Primary tabs

महानायक सुभाषबाबू 

share on:

स्वातंत्र्यपूर्वकाळात एकमेकांच्या प्रेरणेने, प्रभावाने अनेक क्रांतिकारक घडले. असेच एक उदाहरण म्हणजे कलकत्यातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, देशबंधू चित्तरंजन दास यांच्या कार्याने प्रभावित झालेले व्यक्तिमत्व 'नेताजी सुभाषचंद्र बोस'.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म २३ जानेवारी १८९७ रोजी ओडीसा मधील कटक शहरात झाला.  त्यांचे वडील जानकीनाथ हे पेशाने वकील होते. त्यांनी काही काळ सरकारी वकील म्हणून काम केले, नंतर स्वत:ची वकिली केली. ते बंगाल विधानपरिषदेचे सदस्य देखील होते. त्यावेळच्या इंग्रज सरकारने त्यांना 'रायबहाद्दर' हा किताब दिला होता.

सुभाषचंद्र बोस शाळेत शिकत असताना, वेणीमाधव दास या शिक्षकाने त्यांच्यामधील सुप्त देशभक्ती जागृत केली. आणि वयाच्या १५व्या वर्षी सुभाषबाबू गुरूच्या शोधात हिमालयात गेले. तेव्हाचा त्यांचा गुरूचा शोध पूर्ण होऊ शकला नाही, नंतर मात्र त्यांनी स्वामी विवेकानंदांचे साहित्य वाचायला सुरुवात केली आणि त्यांचे शिष्य बनले. 

अन्यायाविरुद्ध लढणे ही त्यांची लहानपणापासूनची प्रवृत्ती होती. प्रेसिडेंसी महाविद्यालयात शिकत असताना, ओटेन हे इंग्रजी प्राध्यापक भारतीय विद्यार्थ्यांशी उर्मटपणे वागत. हे सुभाष यांच्या लक्षात येता त्यांनी त्या प्राध्यापकांच्या विरोधात संप पुकारला होता.   

महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून पुढील शिक्षणासाठी सुभाष १९२१ साली इंग्लंडला गेले. तेथे त्यांनी भारतीय नागरी सेवेच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन सरकारी नोकरी सुरु केली. नेहमी अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या सुभाषने इंग्रजांची चाकरी करायला नकार देऊन नोकरीचा राजीनामा दिला आणि मायदेशी परतले. इंग्लंडहून परतण्यापूर्वीच त्यांनी दासबाबूंना पत्र लिहून त्यांच्यासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्याचबरोबर मुंबईमध्ये जेव्हा सुभाषबाबू महात्मा गांधीजींना भेटले, तेव्हा त्यांनी देखील त्यांना बंगालमध्ये जाऊन दासबाबुंसोबत काम करण्याचा सल्ला दिला. तेव्हा दासबाबू हे महात्मा गांधीजींनी सुरु केलेल्या असहकार आंदोलनाचे बंगालमधून प्रतिनिधित्व करत होते. 

जर व्यवस्था बदलायची असेल, तर आपण स्वत: व्यवस्थेत सहभागी होणे गरजेचे असते. आणि त्यासाठी राजकारणात सक्रीय सहभाग असणे गरजेचे असते. हेच जाणून १९२२ साली दासबाबू यांनी 'स्वराज्य पक्षाची' स्थापना केली. विधानसभेत इंग्रजांना विरोध करण्यासाठी स्वराज्य पक्षाने कोलकाता महापालिकेची निवडणूक लढवली आणि जिंकली देखील. यावेळी दासबाबू स्वत: महापौर झाले व सुभाषचंद्र बोस यांना त्यांनी महापालिकेचे प्रमुख अधिकारी बनवले. या काळात सुभाषबाबूंनी महापालिकेत चालणाऱ्या कामाच्या पद्धती बदलल्या. रस्त्यांची इंग्रजी नावे बदलून त्या रस्त्यांना भारतीय नावे दिली. देशासाठी प्राण अर्पण केलेल्या क्रांतिकारकांच्या कुटुंबियांना महापालिकेत नोकऱ्या देऊ केल्या. आणि अशाप्रकारे कमी कालावधीतच नेताजी सुभाषचंद्र बोस यांची देशातील एक अग्रेसर युवा नेता म्हणून ओळख निर्माण झाली.

नंतर १९२८ साली सायमन कमिशन भारतात आले. या कमिशनला विरोध करण्यासाठी आणि भारताची भावी घटनेचा आराखडा तयार करण्यासाठी ८ सदस्यांची समिती नेमली गेली. पंडित नेहरू हे या समितीचे अध्यक्ष होते तर सुभाषबाबू हे एक सदस्य होते. याचवर्षी कॉंग्रेसचे वार्षिक अधिवेशन कोलकाता येथे झाले होते. यावेळी सुभाषबाबूंनी खाकी गणवेश परिधान करून लष्करी पद्धतीने पंडित नेहरुंना सलामी दिली होती.  

