Primary tabs

‘नेकेड’ - समाजमाध्यमांची दुसरी बाजू मांडणारी शॉर्ट फिल्म  

share on:

आज वेगवेगळ्या समाजमध्यमांमूळे जग खूप जवळ आलं आहे. फेसबुक, व्हाट्स अँप, ट्विटर अशा कित्येक माध्यमांनी आपलं आयुष्य व्यापून टाकलं आहे. कित्येकांच्या ओळखी झाल्या, विचारांची देवाणघेवाण झाली. अनेक अनोळखी चेहरे अगदी परिचयाचे बनले. या सगळ्यामुळे कधी आपलं वैयक्तिक आयुष्य सार्वजनिक झालं, ते ही आपल्याला कळलं नाही. त्याचाच दुष्परिणाम म्हणून मग नकळतपणे कित्येकदा आपण कलुषित मानसिकतेचा बळी ठरायला लागलो.

कुणी आपल्या फोटोवर अत्यंत वाईट आणि हीन भाषेत कंमेन्ट करतो किंवा कुणी इनबॉक्सात येऊन फ्लर्ट करतो. काही काही महाभाग तर आपल्या फोटोंचा दुरुपयोग देखील करतात. या सगळ्यावर आपण काय प्रतिक्रिया देतो? तर आपण सरळ दुर्लक्ष करतो. सायबर क्राईम हा इतर गुन्ह्यांसारखाच आहे, हे आपल्या लक्षतच येत नाही. ज्यामुळे असे गुन्हे करणाऱ्यांचे चांगलेच फावते. आणि आपण मात्र बचावात्मक भूमिका घेऊन केवळ दुर्लक्षच करतो.

याच विषयाला अनुसरून राकेश कुमार या दिगदर्शकाने 15 मिनिटांची 'नेकेड' ही अप्रतिम शॉर्ट फिल्म बनवली आहे. सॅण्डी ( कल्की कोलचीन ) ही एक अत्यंत बोल्ड आणि ब्युटिफुल अभिनेत्री. जी तिच्या अभिनयासोबतच कूल आणि बिनधास्त स्वभावासाठी प्रसिद्ध आहे. या अभिनेत्रीच्या मुलाखतीची संधी मिळालेली एक नवखी पत्रकार रिया ( रितांभरा चक्रवर्ती). जी या मुलाखतीची आठवड्यापासून तयारी करते आहे. मात्र या मुलाखती दिवशीच सकाळी सॅण्डीच्या आगामी सिनेमा मधला काही भाग, ज्यात ती नेकेड आहे, तो व्हायरल होतो. अशा वेळी रियाची बॉस तिला ही घटना इन कॅश करायला सांगते. आणि मुलाखतीची संपूर्ण प्रश्नावलीच बदलून टाकते.

रिया ही घटना इन कॅश कशी करते, सॅण्डीची या सगळ्या वरची प्रतिक्रिया काय असते, या घटनेचा त्या दोघींवर काय परिणाम होतो, यासाठी ही शॉर्ट फिल्म पहावीच लागेल. या फिल्ममध्ये एका प्रसंगात जेव्हा रिया सॅण्डीला विचारते की, इंडस्ट्रीमध्ये तुझा बेस्ट फ्रेंड कोण? त्यावर दिलेले सॅण्डीचे उत्तर म्हणजे फिल्म इंडस्ट्रीच वास्तव म्हणता येईल. आणि हा प्रसंग या दोघींनीही 'लाजवाब' साकारला आहे.

सिनेमांमधील बोल्ड सिन वायरल होणं हे आज नवीन राहिलेलं नाही. याचा फटका अनेक अभिनेत्रींना बसला आहे. 2016 ला प्रदर्शित झालेल्या 'पार्चड' या सिनेमातील राधिका आपटेवर चित्रित झालेले काही सिन तर चक्क ब्लू फिल्म्स म्हणून बाहेर पडले होते. या घटनेमुळे राधिका आपटेबद्दल समाजमध्यमांवर अत्यंत वाईट भाषेत टीका देखील केली गेली. काही महाभागांनी तर यांच्यामुळेच देशात बलात्काराचे प्रमाण वाढले आहे, असेही म्हटले. बलात्कार होण्यामागे जर हे कारण आहे, तर 3 वर्षाच्या मुलीवर आणि 70 वर्षाच्या आजीवर होणाऱ्या बलात्कारच काय? याला कारण एकच, ते म्हणजे 'घाणेरडी मानसिकता'. याच विषयावर ही फिल्म भाष्य करते.

कल्की कोलचीन या अभ्यासू अभिनेत्रीसोबत रितांभरा या गोड अभिनेत्रीने फारच सुंदर अभिनय केला आहे. या शॉर्ट फिल्मची संकल्पना देखील तिचीच. एका अत्यंत नाजूक विषयावर भाष्य करणारी ही फिल्म, आपल्या सगळ्यांना एक धडा देऊन जाते. आणि सोबतच आजच्या नाते संबंधावरदेखील प्रकाश टाकते. या सगळ्याचा अनुभव घेण्यासाठी ही फिल्म एकदा तरी नक्की पाहावी. सोबत शॉर्ट फिल्मची लिंक जोडत आहे.

https://youtu.be/R29hoYjAF6w 

 

- अश्विनी धायगुडे

dhaygudeashvini@gmail.com 

 

 

 

लेखक: 

No comment

Leave a Response