Primary tabs

हितगुज सावित्री माईशी

share on:

आज सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे. त्यानिमित्त त्यांचाच वारसा पुढे चालवणाऱ्या त्यांच्या लेकीने सावित्रीमाईंंशी साधलेला संवाद...

मी - माई, तुला जन्मदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा गं.

सावित्री माई - धन्यवाद गं.

मी - अगं धन्यवाद तर आम्ही तुला द्यायचे ना ? तू कशाला देतेस!

सावित्री माई - तुम्ही एवढी प्रगती करत आहात म्हंटल्यावर मीच तुम्हाला धन्यवाद देणार ना.

मी - माई, पण तुझ्यामुळेच तर आम्ही एवढी प्रगती करू शकलो आहोत. जर तू आणि तात्या नसते तर आम्ही आजही तिथेच खितपत पडलो असतो गं.

सावित्री माई - अगं आम्ही नसतो तर दुसरे कोणीतरी आलेच असते की.

मी - नाही माई, कोणीही आलं नसतं. दुसऱ्या कोणाची इच्छा जरी असती ना, तरीही तुझ्याएवढे अपार कष्ट करण्याची, चिखल आणि शेणाचे गोळे, दगड गोटे झेलण्याची कोणी हिम्मत नसती केली गं.

सावित्री माई - त्यात काय एवढं, आम्ही आमचं कर्तव्यच तर केलं. मायबापांना आणखी काय हवं असतं. आपली मुलं शिकावीत आणि खऱ्या अर्थाने स्वतंत्र व्हावीत एवढंच.

मी - तेच तर, आता तू खूप समाधानी असशील  ना?

सावित्री माई - कशाचं समाधान?

मी - अगं आम्ही मुली आज तुझ्यामुळेच तर स्वतंत्र झालो आहोत.

सावित्री माई - अच्छा म्हणजे तुम्ही स्वतंत्र झाला आहात तर.

मी - हो, म्हणजे तुला नाही का वाटतं.

सावित्री माई - कुठे गं, आम्ही तर तुम्हाला शिक्षण मिळावं यासाठी एक लढा सुरू केला होता. त्या शिक्षणातून तुम्हाला विचार करण्याचं, व्यक्त होण्याचं, एक माणूस म्हणून जगण्याचं स्वातंत्र्य मिळायला मदत होणार होती.

मी - हो मग, झालीच की मदत, खूप मदत झाली. म्हणून तर आम्ही इथे आहोत ना.

सावित्री माई - हो, तुम्ही तर आलात इथपर्यंत पण बाकीच्या मुलीचं काय? त्यांच्यापर्यंत कोण जाणार? त्यांना त्यांच्या अस्तित्वाची जाणीव कोण करून देणार.

मी - पण मला नाही वाटतं की आता मुली मागे राहिल्यात म्हणून.

सावित्री माई - कसं वाटणार बाळा, आपल्याला सगळं मिळालं की आपण आजूबाजूला बघायचं सोडूनच देतो, म्हणून आपण समाजातील सत्य परिस्थितीपासून अनभिज्ञ राहतो.

मी - पण माई, मी तर एक सर्वसामान्य मुलगी आहे, मी काय विशेष करणार ना.

सावित्री माई - अगं कोणी जन्माला  येतानाच विशेष म्हणून नाही जन्माला येतं, आपण स्वतःला तस घडवायचं असतं. आज तुम्ही मुली आवर्जून माझं स्मरण करता, माझ्या फोटोंना आणि मूर्त्यांना माळा घालता, पण मला हे नकोय.

मी - माई, असं का म्हणतेस, काही चुकलं का आमचं.

सावित्री माई - मला सांग बरं, तुम्हाला तुमच्या आईने केलेलं ते अनप्रोड्क्टिव्ह वर्क करायला नाही ना आवडतं.

मी - हो, नाही आवडतं.

सावित्री माई - मग तुम्ही तरी यातून वेगळं काय करत आहात. फक्त आमच्या फोटोंना माळा घालून आणि फेसबुक, व्हाट्सअँपला स्टेट्सला आमचे फोटो ठेवून काय प्रॉडक्ट्इव्ह काम तुम्ही करतं आहात. अगं तुम्ही माझ्या लेकी ना, मग, मला माझी प्रत्येक लेक शिकलेली बघायची आहे. तिला एक बाई म्हणून तर जगता आलेच पाहिजे शिवाय एक माणूस म्हणून समाजाने तिच्याकडे पाहिले पाहिजे.

मी - हो माई, आलं लक्षात तुला काय म्हणायचं आहे ते. तू पण शिकून स्वतःपुरताच विचार करून थांबली असतीस तर.

सावित्री माई - तर दुसरं कोणीतरी आलं असतं, नाही का?

मी - नाही नाही माई, तसा विचारही करवत नाहीये. आम्ही यापुढे नक्की काळजी घेऊ, की आमची प्रत्येक बहीण शिकली पाहिजे आणि शिकून सक्षम झाली पाहिजे.

सावित्री माई - बरं, चल मग निघते मी आता.

मी - अगं माई, इतक्यात निघालीस आणि कुठे? थांब ना !

सावित्री माई - अगं थांबून कसं चालेल? आणि मी आहेच की अगदी तुझ्या जवळ!  फक्त ती आतली विवेकाची ज्योत सतत तेवत ठेव म्हणजे झालं.

मी – (मनाशीच) हम्म खरंकी मी पण किती वेडी आहे, सूर्याला थांबायला सांगतीये! तो एकाच ठिकाणी थांबला तर सगळीकडचा अंधार कसा दूर करेल ना? आणि माई आत्मभानाची ही जी ज्योत तू माझ्यात आणि माझ्या सारख्या असंख्य जणींत प्रज्वलित केली आहेस ना त्या रूपाने तू आमच्यातच आहेस कायम! अगदी अस्तित्वाच्या शेवटापर्यंत !

- ज्योती बागल

content@yuvavivek.com

 

 

लेखक: 

No comment

Leave a Response