Primary tabs

कौमार्य चाचणी?

share on:

कौमार्य चाचणी’ या अनिष्ट प्रथेची लैंगिक हिंसाचार म्हणून नोंद करण्याचे आदेश राज्याचे गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी नुकतेच दिले, त्याबद्दल सर्वप्रथम त्यांचे आभार. कंजारभाट समाजात नववधूची कौमार्य चाचणी घेण्यात येते. पंचांनी दिलेल्या काळात वराने वधूशी शरीरसंबंध ठेवायचे. त्यावेळी वधूच्या योनीतून रक्तस्त्राव झाला नाही तर ती ‘खोटी.’ म्हणजे ती ‘कुमारीका’ नसून लग्नाआधी तिचे दुसर्‍या कोणाशी शरीरसंबंध होते, असे जाहीर केले जाते. त्यानंतर त्या नववधूच्या हालअपेष्टांचा कधी न संपणारा प्रवास सुरू होतो.

‘कौमार्य चाचणी’ करताना हा विचार केलाच जात नाही की, सध्याच्या काळात मुलींचे आयुष्य बदलले आहे. व्यायाम, अपघात किंवा क्रीडाप्रकारांमुळेही वधूचा योनीपडदा भंग होऊ शकतो. पण, हा विचार इथे केला जातच नाही. कारण, मुळात व्यायाम आणि क्रीडा हे स्त्रियांचे प्रांतच नाहीत, असा या मागचा अतिशय लिंगभेदी विचार. अर्थात, सभ्य समाजात भावनात्मक आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने स्त्री आणि पुरुष दोघेही कुमार असावेत, हा संकेत तसा वाईट नाही. पण, मग त्याची बांधिलकी फक्त स्त्रीचीच का? संसार दोघांचा आहे, तो समानतेच्या नव्हे, तर समरसतेच्या पायावरच होणार हे मान्य. मग सगळ्या शुचिततेचा मक्ता स्त्रियांच्याच माथी का? स्त्रियांनी शारीरिक पातळीवर पावित्र्य जपावेच, पण मग तिच्या पतीच्या बाबतीतही अशी काही चाचणी आहे का? स्त्रीच्या शारीरिक ठेवणीवरून तिला जेरबंद करणार्‍या प्रथा जगभर आहेत. भारतीय समाजातली ‘स्त्री-भ्रूणहत्या’ पद्धत असू दे, इस्लामिक राष्ट्रांमधील बालिकांची योनीपटल कापणारी ‘खत्ना’ पद्धत असू दे. इसाई राष्ट्रांमधील चित्र फार वेगळे नाही. तेथील स्त्रियांना वस्तू समजणारी तसेच गर्भपातविरोध प्रथा आहेच. महिलांच्या नैसर्गिक सौंदर्याची पुरुषांना भुरळ पडू नये, म्हणून त्यांच्या चेहर्‍यावर चित्र-विचित्र भयंकर गोंदणं करणारी पद्धत तर कित्येक ठिकाणी सर्वमान्यच. या सर्व पार्श्वभूमीवर ‘कौमार्य चाचणी’पद्धतीला ‘लैंगिक हिंसाचार’ म्हणून कायदेशीर मान्यता मिळाली, हे महत्त्वाचे आहे. कारण, ज्या देशात देवी म्हणून स्त्री पूजली जाते, तिथेच तिचे पावित्र्य सिद्ध होते.

तरीही वाटते की,

शरीराच्या खाचा-खळग्यात

तुझे पावित्र्य मोजताना, तुझे पावित्र्य शोधताना

त्यांना तुझे माणूसपण उमगेल का?

तुझे स्वत्त्व त्यांना कधी तरी गवसेल का?

 

- योगिता साळवी

सौजन्य – महा एमटीबी

 

लेखक: 

No comment

Leave a Response