Primary tabs

नजूबाई गावित, एक सक्षम लेखिका!

share on:

जे समाजाकडून मिळालं तेच आपल्या लेखनातून समाजाला देणाऱ्या कॉ. नजूबाई गावित यांचा आज जन्मदिवस. समाजातील वंचित, शोषित, पिढीत घटकांसाठी लढा देणाऱ्या या सशक्त लेखिकेविषयी थोडक्यात!

नजूबाई गावित, एक आदिवासी लेखिका! त्यांचा जन्म १० जानेवारी १९५० रोजी धुळे जिल्ह्यातील आदिवासी व भूमिहीन कुटुंबात झाला. घरची अत्यंत गरीब परीस्थिती आणि त्यात १० भावंडे. त्यामुळे त्यांना फक्त चौथीपर्यंतचे शिक्षण घेता आले. हुशार नजूबाईंनी आपल्या आदिवासी समाजाची होणारी पिळवणूक पाहून १९७२ साली चळवळीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. 

राजकीय पक्षाचा पाठींबा असेल, तर चळवळ चलायला मदत होते या हेतूने त्या ‘मार्क्सवादी कम्युनिस्ट’ पक्षात दाखल झाल्या. यातूनच त्यांनी धुळे येथे १९७४ साली ‘महिला श्रमिक सभेची’ स्थापना केली. १९७८ साली जातीच्या प्रश्नावरून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा राजीनामा देवून 'सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष' व 'सत्यशोधक कष्टकरी महिला सभा' स्थापन केली. तर १९८६ साली 'दलित-आदिवासी-ग्रामीण-संयुक्त साहित्य महासभा स्थापन केली. नजूबाई या आदिवासी-दलित-शेतकरी-कष्टकरी सत्यशोधक कम्युनिस्ट चळवळीतील सच्च्या आणि लढाऊ कार्यकर्त्या आहेत. 'अब्राह्मणी साहित्य व कला महासभा' स्थापनेत त्यांनी पुढाकार घेतला होता. 'अब्राह्मणी साहित्य व कला महासभा' स्थापनेत त्यांनी पुढाकार घेतला होता.  

एक गाव एक पाणवठा, विषमता निर्मुलन या सामाजिक चळवळीमध्ये त्या सहभागी होत्या.  तर चांदवड येथील शेतकरी महिला अधिवेशनात त्या आघाडीवर होत्या. आदिवासी महिलांवर होणारा अन्याय रोखण्यासाठी त्यांनी न्यायालयात धाव घेतली, मात्र हिंदू कोड बिल आदिवासी महिलांना लागू होत नाही असा धक्कादायक निकाल न्यायालयाने दिला. या निकाला विरोधात त्यांनी अनेक स्त्री मुक्ती संघटनांना सोबत घेवून हिंदू कोड बिल आदिवासी महिलांना देखील लागू करण्यासाठी आंदोलन केले, मात्र त्यांना त्यात यश आले नाही.

ज्येष्ठ विचारवंत व प्राच्यविद्या पंडित कॉम्रेड शरद पाटील यांच्याशी त्यांचा विवाह झाला आणि त्यांना संघर्षासाठी नवी उर्जा मिळाली. शरद पाटील यांच्याकडून नजूबाईंच्या लिखाणाला प्रेरणा मिळाली. त्यामुळे त्यांचे लिखाण समतेवर आधारलेले असून स्त्रीसात्तक हा त्याचा पाया आहे.

अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून आणि समाजातल्या खालच्या समजल्या जाणाऱ्या समुहातून त्या आल्याने त्यांच्या वागण्यात, जगण्यात तो साधेपणा दिसतो. आदिवासी लोकांच्या न्याय हक्कासाठी संघर्ष करता करता त्यांनी लेखणी हातात घेतली आणि आदिवासींच्या व्यथा मांडल्या. त्यांच्या लिखाणात हल्ली वापरतात तसा बोल्डपणा नसतो, पण आदिवासी स्त्री-पुरुष नात्यातला मोकळेपणा दिसतो. मोहाची दारू पिणारी, पुरुषांशी दोन हात करणारी, कोणत्याही परिस्थितीला न जुमानता संघर्ष करणारी, आपल्याला आवडणाऱ्या पुरुषासोबत पळून जाणारी स्त्री पात्रे दिसतात. असं पळून जाणाऱ्या जोडप्यांच नंतर लग्न लावून दिलं जातं. हे आपल्याला उच्च आणि स्वत:ला शिक्षित म्हणवणाऱ्या समाजात बघायला मिळणं जवळ जवळ अशक्य आहे. पण ते आदिवासी समाजात प्रत्यक्षात घडताना दिसतं, हे विशेष!

स्वातंत्र्यपूर्व लढ्यात इंग्रजांविरुद्ध आदिवासी देखील लढले होते, मात्र त्यांच्या संघर्षाची दखल कोणी घेतली नाही. हीच गोष्ट त्यांनी 'भिवा भरारी' या कादंबरीत मांडली आहे. एका आदिवासी स्त्रीने लिहिलेली भारतातील ही पहिलीच कादंबरी आहे. 'नवसा भिलणीचा एल्गार' ही त्यांची कादंबरी प्रचंड गाजली.  

नजूबाईंच्या लिखाणात अस्सल आदिवासी 'मावची' भाषेचा अविष्कार दिसतो. त्यांचे शब्द, वाक्य रचना, त्यांची संस्कृतीतून त्याचं भावविश्व उलगडतं. सुरुवातीला साधी भाषा म्हणून त्यांचे लिखाण प्रसिद्ध करण्यास काही प्रकाशकांनी नकार सुद्धा दिला होता. पण जेव्हा त्यांची आत्मवृत्तपर कादंबरी आली, तेव्हा या कादंबरीने मराठी साहित्यात चांगलीच खळबळ उडवली होती. या कादंबरीला अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत.

आदिवासी जीवनातील रूढी, परंपरा, चालीरीती, स्त्रियांवर होणारा अन्याय, दारिद्य्र, संघर्षमय जीवन, विवाहपद्धती, सणवार अशा सर्वच गोष्टींचा समावेश त्यांच्या लिखाणात दिसतो. नजूबाईंचे सरळ, साधे आणि ओघवत्या भाषेतील लिखाण वाचकांना सहज भावते.  

- ज्योती बागल

content@yuvavivek.com

 

 

 

 

 

 

 

 

लेखक: 

No comment

Leave a Response