Primary tabs

कर्मयोगी

share on:

वयाच्या ६०व्या वर्षी सक्रिय राजकारणातून निवृत्त होऊन नानाजींनी चित्रकूट परिसरातील ५०० गावांत ग्रामविकासाचे काम सुरू केले. त्यांनी उभारलेले ग्रामविकासाचे हे प्रारूप आजच्या तरुण पिढीला नक्कीच प्रेरणादायक आहे. त्यांच्या या सामाजिक कामामुळे त्यांना भारत सरकारने २०१९चा भारतरत्न पुरस्कार दिला आहे. त्या निमित्ताने त्यांच्या कार्याची माहिती देणारा लेख...

ज्यांना भारताच्या भविष्याबद्दल संदेह आहे, देशात बदल होणे शक्य नाही अशी ज्यांची भावना आहे, हा देश चुकीच्या दिशेने जात आहे अशी ज्यांची खात्री आहे, त्या सर्वांनी चित्रकूटला जावे. परिवर्तन म्हणजे काय, कायाकल्प म्हणजे काय, गरिबी दूर करणे म्हणजे काय याचे स्पष्ट दर्शन तुम्हाला चित्रकूटला होईल. देशाच्या उज्ज्वल भविष्यावर विश्वास बसेल.

- पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी.

“नानाजी आ गए और बहुत अंतर पडा बाबूजी। हम बहुत कुछ बता नहीं सकते, इतना कहते है की नानाजी आने के पहले आधा पेट खाते थे, अब पेट भर खाते है।...”

रामसिंह हा शेतकरी मनापासून बोलत होता. चेहऱ्यावर कृतज्ञतेचे भाव, पिढ्यानपिढ्या घरात शेतीचा व्यवसाय. पण पोट कधीच भरत नव्हते. अर्धपोटी राहण्याची सवयच पडली. पावसावर शेती अवलंबून. यामुळे फक्त पावसापुरती शेती करण्याची दृष्टी. पाण्याचे दुर्भिक्ष झाले की जमीन पडून असायची. जमीन अधिक चांगली कशी करावी, पिके कोणती घ्यावीत याचे कधीच मार्गदर्शन झाले नाही. मार्गदर्शन तरी करणार कोण? गावात येण्यासाठी रस्ते नाहीत. पायवाट हाच रस्ता. जगाशी संपर्क मोजकाच. शाळा नाही, शिक्षण नाही, गावापलीकडचे जग नाही या दारिद्र्यात लोक राहत होते. नानाजी देशमुख आले आणि गावाचा कायापालट झाला.

उपयोगी शिक्षण मिळू लागल्याने भौतिक स्तर उंचावला. आयुष्याला दिशा मिळाल्यामुळे भावनिक स्वास्थ्यही आले. शेतीत वर्षभर पीक घेतले जाऊ लागले. भाजी पिकविणे रोख पैसा मिळवून देते, हे समजले. मुख्य म्हणजे शेतीत प्रयोगशीलता आली. जमिनीला समजून घेऊन तिच्या कलाने पिके घेतली जाऊ लागली. पैशाची मिळकत अजूनही तुटपुंजीच आहे. पण स्वास्थ्य भरपूर मिळत आहे. रामसिंहच्या चेहऱ्यावर ते स्वास्थ्य दिसत होते.

नानाजी देशमुख यांच्या नेतृत्वाखाली दीनदयाळ शोध संस्थानमार्फत चित्रकूट येथे राबविण्यात येणाऱ्या 'युगानुकूल नवरचना' कार्यक्रमाचा हा परिणाम होता. चित्रकूट हा मध्य प्रदेश व उत्तर प्रदेश यांच्या सीमेवरील भाग.

