दहा वर्षांपूर्वी म्हणजे मार्च २०१५ मध्ये झी मराठी या वाहिनीने एक अशी भेट मराठी युवा प्रेक्षकांनी दिली जिच्यामुळे मैत्री, जगणं, छंद, आयुष्य, करिअर, गंमत, नाती अशा अनेक गोष्टींचे संस्कार नकळत मिळू लागले. सहा मुख्य पात्रे, एक घर, अनेक प्रसंग, भावना, शिकवणी, किस्से आणि विनोद.
हल्ली मालिका या मनोरंजनाच्या प्रकाराबद्दल "काय दाखवताय अरे" अशी काहीशी प्रतिक्रिया घेऊन बसलेली मी एकेकाळी एका मालिकेची गोष्ट मलाही अनुभवायला मिळावी अशी स्वप्न पाहत असे. दुनिया ही रंगीबेरंगी असं म्हणत जी मालिका माझ्या आणि माझ्या सारख्या अनेकांच्या मनात कायमचं पत्ता सांगत आली अशी दिल दोस्ती दुनियादारी!
मी त्या प्रेक्षकांच्या गटात मोडते ज्यांच्यासाठी अजूनही ही मालिका comfort show आहे! आजही अनेकदा मनाला वाटेल तो एपिसोड लावून मी मनमोकळी हसत सुटते. अनेकांनी एका इंग्रजी sitcom ची कॉपी केली अशी टिप्पणी अनेकदा या मालिकेबद्दल मांडली. असेलही कदाचित. पण मी पाहिलेल्या कोणत्याच इंग्रजी sitcom मध्ये जगण्याची कला मला कधी सापडली नाही. पण दिल दोस्ती दुनियादारीने मात्र खरोखर दुनियादारी शिकवली.
साधीसुधी कथा - सहा मित्रमैत्रिणी! वेगवेगळ्या गावांमधून, अनुभवांमधून, वेगवेगळी स्वप्न रंगवत मुंबईला आले आणि मुंबई मध्ये एका 1BHK चे रहिवाशी झाले. प्रत्येकाची गोष्ट वेगळी पण तरीही सहा वेगवेगळ्या गोष्टींची एक गोष्ट व्हायला फार वेळ लागत नाही. ज्या काळी गावातल्या मुलींनी बाहेरच्या शहरात राहणं सुद्धा फार प्रचलित नव्हतं त्या काळी मुली बाहेरच्या शहरात मुलांसोबत राहून स्वतःचं आयुष्य स्वतः घडवताना दाखवणाऱ्या मालिकेचा कथा म्हणून फक्त मनोरंजन नक्कीच हेतू नव्हता. आणि म्हणून मला कथानक सुद्धा तितकंच भारी वाटतं. कथेच्या शेवटी सगळ्या पात्रांच्या आयुष्यात एक drastic बदल दाखवला गेला आहे का? तर नाही! मालिकेचा शेवट झाला तरी कथेतील मुख्य पात्रांच्या संघर्षाचा, त्यांच्या प्रवासाचा शेवट असा होत नाही. उलट नवी सुरुवात होते. आणि म्हणूनच मला हे कथानक तितकंच खरं सुद्धा वाटतं!
संवाद! आपलासा वाटेल असा! कोणी कोणावर रागवलयं, कोणीतरी काहीतरी काळजीने बोलतंय, कोणीतरी कोणाविषयी प्रेम व्यक्त करत आहे, कोणाला तरी उपदेश दिला जातोय - या सगळ्यामध्ये आपलेपणा भरलेला होता! माझ्या मैत्रिणीने माझी टर उडवावी, माझ्या मित्राने मला रागावून जावं आणि मग मी त्याविषयी तक्रार करावी - इतका साधा अनुभव जसाच्या तसा एखाद्या मालिकेमध्ये दिसतो तेव्हा ती मालिका त्या पात्रांसोबतच आपली सुद्धा बनून जाते. मला वाटतं इतर कोणतेही कार्यक्रम आपण एखाद्या पात्राच्या दृष्टिकोनातून बघत असतो - चूक बरोबर ठरवत असतो. पण या मालिकेमध्ये आपण स्वतः त्या मालिकेचे एक पात्र बनून इतरांकडे आणि स्वतःकडे सुद्धा पाहत असतो. इस घर के सभी पात्र काल्पनिक हैं असं दरवाज्यावर लिहिणारी हीच पात्र मला माझ्यापेक्षा खरी वाटतात ते त्यांच्यामधील संवादामुळे!
आपल्या समाजाला हे कितपत रुचेल माहिती नाही पण आजही माझ्यासारखे अनेक जण मित्रांसोबत राहण्याची स्वप्न पाहतात. अनेकांना वाटतं असेल की मजा मारता येते म्हणून असेल पण या मालिकेने मित्रांसोबत राहणं म्हणजे फक्त मजा करणं नाही तर आपलं दुसरं घर कामामध्ये तरी शोधणं, नवी नाती गुंफण, थोडी तडजोड करणं, थोडं समजून घेणं, थोडं समजावून देणं आणि तरीही दुसऱ्याची मर्यादा, त्याची एकांताची गरज समजून घेऊन एकमेकांच्या सोबत आयुष्य जगणं असतं हे शिकवलं!
या मालिकेविषयी माझ्याकडे भरभरून बोलण्यासारखं आहे कारण प्रत्येक वेळी मला अनेक गोष्टी नव्याने जाणवत राहतात! या भागात कथा आणि संवाद याविषयी व्यक्त झाले पण महत्त्वाचं म्हणजे या कथेचे मुख्य सहा खांब आणि त्यांच्या आजूबाजूला असणाऱ्या गमती जमती यावर आणखी खूप सांगण्यासारखे आहे!
मला एखाद्या मालिकेविषयी काय वाटतं हे सांगण्यासारखं, वाचण्यासारखं आहे की नाही मला माहिती नाही पण एक नक्की की न बोलल्या जाणाऱ्या गोष्टीवर बोललं जाणं त्या गोष्टीच्या अस्तित्वासाठी महत्त्वाचं असतं!
म्हणूनच पुढच्या भागात बोलूया अशा सहा माणसांबद्दल जी आपल्यासारखीच आहेत तरीही मला घडविणारी आहेत!