषदेचा कार्यकर्ता उमाकांत शिवाजी मिटकर. नात्याने लहान दीर. या वस्तीसाठी रात्रंदिवस कार्य करत होता. त्यांनी माझ्याकडे येत असलेली मुलं पाहून वस्तीची पूर्ण माहिती दिली आणि हे लोकही आपल्याच समाजाचा एक घटक असून तो वंचित आहेत, त्यापाठीमागे अनेक कारणे आहेत. पण त्यांना आपण मदतीचा हात पुढे केला तर नक्कीच त्यांच्या जीवनात बदल होईल, अशी प्रेरणा त्यांनी दिली.'' मीराताईंच्या मनात विचारचक्र फिरायला लागलं आणि तिने हा विषय पतीच्या कानावर घातला. सुरुवातीला होय-नाही करता करता मीराताईंच्या मनातील वस्तीविषयीची तळमळ पाहून पतीने परवानगी दिली. तसा बाकीच्या मंडळींचाही सावकाश होकार मिळाला.

मुलं आता मोठी झाली होती. पती शेतात काम पाहत होते, पण मीराताईंच्या मागे खंबीरपणे उभे होते. त्यानुसार मीराताईंनी वस्तीत जाण्याचं नक्की केलं आणि उमाकांत मिटकरांच्या प्रयत्नाला यश आलं. भटके-विमुक्त विकास परिषदेच्या 'पालावरची शाळा' आयामाअंतर्गत शिक्षिका म्हणून काम करू लागल्या. जुन्या साडयांपासून तयार केलेले पाल म्हणजे मिराताईंची शाळा सुरू झाली. ही शाळा मुलांच्या सोयीनुसार चालवली जायची. त्याच्या भिक्षा मागण्याच्या वेळी शाळा आली नाही पाहिजे, याची दक्षता आधी घेतली जाऊ लागली. कारण भटक्यांसाठी मुलं हीच संपत्ती असते. लहान मुलांना आलेली भिक्षा आणि पालकांनी दिवसभर फिरून मिळवलेली छोटी-मोठी शिकार हेच त्यांच्या उदरनिर्वाहाचं उत्तम साधन असतं. म्हणून शाळा सोयीनुसार चालवली जाते.

सुरुवातीला लहान मुलांना कसं शिकवावं हे समजेना. कारण मुलांची वयं मोठी, पण शिक्षण नाही. सर्व मुलं एकाच वर्गात. मीराताईंची मुलंच त्यांचे शिक्षक झाले होते. शाळेतून आल्यावर ती मुलांच्या वह्या तपासायची आणि मीराताई पालावरच्या मुलांसाठी अभ्यासक्रम तयार करायच्या. त्यांना आवडेल अशा साधनांचा वापर करायच्या. सुरुवातीला भाषेची अडचण यायची. त्यांच्या भाषेतील एक एक शब्दाचा त्या अर्थ जाणून घेऊ लागल्या. पशू, पक्षी, दगड, झाड हे सर्व त्या मुलांना फार आवडायचं. निसर्ग त्यांना जवळचा वाटायचा. मीराताई त्याचाच उपयोग करून त्यांना शिकवू लागल्या. मीराताईंची मुलंही शिकू लागली.

दैनंदिन वस्तीत जाण्याने पालकांशी घनिष्ठ संबंध निर्माण झाले. बोलण्यात मोकळेपणा येऊ लागला. कमी-जास्तीला थोडीफार मदत होऊ लागली. त्यातून सलोखा निर्माण होऊ लागला, परिणामी त्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे योग येऊ लागले. त्यांच्या चालीरिती-संस्कृती-परंपरा-अंधश्रध्दा-लग्कार्य-जातपंचायत-न्यायनिवाडा यांची माहिती होऊ लागली. मीराताई वस्तीच्या आणि वस्ती मीराताईंची होऊ लागली.

