Primary tabs

नाती समजून घेताना – भाग ४

share on:

हा दर रविवारचा वाद ठरलेला असायचा. रेणुका माझ्या घरी काम करणारी. धुणं, भांडी, फरशी ही तिची कामं रोजची असायची, पण रविवारी मात्र पंखे पुसणं, जाळ्या काढणं, खोल्यातील कपाटं आवरणं, खिडक्या, दरवाजे पुसणं अशी कामं तिला मी करायला सांगायचे. रविवारी 'तेजांशु', माझा १९ वर्षांचा मुलगा उशीरा उठायचा, उगाच लोळत पडायचा. सुट्टीच्या दिवशी त्याला घाई केलेली अजिबात आवडायची नाही. त्यात रेणुकानं त्याची खोली आवरणं, कपडे धुवायला नेणं, त्याचं टेबल पुसणं किंवा काहीही कामासाठी डिस्टर्ब केलं की, तो नाराजी व्यक्त करायचा, तिला बाहेर पिटाळायचा, ‘काय कटकट आहे’ म्हणून तिच्याकडे कटाक्ष टाकायचा आणि माझ्याशी वाद घालायचा. त्याचा मुद्दा असायचा की, विकेंडला माझं रिलॅक्स होणं, माझी प्रायव्हसी महत्त्वाची की ह्या रेणुकाची कामं?

त्याच्या दृष्टीने या घरकाम करणाऱ्या सर्व्हटंस्ची फार काही किंमत नाही, महत्त्व नाही. रेणुकाची धाकटी मुलगी तापाने फणफणल्याने ती गेले दोन दिवस आली नाही, म्हणून मी तेजांशुला त्याची रूम आवरायला लावली. किचनमधली दोन-तीन कामं सांगितली. त्याने सुरुवातीला कुरकुर केली, पण कामं संपल्यावर म्हणाला, "आई, रेणुकाच्या कामाला मी कमी समजत होतो, पण आज ती आली नाही, तर मला कळतंय की, रेणुकाचं ही आपल्या कुटुंबाशी नातं आहे. हे 'नातं समजून घेताना' माझी चूक झाली”. 

नात्यात बरीचशी वर्तुळं असतात. या वर्तुळाच्या मध्यभागी ‘केंद्रस्थान’ म्हणून आपण असतो. मित्रांनो, पहिलं वर्तुळ असतं कुटुंबातील सदस्यांचं, रक्ताच्या नात्याचं. दुसरं असतं नातेवाईकांचं. त्यापुढचं सर्कल मित्र-मैत्रिणींचं आणि नंतरचं समाजाचं. जीवन जगत असताना कामाच्या निमित्ताने होणाऱ्या देवाणघेवाणीत समाजातल्या बुद्धिजीवी वर्गापासून श्रमजीवी वर्गापर्यंत खूप वेगवेगळी माणसं आपल्या सहवासात येतात. त्यांची आपल्या आयुष्यात असण्याची किंमत, जाणीव, त्यांचं आपलं नातं याचा आपण फारसा विचारही करत नाही. पण हे नातं खूप महत्त्वाचं असतं. तेही आपल्या दैनंदिन आयुष्याशी जोडलेलं असतं. 'सर्व्हंट' म्हणजे ‘सर्व्ह करणारे’ अर्थात सेवा करणारे. 'सेवा' या शब्दातच या नात्याची खोली दडलेली आहे. हे नातं निर्माण होतं ते आपल्या घरात, आजूबाजूला काम करणाऱ्या नोकर माणसांना 'माणूस' म्हणून समजण्यातून. तरुणांनी हे लक्षात घ्यायला हवं की, आपण पैसे देऊन त्यांना कामावर ठेवतो म्हणजे त्यांना गुलाम म्हणून विकत घेतलेलं नसतं. शिक्षणाच्या कमतरतेमुळे, पैशांच्या अभावामुळे ते ही श्रमाची कामं करत असतात. तीही माणसंच असतात. त्यांच्या भावना, विचार, सुख दुःखांची ही किंमत असते हे विसरून चालणार नाही.

काहीवेळेला केवळ पैशासाठी नव्हे, तर आपल्या मालकावरील श्रद्धा आणि विश्वासापोटी आपलं सर्वस्व झोकून देण्यास नोकर माणसं तयार असतात. वेळप्रसंगी मालकावरचा दोषही स्वतःवर घेत असतात. म्हणूनच त्यांच्या अडचणीच्या काळात आपले दोन प्रेमाचे शब्द त्यांना झुंजण्याचं बळ देतात. त्यांना ओळख दाखवणं, त्यांच्याशी बोलणं, त्यांच्या श्रमालाही प्रतिष्ठा देणं हीच ह्या नात्याची खरी किंमत आहे. ते पायाचा दगड आहेत म्हणून तर आपल्या यशाच्या कळसाला किंमत आहे. आपली सुखं, सोयी, चैन, आपला आराम, विश्रांती, घर किंवा ऑफिसमधली स्वच्छता, नीटनेटकेपणा, पाहुण्याचं आगतस्वागत, सरबराई आणि अगदी वेळेवर जेवायला मिळणं, कामाच्या ठिकाणी गाडीने वेळेवर पोहोचणं यासारख्या कितीतरी गोष्टी, ज्यांचा आपण कधी विचारही करत नाही, त्या पूर्ण करणारे हे नोकर आपलं आयुष्य सुखकर आणि सुकर करत असतात. त्यांचं आपलं नातं हे बुद्धी आणि श्रम यांनी हातात हात घालून एकत्र पुढे जाण्याचं असतं. कारण श्रमदेवतेचं पूजन, तिचा आदर हे या नात्यातलं सौंदर्य आहे. याची जाणीव ठेवली, तर मालक-नोकर या नात्यातलं अंतर कमी व्हायला खूप मदत होईल. 

- डॉ स्वाती गानू

content@yuvavivek.com

 

 

 

 

लेखक: 

No comment

Leave a Response