Primary tabs

मास्टर बाबरची शाळा परसदारी

share on:

"स्वामी विवेकानंदांच्या विचारांतून मला प्रेरणा मिळाली. जेव्हा कुठले संकट येते, तेव्हा स्वामी विवेकानंदांचे विचार आणि त्यांच्या मार्गदर्शनाचे मी स्मरण करतो." हेच बाबर अली याच्या यशाचे गुपित.

लहानपणापासूनच गोष्टी किंवा अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विविध क्षेत्रांमध्ये नावाजलेल्या व्यक्‍तींचा परिचय शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांना होत असतो, पण अनेकदा अशा व्यक्‍तींचा विचार फक्‍त अभ्यासापुरताच केला जातो. काही विद्यार्थी मात्र त्याला अपवाद ठरत असतात. खरंतर वयाच्या नवव्या-दहाव्या वर्षी मनसोक्‍त खेळायचे-बागडायचे, मित्र-मैत्रिणींसोबत दंगामस्ती करायची असा दिनक्रम असतो. मात्र पश्‍चिम बंगालमध्ये राहणार्‍या बाबर अली यांचे मन मात्र वेगळ्याच विश्‍वामध्ये रमलेले असायचे. वयाच्या नवव्या वर्षी स्वामी विवेकानंद यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून आपल्याला आयुष्यात नेमकं काय करायचं आहे, याची रूपरेषा बाबर अली आखत असायचा. पश्चिम बंगालमधल्या मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये राहणारा बाबर अली आता २२ वर्षांचा झाला असून लहानपणापासून त्याने बजावलेल्या कामगिरीमुळे तो बालवयापासूनच नावारूपाला आला होता. बाबरची ही यशोगाथा सुरू झाली ती २००२ पासून. नऊ वर्षांच्या बाबरला शाळेत जाण्यासाठी तब्बल दहा किलोमीटरचा रोज प्रवास करावा लागत असे. बाबरला लहानपणापासून शिक्षणाची आवड होती. भरपूर शिक्षण घेऊन मोठं व्हायचं स्वप्न त्याने लहानपणापासूनच बघितलं होतं. बाबरचे वडील मोहम्मद नसिरूद्दिन यांनी बाबरला नेहमीच पाठिंबा दिला. मोहम्मद यांचा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय होता. त्यातून मिळणार्‍या उत्पन्नातून कुटुंबाच्या गरजा पूर्ण केल्या जायच्या. त्यावेळी आर्थिक अडचणी आल्या, तरीदेखील बाबरचे शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी त्यावर मात केली.

बाबरला अभ्यासासाठी जे हवे असे, ते नसिरूद्दिन आणून देत. बाबर मन लावून अभ्यास करायचा. गावातली इतर मुले शाळेत येत नाहीत. गरिबीमुळे त्यांचे आई-वडील त्यांना दुसर्‍या गावात पाठवू शकत नव्हते. बाबरला त्या कोवळ्या वयामध्ये ही गोष्ट खटकत होती. हे चित्र बदलले पाहिजे. मुलांना, त्याच्या पालकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले पाहिजे, असे त्याला मनापासून वाटत असे. बाबरची लहान बहीणदेखील अभ्यासाकडे दुर्लक्ष करायची. त्यामुळे बाबरने मुलांना शिक्षणाचे महत्त्व पटवून त्यांना शिक्षणाचे धडे देण्याचा निर्धार केला. बाबरच्या मनात विचार आला की, जी मुले शाळेत जाऊ शकत नाहीत, त्यांना आपणच शिकवूयात का? बाबरने ठरवून टाकले की, आपण शाळेत जे काही शिकतो, ते गावात आल्यावर मुलांना शिकवायचे. मग अशाप्रकारे बाबर गावातील मुलांचा शिक्षक बनला. आपल्या घरात परसदारी एका पेरूच्या झाडाखाली बाबरने आपली ही शाळा सुरू केली. बाबरची स्वत:ची बहीण आणि अन्य काही मुले त्याचे विद्यार्थी बनले. काही दिवसांमध्येच लहानग्या बाबरने पाहिलेले, उराशी बाळगलेले स्वप्न पूर्ण होऊ लागले. बघताबघता ‘मास्टर बाबर’च्या शाळेची गोष्ट गावभर पसरली. मग शिक्षणाची ओढ असलेल्या पण काही कारणांमुळे शिक्षणापासून वंचित राहिलेली मुले बाबरच्या शाळेत येऊ लागली. वर्गातील मुलांच्या गरजा पूर्ण करण्यात बाबरला खूप कष्ट सोसावे लागले. फळा त्याने कसाबसा उपलब्ध करून घेतला. बाबर आपल्या शहरातील वर्गातून उरलेले, पडलेले खडूचे तुकडे गोळा करून आणायचा, वर्तमानपत्रांतील कात्रणांचा वापर त्याने केला. काम अवघड होते, पण बाबरने संपूर्ण जोर लावलेला होता. मुलांकडून लिहून घेण्याची गरज भासे तेव्हा बाबर रद्दीवाल्याकडे जायचा, वहीची कोरी पाने फाडून आणायचा आणि त्यावर काम भागवायचा. आता बाबरच्या वर्गात हळूहळू अनेक गोष्टी उपलब्ध होऊ लागल्या.