पंडित नेहरू आणि सुभाषचंद्र बोस यांना पूर्ण स्वराज्य हवे होते तर गांधींजी पूर्ण स्वराज्याच्या भूमिकेशी सहमत नव्हते. अखेर वसाहतीचे स्वराज्य यासाठी इंग्रजांना एक वर्षाची मुदत दिली गेली. पण ही मुदत पूर्ण झाली तरीही इंग्रजांनी मागणी मान्य केली नाही. १९३० सालचे वार्षिक अधिवेशन पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली लाहोर येथे झाले. याचं अधिवेशनात २६ जानेवारी हा स्वातंत्र्यदिन म्हणून पाळण्याचे ठरले. त्यानंतर २६ जानेवारी १९३१ साली सुभाषबाबूंच्या नेतृत्वाखाली विराट मोर्चा काढला गेला, ज्यात पोलिसांनी लाठीहल्ला केला. त्यावेळी सुभाषबाबूंना गंभीर दुखापत तर झालीच; शिवाय त्यांना पोलीस कोठडीतही ठेवण्यात आले. याचदरम्यान महात्मा गांधीजींनी सरकार सोबत तह करून सर्व कैद्यांना सोडून देण्याची तसेच भगतसिंग यांची फाशी रद्द करण्याची मागणी केली. परंतु इंग्रज सरकारने ती फेटाळून लावली आणि भगतसिंग आणि त्यांच्या साथीदारांना अखेर फाशी दिली गेली. भगतसिंगांना वाचवू न शकल्यामुळे महात्मा गांधी आणि कॉंग्रेसच्या कार्यपद्धतीवर सुभाषबाबू नाराज झाले.

१९२५ साली गोपीनाथ साहा या क्रांतीकाराला जेव्हा फाशी झाली, तेव्हा सुभाषबाबूंनी इग्रजांकडून त्याचे पार्थिव मागून घेतले व त्यावर अंत्यसंस्कार केले. या घटनेवरून सुभाषबाबू हेच क्रांतिकारकांचे स्फूर्तीस्थान असून यांच्याच सांगण्यावरून हे सगळे घडले, असा अंदाज इग्रजांनी बांधला आणि सुभाषबाबूंना ताब्यात घेऊन त्यांना म्यानमारच्या मांडले कारागृहात ठेवले. इथे असताना त्यांना क्षयरोग झाला होता, पण त्यावर पचारासाठीदेखील इंग्रजांनी त्यांना सोडण्यास नकार दिला. पण जेव्हा त्यांचा त्रास वाढला आणि त्यांचा तुरुंगातच मृत्यू होतो की काय अशी भीती इग्रजांना वाटली, तेव्हा त्यांनी सुभाषबाबूंची सुटका केली. 

 

रासबिहारी बोस यांनी सिंगापूर येथे स्थापन केलेल्या ‘आझाद हिंद सेनेचे’ नेतृत्व नेताजी सुभाषचंद्र यांच्याकडे आले. गांधी ब्रिगेड, आझाद ब्रिगेड, नेहरू ब्रिगेड, सुभाष ब्रिगेड अशा आझाद हिंद सेनेच्या ब्रिगेड होत्या. आझाद हिंद सेनेने अंदमान व निकोबार  ही बेटे जिंकून शहीद व स्वराज्य असे त्यांचे नामकरण केले. १८ मार्च १९४४ रोजी आझाद हिंद सेनेने भारतभूमीवर प्रवेश केला व माऊडॉक येथे  भारताचा तिरंगा फडकवला.

दुसऱ्या जागतिक महायुद्धातील जपानच्या पराभवानंतर त्यांनी रशियाकडून मदत मागण्याचे ठरवले. त्यासाठी ते  विमानाने १८ ऑगस्ट १९४५ रोजी मांचुरियाच्या दिशेने जात असतानाच अचानक त्यांचे विमान गायब झाले. आणि त्यांच्या मृत्यूचे गूढ हे गूढच राहिले.

नेहमी परखड भूमिका घेणाऱ्या सुभाषबाबूंना सार्वजनिक आयुष्यात एकूण अकरा वेळा तुरुंगवासाची शिक्षा झाली, पण यामुळे त्यांच्या देशभक्तीत आणि देशप्रेमात जरा सुद्धा कमी न आणता शेवटपर्यंत त्यांनी आपला लढा चालू ठेवला होता...

- युवाविवेक

content@yuvavivek.com

              

 

  

 

लेखक: 

No comment

Leave a Response