नानाजींच्या कामाचे वैशिष्ट्य हे की त्यामागे निश्चित वैज्ञानिक विचार आहे. मझगवाँ येथे पाण्याची तीव्र टंचाई होती. केंद्र सरकारच्या योजनेंअंतर्गत चालविल्या जाणाऱ्या कृषी विकास केंद्रामार्फत नानाजींनी येथे काम सुरू केले. गावकऱ्यांना नुसते शेतीचे प्रयोग शिकविण्यात नानाजींना रस नव्हता. असे लादलेले ज्ञान टिकत नाही, हा त्यांचा अनुभव होता. ज्ञानाची मागणी गावकऱ्यांकडूनच आली पाहिजे. त्यांच्या समस्या त्यांनीच शोधल्या पाहिजेत, त्यावरचे उपायही त्यांनीच सुचविले पाहिजेत. या उपायांच्या अंमलबजावणीतही त्यांचाच सहभाग पाहिजे. आपली भूमिका फक्त मार्गदर्शकाची आणि अडचणीच्या वेळी पडेल ते काम करण्याची. नानाजींची ही दृष्टी त्यांच्या कार्यकर्त्यांनीही नेमकी ओळखली होती. पाण्याचे प्रवाह गावकऱ्यांना माहीत होते. पण ते अडविता येतील ही दृष्टी नव्हती. ती दृष्टी त्यांना नानाजींनी मिळवून दिली आणि तीन वर्षांत पाण्याच्या समस्येची तीव्रता ५० टक्क्यांनी कमी झाली. फेब्रुवारी-मार्चपर्यंत पाणीसाठा होऊ लागला. जमिनीखालील पाण्याची पातळी उंचावल्यामुळे अनेक विहिरींमध्ये पुन्हा पाणी दिसू लागले. त्यातून मत्स्यशेती, कुक्कुटपालन, वीटभट्टी, शिलाई असे जोडउद्योग सुरू झाले. पाणी मिळताच गावाचा चेहरा बदलला.

चाणक्याची समाजनीती

गोंडामध्ये जमिनीखालील पाण्याची पातळी चांगली होती, म्हणून कूपनलिका खोदण्याचा कार्यक्रम हाती घेतला. नेहमीची पद्धत खर्चीक होती. नानाजींची प्रयोगशीलता कामी आली. कूपनलिकेमध्ये बांबूचा वापर करण्यात आला. बांबू त्या प्रदेशात भरपूर होता. बांबूच्या वापरामुळे कूपनलिका एकदम सर्वसामान्यांच्या आवाक्यात आली. दोन वर्षांत २० हजार कूपनलिका खोदण्याचा संकल्प मांडण्यात आला. अनेकांनी वेड्यात काढले, पण नानाजींच्या शिस्तबद्ध नेतृत्वाने आपली कमाल दाखविली. दोन वर्षांतील आकडा २० हजारांच्या पुढे गेला.

देशातील ७१ टक्के जनता शेतीवर अवलंबून आहे आणि शेतीसाठी उपलब्ध जमिनीपैकी ७६ टक्के जमीन आर्थिकदृष्ट्या किफायतशीर नाही, असे अहवाल सांगतात. ही जमीन किफायतशीर केल्याशिवाय दुखणे दूर होणार नाही, हे लक्षात आल्यावर नानाजी त्या दिशेने विचार करू लागले. यातून अडीच एकर जमिनीचा प्रयोग सुरू झाला. अडीच एकर जमिनीत शेतकऱ्याला स्वाभिमानाने, स्वावलंबनाने सहा ते आठ जणांच्या कुटुंबाचे पोषण कसे करता येईल यावर प्रयोग सुरू झाले. भाजीपाला, कडधान्यांसह कुटुंबाला वर्षभर चौरस आहार, आरोग्यावरील खर्च, मुलांच्या शिक्षणाचा खर्च, इतर आनुषंगिक खर्च जाऊन कुटुंबाकडे वार्षिक ७ ते १० हजार रुपयांची बचत व्हावी, असे मॉडेल तयार करण्यात आले.

अडीच एकराच्या प्रारूपातून गावाचा सर्वांगीण उत्कर्ष नानाजींना अपेक्षित होता. सर्वांगीण उत्कर्ष म्हणजे श्रीमंती नव्हे; तर समाधानी जीवन, स्वास्थ्य, स्वावलंबन यांना महत्त्व देणारी ही जीवनशैली गावकऱ्यांमध्ये रुजविण्यासाठी हिमती, कष्टाळू तरुणांची गरज होती. यातून ‘समाजशिल्पी दंपती’ ही कल्पना पुढे आली. 'समाजशिल्पी' हा पाच गावांच्या संकुलाचा जणू पालक असतो. येथील मुलांवर योग्य संस्कार होतील हे पाहणे व त्यांच्याशी मैत्रिपूर्ण, प्रेमळ संबंध राखणे हे तेथे राहणाऱ्या दंपतीचे काम. प्रेम, आत्मीयता निर्माण करण्यावर येथे भर आहे.

