Primary tabs

इथे सैनिक घडतो! राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी

share on:

देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने लष्कराची भूमिका महत्त्वाची असते. यासाठी भूसेना, नौसेना आणि वायुसेना या तिन्ही दलांना प्रशिक्षण देऊन सक्षम बनवण्याचे काम पुण्याजवळील खडकवासला स्थित राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी करते.

सेवा परमो धर्म:I अर्थात 'Service Before Self' हे ब्रीद वाक्य असणाऱ्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीची स्थापना १९५४ साली झाली. त्याआधी भूसेना, नौसेना आणि वायुसेना या तिन्ही दलातील अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण एकत्र व्हावे या उद्देशाने तत्कालीन हिंदुस्थान सरकारने  नॅशनल वॉर अकॅडेमी वर्किंग कमिटी नेमली होती. या कमिटीचे अध्यक्ष फील्ड मार्शल सर क्लॉट ऑकिनलेक हे होते, तर  उपाध्यक्ष अमरनाथ झा हे होते. 

दुसऱ्या जागतिक महायुद्धात, ‘तिन्ही दलातील सैन्याचे एकमेकांना सहकार्य असणे गरजेचे असते’ ही बाब लक्षात आल्याने स्वतंत्र भारतातही तिन्ही दलांना एकाच ठिकाणी प्रशिक्षण देणारी अकादमी असावी या उद्देशाने संयुक्त सैनिकी संस्थेची मुहूर्तमेढ रोवली. 

दुसऱ्या महायुद्धातील भारतीय सैन्याची चांगली कामगिरी बघून सुदान सरकारने एक लाख पौंड मदत म्हणून दिले होते. तर महारष्ट्र राज्याने २, ८३३ हेक्टर जमीन देऊ केली. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीसाठी खडकवासला हे ठिकाण निवडले कारण, खडकवासल्यापासून समुद्र फार लांब नाही आणि  पुण्यात हवाई दलाचाही तळ होता. ६ ऑक्टोबर १९४९ रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते या वास्तूची पायाभरणी होऊन काम सुरु झाले. 

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी ही सैनिकी प्रशिक्षण देणारी सर्वोत्कृष्ट संस्था असून आंतराष्ट्रीय मान्यताप्राप्त आहे. भारतासह विदेशातील सैनिकी विद्यार्थ्यांना देखील येथे प्रशिक्षण दिले जाते. १२ वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना केंद्रीय लोकसेवा आयोगा तर्फे घेण्यात येणाऱ्या परीक्षेद्वारे येथे प्रवेश मिळवता येतो. या परीक्षेचा समावेश जगातील अत्यंत  कठीण परीक्षांमध्ये केला जातो. हा अभ्यासक्रम साधारण 3 वर्षांचा असून पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्याला जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालया तर्फे पदवीचे प्रमाणपत्र दिले जाते.

प्रबोधिनीत देण्यात येणारे प्रशिक्षण, जागतिक पातळीवरील सैनिकी प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांच्या तुलनेत अत्यंत आव्हानात्मक असून कठोर परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर अनेक विद्यार्थ्यांनी हे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबरच  शारीरिक शिक्षण, कवायत, जलतरण, हॉर्स रायडींग, शुटींग, नेविगेशन, युद्धशास्त्राचे सखोल प्रशिक्षण या ठिकाणी दिले जाते.

येथील प्रशिक्षणानंतर उत्तीर्ण विद्यार्थी एअर फोर्स ॲकेडमी हैद्राबाद, इंडियन मिलीटरी ॲकेडमी डेहराडून येथे एक वर्षाचे प्रशिक्षण घेतात आणि सैन्यात दाखल होतात.तसेच केरळ येथील कन्नूर स्थित इंडियन नेवल अकादमी येथून, विशेष प्रशिक्षण घेऊन नौसेनेत सहभागी होतात.

- ज्योती बागल

content@yuvavivek.com

 

 

 

लेखक: 

No comment

Leave a Response