Primary tabs

कोकणातील शेवया

share on:

कोकणातल्या शेवया “Breakfast is the most important meal of the day.” हे वाक्य लहानपणापासून वाचत आले आहे. नाश्ता राजासारखा करावा, दुपारचं जेवण राजकुमारासारखं आणि रात्रीचं जेवण एखाद्या गरिबासारखं करावं असंही आपण सगळे लहानपणापासून ऐकत आलो आहोत. मी बऱ्याच वेळा हे ऐकून सुद्धा कधीच पाळलं नाही, विशेषतः एकटी राहत असताना. माझा नाश्ता म्हणजे काहीतरी पटकन तोंडात टाकायचं. कधी दूध-बिस्किटावर भागवायचं किंवा रात्रीची उरलेली पोळी, अर्धी वाटी भात खाऊन निघायचं. ही सवय बदलली ती लग्न होऊन तळकोकणात आले तेव्हा. माझ्या सासरी ही वरची शिकवण अगदी तंतोतंत पाळली जाते. सकाळी उठल्यावर भरपेट नाश्ता एकदा केला की दिवसभराचं फारसं कोणाला काही टेन्शन नसतं. मला सुद्धा व्यवस्थित नाश्ता करायची सवय लागल्यानंतर बरेच बदल जाणवले, एकतर रात्रभराच्या उपाशी राहण्याने सकाळी बऱ्यापैकी भूक लागलेली असते, त्यामुळे ही भूक शमली की पोट आणि डोकं दोन्ही शांत होतं, दिवसभर चिडचिड होत नाही दुसरं म्हणजे बारीकसारीक पित्ताचे त्रास नाहीसे होतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पोटभर नाश्ता केला की वजन वाढतं हा माझा गैरसमज दूर झाला. लग्नानंतर पहिल्यांदाच मला जसं नाश्त्याला इतकं महत्त्व असतं हे समजलं तसं कधीच न ऐकलेले नाश्त्याचे पदार्थ सुद्धा समजले. माहेर पुण्याचं आणि सासर एकदम तळकोकणात यामुळे असेल पण सुरुवातीला एखाद्या पदार्थाचं नाव ऐकून तो ताटलीत समोर येईपर्यंत माझ्या मनात अनेक शंका यायच्या. बाकी सगळी मंडळी खाण्यापिण्याच्या बाबतीत चोखंदळ असल्याने मनात शंका मात्र नसायची, फक्त कुतूहल असायचं. असाच एक भरपेट न्याहारीचा पदार्थ म्हणजे शेवया. मला या पदार्थाबद्दल पहिल्यांदा कळलं ते माझ्या चुलत नणंद दोन दिवस माहेरी राहायला आल्या होत्या तेव्हा. त्या ज्या दिवशी परत निघणार होत्या, त्या दिवशी सकाळी हा सगळ्यांचा आवडीचा नाश्ता करून त्यांना परत पाठवायचं असं ठरलं आणि सकाळीच सात वाजता ताई आमच्या घरी शेवगा शोधायला आल्या. वास्तविक मी ‘शेवया’ आणि ‘शेवगा’ या दोन्ही शब्दांनी गोंधळले होते. शेवया म्हणजे गहू भिजवून आणि काय काय प्रक्रिया करून करतात व त्याला खूप दिवस लागतात हे मला माहीत होते. त्यामुळे नाश्त्याला शेवया कशा करणार हा प्रश्न होताच आणि सगळे शोधत होते तो शेवगा म्हणजे काय? याबद्दल माझ्या कल्पना न मांडलेल्याच बऱ्या. शेवगा म्हणजे शेवग्याची शेंग इथपर्यंतच माझं ज्ञान होतं त्यामुळे ते न पाजळता मी शांतपणे सगळ्यांच्या मागे-मागे करत होते. ‘शेवयांचा बेत’, ‘छान बेत’, ‘लेकीचे लाड’ असं बोलत आधी माजघराच्या माळ्यावर शेवगा शोधून झाला, तिथे सापडला नाही म्हणून सगळी फौज आमच्या खोलीत आली. तिथल्या माळ्यावर बरीच शोधाशोध करून पण शेवगा काही मिळाला नाही तो परत एकदा माजघरातल्या माळ्यावर शोधल्यावर एकदाचा मिळाला. एव्हाना माझं कुतूहल अगदी शिगेला पोहोचलं होतं. प्लास्टिकच्या पिशवीत व्यवस्थित बांधलेला शेवगा काढल्यानंतर समजलं की शेवया करायचं छोट्या स्टूलएवढं यंत्र म्हणजेच हा शेवगा. चकली पात्र असतं तशातलाच प्रकार फक्त प्लेट भोकाभोकांची, शेवेची असते तशी आणि आकाराने मोठं, वरती दाब द्यायला एक दांडा असतो एवढाच फरक. तरी शेवया नेमक्या कशा असतात आणि या सगळ्या कृतीला नेमका किती वेळ लागेल याबद्दल माझ्या मनात प्रचंड शंका होत्या. आमची दोन वेगवेगळी घरं असली तरी असे खास बेत असल्यावर किंवा सगळे एकत्र जमल्यावर बहुतेक वेळेला सगळे एकत्रच असतो. त्यात घरं सुद्धा