Primary tabs

का साजरा केला जातो राष्ट्रीय गणित दिवस

share on:

भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या स्मृती प्रित्यर्थ दरवर्षी २२ डिसेंबर हा 'राष्ट्रीय गणित दिवस' म्हणून साजरा करतात. भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी एका कार्यक्रमात श्रीनिवास रामानुजन यांच्या १२५ व्या जयंती निमित्त त्यांना श्रद्धांजली देताना २०१२ हे वर्ष राष्ट्रीय गणित वर्ष म्हणून घोषित केले; शिवाय रामानुजन यांचा जन्मदिन म्हणजेच २२ डिसेंबर हा राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा केला जाईल अशी घोषणा देखील केली. 

कोण होते श्रीनिवास रामानुजन

श्रीनिवास रामानुजन हे भारतीय गणितज्ञ होते. ज्यांनी अत्यंत कमी वयात ५०००हून अधिक प्रमेयांची निर्मिती केली होती. ज्यांना अनेक दशकांनंतरही सोडवले गेले नाही. गणितातील विश्लेषण, संख्या सिद्धांत, इंफिनाईट सिरीज आणि सतत अपूर्णांक यामध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

श्रीनिवास रामानुजन अय्यंगार यांचा जन्म २२ डिसेंबर १८८७ रोजी तामिळनाडू राज्यातील इरोड या गावी झाला. संत रामानुजन यांच्या नावावरून त्यांचे नाव ठेवले होते. श्रीनिवास यांचे वडील एका कापड व्यापाऱ्याकडे नोकरी करत होते. त्यामधून त्यांना पुरेसे आर्थिक उत्पन्न मिळत नसल्याने त्यांनी कुंभकोणम या गावी स्थलांतर केले. याच ठिकाणी श्रीनिवास रामानुजन यांचे शालेय शिक्षण झाले. लहान वयातच त्यांना गणित विषयावर खूप प्रश्न पडायचे. कधी कधी तर त्यांच्या शिक्षकांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देणे अवघड जायचे. रामानुजन शाळेत असताना महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची गणिताची पुस्तके घेत आणि गणिते सोडवत असे. गणिताच्या जवळपास सर्वच परीक्षेत त्यांना पारितोषिके मिळाली होती. रामानुजन यांच्या या कौशल्याने शिक्षक अनेकदा प्रभावित होत.  

केवळ दोनच वर्षात त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण करून वयाच्या दहाव्या वर्षी फायनलची परीक्षा देऊन ते जिल्ह्यात प्रथम आले. उच्च माध्यमिक शिक्षण चालू असताना जी. एस. कार. यांचे गणित विषयावरील पुस्तक त्यांच्या वाचनात आले आणि त्यांची गणित विषयातील रुची आणखी वाढली. त्यांना वाचनाची देखील प्रचंड आवड होती. शालेय जीवनातच त्यांनी अनेक पौराणिक आणि ऐतिहासिक पुस्तकांचे वाचन केले होते. त्यांची पाठांतर क्षमता आणि स्मरणशक्ती असामान्य होती.

ब्रिटनचे प्रसिद्ध गणितज्ञ डॉ. हार्डी यांनी श्रीनिवास यांची प्रतिभा ओळखून त्यांना केंब्रीज विद्यापीठाच्या ट्रिनिटी महाविद्यालायत प्रवेश करवून दिला. याच ठिकाणी दोघांनी गणित विषयाला नवे आयाम दिले. रामानुजन हे रॉयल सोसायटीचे सर्वात तरुण फेलो होते, शिवाय भारतातील फक्त दुसरे फेलो होते. तर ट्रिनिटी कॉलेज, केंब्रीजमध्ये फेलोशिप मिळवणारे ते पहिले भारतीय होते.   

रामानुजन यांना गणिताबरोबरच फलज्योतिषाचीही आवड होती. त्यांना अवघ्या ३२ वर्षाचे आयुर्मान लाभले. क्षयाच्या आजाराने त्यांचे २६ एप्रिल १९२० रोजी कुंभकोणम येथे निधन झाले. 

- ज्योती बागल

content@yuvavivek.com

 

 

 

 

लेखक: 

No comment

Leave a Response