पालावरच्या शाळेत भटक्या विमुक्तांची मुलं शिक्षणाचा धडा गिरवू लागली, तशी मीराताईंविषयीची श्रध्दा वस्तीतल्या लोकांच्या मनात दिसू लागली. अडचणी मांडल्या जाऊ लागल्या. माणूस म्हणून जगण्याचा एकही पुरावा त्यांच्याकडे नव्हता. मीराताईंनी मनावर घेऊन त्यांना आधार कार्ड देण्याचा मानस व्यक्त केला आणि 108 लोकांना आधार कार्ड मिळवून देण्यात यश मिळालं. 35 वर्षांपासून इथे वास्तव्य करत असूनसुध्दा त्यांच्याकडे कोणाचंच लक्ष नव्हतं किंवा कोठेच त्यांची नोंद नव्हती. या कामामुळे मीराताईंचा आत्मविश्वास वाढला आणि त्यांच्याकडे पाहण्याचा घरातील लोकांचा दृष्टीकोन बदलला. या कामासाठी घरच्यांची जास्तीत जास्त मदत होऊ लागली. यजमान तर सर्व बैठकांना येऊ लागले. कामासाठी खंबीर आधार मिळत गेला.

कामातील जिद्द, चिकाटी पाहून उमाकांत मिटकर सरांनी त्यांच्याकडे आणखी तीन शाळा वाढवून दिल्या. त्यांच्या कामाचा व्याप वाढला व वस्तीतील लोकांना मीराताई आपल्यातीलच एक वाटू लागल्या. मीराताई राष्ट्रसेविका समितीच्या वर्गाला जात असत. तेथील प्रशिक्षणाचा उपयोग या मुलींना विविध खेळ शिकायला आणि त्यांच्यावर संस्कार घडवण्यासाठी होत आहे. आज त्यांच्याकडे संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात चालणाऱ्या पालावरच्या शाळांची जबाबदारी आहे. संपूर्ण जिल्ह्यामध्ये भटक्यांची कार्यकर्ती म्हणून ओळख निर्माण झाली. या कामाचा त्यांना खूप आनंद आहे. घरच्यांना - मुलांनासुध्दा त्यांचा अभिमान वाटतो. भटक्या समाजातील मुलं दिसली की त्यांची मुलं त्यांना म्हणतात, ''आई, बघ, तुझी मुलं आली बघ!''

महिलांना बचतीची सवय लावून त्यांनी दोन बचत गटांची स्थापना केली. सध्या धाराशिव जिल्ह्यात चार बचत गट सुरळीत चालू आहेत. महिलांच्या हाताला काम मिळावं म्हणून कौशल्य प्रशिक्षण वर्ग घेतले जातात. महिलांना छोटी-मोठी कामं मिळवून दिली जातात. तसंच महिलांच्या आरोग्यविषयक माहिती-तपासणीसाठी आरोग्य शिबिरांचं आयोजन करण्यात येतं.

वस्तीकामामुळे सामाजिक कार्याची जी प्रेरणा मिळाली, त्यामुळे याच क्षेत्रात पुढे शिक्षण घेतलं पाहिजे, असं मीराताईंना वाटलं. त्यांनी M.S.W.साठी प्रवेश घेतला. खऱ्या अर्थाने सामाजिक सेवा करता यावी, म्हणून अतिशय कमी गरजा ठेवून जगता येतं, हेही त्या शिकल्या.

मीराताई सांगतात, ''भटक्या विमुक्त समाजापासून आणखी एक गोष्ट शिकायला मिळाली, ती म्हणजे जातीसाठी माती खाणारी माणसं पाहायला मिळाली. धर्मपरिवर्तनाची अमाप आमिषं समोर असताना प्रलोभनाला बळी न पडता अत्यंत श्रध्देने ते धर्मावर निष्ठा ठेवतात. नुकताच पार पडलेला गणेशोत्सव सर्वच वस्त्यांवर अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. हा पहिलाच गणेशोत्सव जोरदार साजरा झाला आहे.''

अशा विविध आयामांद्वारे मीराताई भटक्या-विमुक्त समाजाचं आयुष्य प्रकाशमान करण्याचं काम करत आहेत. एक आगळंवेगळं सतीच वाण घेऊन कार्य करणाऱ्या त्या दुर्गाच आहेत.

- संगीता पाचंगे

content@yuvavivek.com

 

लेखक: 

No comment

Leave a Response