मागे-पुढेच असल्याने ते सोयीचं सुद्धा पडतं. आता नाश्ता तिकडेच होणार असल्याने घरी करायला काही विशेष नव्हतं म्हणून मी मदतीसाठी गेले. माझ्या चुलत सासूबाईंच्या घरी माझ्याकडून मदत म्हणून फक्त चिरणं, कातणं एवढंच करून घेतात. मला तिथल्या पदार्थांची आणि पद्धतींची माहिती नाही हे एक कारण आणि मी कधीतरीच गावी जाते हे दुसरं त्यामुळे बऱ्याचदा माझ्यापेक्षा माझी शाळेतली पुतणीच जास्त कामं करते. त्यादिवशी सुद्धा मी जाईपर्यंत तयारी झालेली असणार हे मला माहीत होते आणि तसंच झालं. वहिनींनी तांदळाची उकड काढून ठेवली होती आणि ती एका परातीत घेऊन ताई मळत होत्या. आता या शेवया तांदळाच्या असतात हे एक समजलं. मी सुद्धा ताईंबरोबर बसून मग उकड मळायला घेतली आणि त्या करत होत्या तसे मळलेल्या उकडीचे उभे, लांबट अंडाकृती आकार करून एका ताटलीत ठेवत होते. एकीकडे वहिनींनी एका मोठ्या टोपात पाणी उकळवत ठेवलंच होतं. चार-पाच गोळे झाल्यावर पाणी उकळलं आणि त्याच्यात वहिनींनी हे गोळे घातले. उकडीचे गोळे शिजून पाण्याच्या वर तरंगायला लागल्यावर काकींच्या अनुभवी नजरेने ते शिजलेत म्हणून सांगितलं आणि मग लगबगीने वहिनींनी एकेक करून ते काढून शेवग्याच्या वरच्या भागावर एका खाचीत ठेवले. खाली ताजं केळीचं पान सरकवलं गेलं आणि वरून हळूच दाब देऊन खाली शेवया पडायला लागल्या. एका ठिकाणीच पडून गोळा होऊ नये म्हणून शेवया पाडताना खालचं पान हळूच हलवायचं काम बच्चेकंपनीपैकी कोणीतरी करत होतं. घरात एकूण बारा-तेरा लोकं असल्यामुळे हा कार्यक्रम बराच वेळ चालला. अशा प्रकारे सगळ्यांनी आळीपाळीने शेवया काढल्या. उकड मळून गोळे काढणे, ते पाण्यात उकळवणे, शेवया काढणे हे सगळं काम शिस्तबद्ध पद्धतीने, एका लयीत चालू होतं आणि बरोबर खूप गप्पागोष्टी. आता या शेवया खायच्या कशा? असा प्रश्न माझ्या मनात डोकावतच होता तेवढ्यात दुसरं काम सुरू झालं. ताज्या नारळाच्या रसात गूळ, वेलची विरघळवण्याचं. सगळा प्रकार माझ्या पटकन लक्षात आला. आता लगबग सुरू झाली ती पटापट ताटल्या मांडायची. एकीकडे गरम गरम शेवया पानावर येत होत्या आणि पानावरून ताटलीत. त्यावर वहिनी मुक्तहस्ताने नारळाचा रस वाढत होत्या. बाकीच्यांचं पाहून मी सुद्धा शेवया आणि रस एकत्र कालवलं आणि एक घास घेतला. शेवगा शोधण्यापासून ते शेवया तयार होण्यापर्यंत सगळ्यांच्या उत्साहामागचं नेमकं कारण मला त्या क्षणी समजलं. पोटभरीचा, चवीचा नाश्ता करून माहेरवाशिणी सोबतच सासुरवाशिणी सुद्धा तृप्त झाल्या. घरीच उपलब्ध असलेल्या सामानातून वेगवेगळे पदार्थ कोकणात होतात. त्यासाठी फार वेगळी पूर्वतयारी, खरेदी इत्यादी गोष्टींची गरज नसते. रांधायला थोडेसे कष्ट आणि खूप प्रेम ओतलं की अशा घरी नेहमीच असणारं समान वापरून केलेल्या पदार्थाने सुद्धा खाणारा तृप्त होतो. शेवगा नसला तरी साध्या चकलीपात्रात शेवेची प्लेट घालून शेवया करता येतील. दोघांसाठीच करायचं म्हटलं तरी एकटीला करायला काही अवघड नाही पण काटेकोर नियोजन मात्र लागेल. एखाद्याची, अगदी नवऱ्याची मदत घेऊन चार लोकांसाठी सुद्धा शेवया करणे हे काही फार अवघड काम नाही. फार तर फार सुरुवातीला सवय नसल्यामुळे जरा वेळखाऊ काम होऊन बसेल आणि न्याहारी आणि दुपारचं जेवण याच्या मध्ये खायच्या ‘ब्रंच’ या प्रकारात मोडणारा पदार्थ होईल. पण काही पदार्थ असे एका दोघांनी करण्यासारखे नसतातच, ते सगळ्यांमध्ये मिळून-मिसळून, एकत्र, गप्पागोष्टी करत करण्यासाठीच असतात. शेवया अशा पदार्थांपैकीच एक आहे हे नक्की. - मुग्धा सचिन मणेरीकर

लेखक: 

No comment

Leave a Response