समाजस्वास्थ्य

सामाजिक स्वास्थ्याचा विचार करताना व्यक्तिगत आरोग्यही ध्यानात घ्यावे लागते, हे लक्षात घेऊन चित्रकूटच्या डोंगराळ परिसरात 'आरोग्यधाम'ची उभारणी केली. येथे अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे. वातावरणातील बदल, सुंदरता आरोग्यावर चांगला परिणाम करते हे लक्षात घेऊन सर्व बांधकाम करण्यात आले आहे. आयुर्वेद, योग यासाठी स्वतंत्र इमारती आहेत. तसेच स्त्रीसाठी विशेष उपचार आणि सर्वांगीण स्वास्थ्य राखण्यासाठी त्यांना काय करावे याचे मार्गदर्शन 'मातृसदन'मध्ये करण्यात येते.

मुलांसाठी उद्यमिता केंद्र उभारले आहे. या 'उद्यमिता' विद्यापीठात जाऊन विद्यार्थी लघुउद्योगाचे प्रशिक्षण घेऊ शकतात. निवासी व्यवस्था असलेले 'गुरुकुल' तेथून जवळच आहे. तेथील मुलेही याच शाळेत शिकतात. शाळेच्या आवारात शिशुवर्गासाठी नानाजींनी 'नन्ही दुनिया' उभारली आहे. मुलांना सहज शिक्षण देणारी ही नन्ही दुनिया. इथे वर्ग नाहीत. चारी बाजूंनी शेड आहेत. मध्ये मस्त मोकळी हिरवळ आहे. शेडपलीकडील भिंतीवर अक्षर ओळख, प्राणी ओळख, वाक्यरचना शिकविणारी मोठमोठी चित्रे आहेत. संगीत कक्ष, भूगोल कक्ष, विज्ञान कक्ष असे काही कक्ष आहेत. तेथेही चित्रांची रेलचेल आहे. मुलांना अद्ययावत करण्यासाठी चित्रांचा खूपच उपयोग होतो. या छोट्या मुलांना वर्गात बसवण्याचा आग्रह केला जात नाही. त्यांना हवे तेव्हा बागडण्याची व हवे तेव्हा शिकण्याची मुभा आहे.

रामदर्शन

समाजावर संस्कार करायचे आणि त्यांना श्रद्धेने कामाला लावायचे असेल, तर 'समाजमान्य आदर्शा'ची गरज होती. समाजाची रामावर श्रद्धा होती व चित्रकूट ही तर प्रभू रामचंद्रांची भूमी. म्हणून त्यांनी रामाच्या जीवनाचे दर्शन घडविणारे ‘रामदर्शन’ प्रदर्शन उभारले. त्यासाठी नानाजींनी रामायणाचा तपशिलात अभ्यास केला.

वयाच्या ६०व्या वर्षी नानाजींनी चित्रकूट परिसरातील ५०० गावांत ग्रामविकासाचे प्रारूप उभे केले. त्यांनी उभारलेले हे प्रारूप आजच्या तरुण पिढीला पाहता यावे, यासाठीच हिंदुस्थान प्रकाशन संस्था - विवेक सामाजिक-सांस्कृतिक पर्यटन विभागामार्फत चित्रकूट समाजप्रेरणा तीर्थयात्रेचे आयोजन केले होते. यात्रेकरूंना यात्रेचा आनंद मिळावा यासाठी मुंबई ते चित्रकूट विशेष ट्रेनची व्यवस्था करण्यात आली होती.

सामाजिक परिवर्तनाचा हा प्रयोग समाजातील प्रत्येकाने एकदा तरी अनुभवण्यासाठी चित्रकूट दर्शन केलेच पाहिजे. त्यांचे हे कार्य पाहून आजच्या तरुणांना नक्कीच नवी उमेद मिळेल, प्रेरणा मिळेल.

जीवनाचे रूप बदलण्याची जी ताकद प्रभू रामचंद्रांकडे होती, ती प्रत्येक माणसात आहे. नानाजी म्हणाले होते की, “प्रत्येक माणसात अमाप शक्ती आहे. या शक्तीला खरोखर सीमा नाही. ध्येयदृष्टी किती वापरता यावर या शक्तीचे प्रकटीकरण अवलंबून असते.”

 - प्रशांत दीक्षित

(साभार : सा. विवेकचा नानाजी देशमुख स्मृती विशेषांक २०१०.)

 

लेखक: 

No comment

Leave a Response