वाचायला जुनी वर्तमानपत्रे, रद्दीतून आणलेली पुस्तके आणि लिहायला कागदही. मुलंही मन लावून शिकू लागली. हे सगळं सुरू असतानाच बाबर शिकण्याकडे कमी आणि शिकवण्याकडे जास्त लक्ष घालू लागला, असे त्याच्या वडिलांच्या लक्षात आले आणि त्यांनी बाबरला ‘वर्ग बंद कर’ म्हणून सांगितले. बाबरने ऐकले नाही. मी शिकवतो, त्याचा माझ्या अभ्यासावर कुठलाही परिणाम होत नाही, असे बाबरने वडिलांना आश्‍वासन दिले. बाबरच्या मास्तरकीची चर्चा आता लगतच्या गावांतूनही होऊ लागली. बाबरच्या शिक्षकांना जेव्हा त्याच्या वर्गाबद्दल माहिती मिळाली, तेव्हा त्यांनीही बाबरची पाठ थोपटली. गावकरीही मोठ्या संख्येने मुलांना बाबरच्या शाळेत पाठवू लागले. वर्षागणिक बाबरच्या शाळेची पटसंख्या वाढू लागली. नसिरूद्दिन यांनी लेकाला शाळेच्या उद्घाटनासाठी सहाशे रुपये दिले. माईक भाड्याने आणला गेला. शाळा सजवली गेली. आईची साडीही या सजावटीत उपयोगी आली. फित कापून शाळेचे उद्घाटन करण्यात आले. ‘आनंद शिक्षा निकेतन’ असे शाळेचे नामकरण करण्यात आले. आता मास्टर बाबर केवळ शिक्षक नव्हता, तर संस्थापक मुख्याध्यापकही बनलेला होता. बाबरच्या शाळेची बातमी जेव्हा वर्तमानपत्रात छापून आली, तेव्हा ती वाचून नोबेल पुरस्कारप्राप्त अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांनी बाबरला ‘शांतीनिकेतन’मध्ये बोलावून घेतले. पश्चिम बंगालचे माजी अर्थमंत्री, तसेच नावाजलेल्या अर्थशास्त्रज्ञांसह अन्य विद्वज्जनांसमोर त्याने तासभर भाषण दिले व आपले शिक्षणाविषयीचे विचार मांडले. त्यावेळेस बाबर आठव्या इयत्तेत शिकत होता. बाबर आणि त्याच्या शाळेची चर्चा आता राज्याच्या राजधानीत कोलकात्यातही होऊ लागली आहे. अनेक संस्था त्यांना आर्थिक मदत करण्यासाठी पुढे सरसावत आहेत.

- सोनाली रासकर

content@yuvavivek.com

लेखक: 

No comment

Leave a Response