Primary tabs

गुरुजी!

share on:

नामवंत साहित्यिक, बाल साहित्यिक, समाजवादी नेते, समाज सुधारक व स्वातंत्र्यसैनिक साने गुरुजी यांचा आज जन्मदिवस. साने गुरुजी यांचा जन्म २४ डिसेंबर १८९९ रोजी कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड या गावी झाला. त्यांचे पूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने होते पण सर्वजण त्यांना साने गुरुजी म्हणूनच ओळखतात. 

साने गुरुजींचे आपल्या आईवर खूप प्रेम होते. त्यांच्या आईच्या संस्कारामुळेच ते घडले. स्वत: सानेगुरुजींना घडवण्याचे कार्य त्यांच्या आईने केले. त्याबद्दल ‘श्यामची आई’मध्ये सानेगुरुजी लिहितात :

‘आई देह देते व मनही देते, जन्मास घालणारी ती व ज्ञान देणारीही तीच. लहानपणी मुलावर जे परिणाम होतात, ते दृढतम असतात. लहानपणी मुलाचे मन रिकामे असते. भिकाऱ्याला, चार दिवसांच्या उपाश्याला, ज्याप्रमाणे मिळते तो बरावाईट घास घेण्याची धडपड करावीशी वाटते, त्याप्रमाणेच बालकाचे रिकामे मन जे जे आजुबाजूला असेल, त्याची निवडानिवड न करता अधाश्यासारखे भराभर त्याचा संग्रह करत असते...

महाराष्ट्राच्या अनेक पिढ्यांवर संस्कार करणारे श्यामची आई हे पुस्तक आजही तितकेच लोकप्रिय आहे. ‘श्यामची आई’मधील श्याम म्हणजे स्वत: सानेगुरुजी. या पुस्तकातून श्यामला आई बद्दल वाटत असलेली कृताज्ञता, प्रेम आपुलकी त्यांनी या पुस्तकातील कथांमधून मांडली आहे. 

कादंबऱ्या, लेख, निबंध, काव्य, चरित्रे, नाट्यसंवाद इत्यादी प्रकारचे साहित्य लेखन त्यांनी केले. त्यांनी लिहिलेल्या साहित्यात प्रेम, कळकळ, स्नेह, सद्भावना, आदर दिसतो. श्यामची आई, नवा प्रयोग, सुंदर पत्रे, हिमालयाची शिखरे, क्रांती, समाजधर्म, आपण सारे भाऊ आणि 'भारतीय संस्कृती' हे त्यांचे प्रसिद्ध लेखन आहे.

साधी, सरळ, ओघवती भाषा हे त्यांच्या लिखाणाचे गुण विशेष होते. बाल साहित्याबरोबरच त्यांनी सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक विषयांवर देखील लेखन केले आहे. साने गुरुजींची कर्मभूमी खानदेश. अमळनेर येथील तत्वज्ञान मंदिर आणि प्रताप महाविद्यालय येथे त्यांनी अध्यापनाचे काम केले. येथील वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांनी स्वतःच्या उदाहरणातून स्वावलंबनाचे धडे दिले, सेवावृत्ती शिकवली. 

स्वातंत्र्य चळवळीतील सहभागाबद्दल त्यांना तुरुंगवास झाला होता. नाशिक कारागृहातच त्यांनी श्यामची आई पुस्तकाचे लेखन केले होते तर विनोबा भावेंसह धुळ्यामधील कारागृहात असताना ते विनोबा भावे यांच्यासाठी त्यांच्या गीताई या ग्रंथाचे ‘लेखकू’ झाले.

१९३० मध्ये साने गुरुजी त्रिचनापल्लीच्या तुरुंगात होते. त्यावेळी दक्षिणेकडच्या अनेक भाषातज्ज्ञांशी त्यांच्या संबंध आला होता.  तेव्हा अनेक भाषांचे वैभव आपल्याला अज्ञात असल्याचे त्यांना जाणवले. आणि यातूनच  'आंतरभारती'ची संकल्पना त्यांना सुचली. निरनिराळ्या प्रांतीय भाषा शिकू इच्छीणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रवींद्रनाथ टागोर यांच्या शांतीनिकेतन प्रमाणे काही सोय करावी, अशी त्यांची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी काही पैसाही गोळा केला होता. पण हे कार्य अपुरे असतानाच ११ जून, इ.स. १९५० रोजी त्यानी आपले जीवितकार्य संपवले.

- युवाविवेक

content@yuvavivek.com

 संदर्भ : इंटरनेट

 

लेखक: 

No comment

Leave a Response