
'शाळा' हा माझ्यासाठी अखंड आनंदाचा, आस्थेचा आणि आदराचा विषय, नव्हे आशयच! म्हणूनच 'ज्ञानगंगा इंग्लिश मीडियम स्कूल' हे केवळ नावंच नाही तर माझ्यासाठी तो एक घडवणारा संजीवक अनुभव आहे. शाळेने काय दिलं? याची यादी करायची म्हटली तर अर्थातच, शिक्षण, संस्कार, अनुभव, कौशल्य, अशी मोठी जंत्री अगदी सहज होईल. पण मला असं वाटतं की रामदास स्वामी म्हणतात त्याप्रमाणे 'पाहावे आपणां आपण, या नाव ज्ञान' हे ज्ञान मला शाळेने दिलं. स्वतःकडे बघायला तर शिकवलंच, पण सोबतच स्वतःतील गुणकौशल्यांची ओळख करुन दिली. के.जी.च्या पहिल्या दिवसापासून ते अगदी दहावीच्या निरोप समारंभापर्यंतचे अगणित क्षण आजही लक्षात आहेत. डोळ्यांसमोर अगदी काल घडलेल्या प्रसंगासारखे ताजे आहेत. रोज सुरुवातीला होणारा परिपाठ, शाळा सुरू होण्यापूर्वी अखंड सुरू असणारी मुलामुलींची किलबिल, मग वर्गातली हजेरी, पहिले चार तास, मधली सुट्टी, शाळा सुटल्यावरचा आनंद, हे आठवताना वाटतं, की रोज शाळा सुटल्यावर सगळ्यांनाच आनंद होतो. पण शाळा कायमची सुटल्यावर म्हणजे पूर्ण झाल्यावर मात्र ते अगदी नकोसं वाटतं! शाळा नावाची साखरी ऊब मात्र कायम पाठीशी असते. ड्रॉइंग आणि क्राफ्टच्या तासांना रंगीत झालेले वर्ग मुलांच्या मनातील रंगांना उजळून टाकायचे! पीटीच्या तासाला होणारी मजामस्ती, लॅबमध्ये मोठ्या कुतूहलाने केलेली प्रॅक्टिकल्स आणि लायब्ररीमध्ये गेल्यावर भान हरपून टाकणारी कितीतरी पुस्तकं! मी दहावीत असतानाच सुरू झालेला अटल टिंकरींग लॅब, त्याचं घेतलेलं प्राथमिक प्रशिक्षण आणि तेव्हाच शाळेत दाखल झालेले स्मार्टबोर्ड्स! केजीमधील फळ्यापासून दहावीतील स्मार्ट बोर्ड्सचा प्रवास मनाच्या स्क्रीनवर मात्र सारखा प्ले होत राहतो, विलक्षण आनंद देत राहतो. शाळेमधे विषयांसोबतच शिकवलं गेलेलं पुस्तकांच्या पलिकडचं बरंच काही आज प्रत्येकाचं आकाश नक्कीच व्यापक करत असेल. के.जी.त असताना झालेल्या दियापेंटिंग पासून ते पुढे शाळेच्या सगळ्याच उपक्रमांत, शालेय आणि आंतरशालेय स्पर्धांमध्ये भाग घेऊन मिळालेला आनंद किती आश्वासक होता! पहिली ते दहावी ॲन्युअल गॅदरींगमधे उत्साहाने केलेले डान्स आणि ड्रामा सगळंच आठवतं. पण सर्वात जास्त आठवतं ते सगळ्याच शिक्षिकांनी मनापासून आणि भरभरून केलेलं प्रेम. शाळेतील मावशी-काकांपासून ते मुख्याध्यापिकांपर्यंत सगळ्यांकडून मिळालेली निखळ प्रेमाची नि आशिर्वादाची शिदोरी ही शाळेनंतरही कामी येतेच! त्यात मराठीच्या शुभांगी पारसवार टिचरांशी जुळलेला ह्रदबंध, त्यांच्या मार्गदर्शनाखाली केलेली वार्षिक आणि कार्यक्रमांनुसार नाटकं, एकपात्री नाटकं, पथनाट्य, कितीतरी चर्चा, अगणित गप्पा आणि बरंच काही हे पृथ्वीमोलाचं आहे. सगळ्याच टिचर्सकडून मिळालेला आणि केवळ अभ्यासापुरता सीमित नसलेला अवीट स्नेह हे खूप महत्त्वाचं संचितच वाटतं. शाळा हे मर्यादित अवकाश असलं तरी संस्कारांची आयुष्यभर टिकणारी नक्षी खोलवर कोरली जाते ती शाळेतच. 'ज्ञानगंगा'सारखी घडवणारी शाळा लाभणं हे मी माझं लोभस भाग्यच समजतो. शेवटी, शाळेवर कितीही लिहिलं तरी ते कमीच आहे. कारण 'शाळा' नावाची गोड गाथा न संपणारी आहे, तरीही तिच्यापाशी जाण्याचा लोभ मात्र अनिवार असतो! याच भावनेतून ओठावर सहज शब्द येतात -
ओढ जीवाची पुनश्च गावी आठवणींची गाथा..
शाळेपुढती कृतज्ञतेने झुकवावा हा माथा!
- पार्थ जोशी