पुण्यात नुकताच 'पुणे पुस्तक महोत्सव ' साजरा करण्यात आला. येथे महोत्सव पार पडला असेही म्हणता येईल. पण त्या महोत्सवात जुन्या -नव्या वाचकांचा स्पर्श पुस्तकांना मनापासून झाला. पुस्तक विक्रेते, वेगवेगळ्या प्रकाशन संस्थांशी वाचकांचे नाते जुळले, अधिक दृढ झाले. पाय देखील ठेवायला जागा नसलेल्या या महोत्सवाला, 'महोत्सव पार पडला ' असे म्हणण्याऐवजी तो साजरा केला किंवा साजरा झाला म्हणणेच अधिक योग्य ठरेल. आबालवृद्धांची वाचनाची भूक शमवणाऱ्या या महोत्सवामुळे पुण्याच्या वैभवात भर पडली आहे. पुस्तकांशी खऱ्या अर्थाने मैत्री होते ती अशा प्रदर्शन आणि महोत्सवांमुळेच! हल्ली तंत्रज्ञानाचं युग आहे. पण या तंत्रज्ञानाने देखील पुस्तकांना सामावून घेतले आहे. पुस्तकाला 'ई पुस्तक' नावाचे नवे स्वरुपही आता मिळाले आहे. त्यामुळे हल्ली वाचन कमी झाले आहे, असे सरसकट म्हणता येणार नाही. पण पुस्तकांचे 'ई - प्रदर्शन' भरल्याचे माझ्या तरी स्मरणात नाही. त्यामुळे वाचकाने पुस्तकांपर्यंत पोहोचले पाहिजे ही पद्धत अजून तरी टिकून आहे. हल्ली पुस्तक आणि ई-पुस्तक यात उगीचच स्पर्धा निर्माण झाल्यासारखे वाटते. या विषयावर वादविवाद स्पर्धा एका ठिकाणी आयोजित केली होती. पण खरे म्हणजे जसा निस्सीम भक्त शैव का वैष्णव या वादात न पडता आपली श्रद्धा ढळू देत नाही त्याप्रमाणे पुस्तक का ई पुस्तक या वादात न पडता वाचकाने आपली 'वाचनश्रद्धा' अढळ ठेवावी.
पुस्तके का वाचावीत याची कितीतरी उत्तरे आपल्याला सांगता येतील. लहानपणापासूनच मराठीच्या किंवा एकूणच सर्व भाषा विषयाच्या पुस्तकात वाचनास प्रवृत्त करणारे काही धडे किंवा कविता असतात. पण खरं म्हणजे नवे-कोरे पुस्तक आपल्या हाती आले की त्या पुस्तकाचा आपण वास घेतो. या वासातूनच आपल्या पुस्तकाच्या मैत्रीची सुरुवात होते. नव्या पुस्तकांचा वास उत्साहाचा असतो तर वाचनालयात किंवा ग्रंथालयातील जुन्या पुस्तकांचा गंध अनुभवाचा असतो. पुस्तकांशी मैत्री करायची म्हणजे त्यांचा अधिकाधिक सहवास हवा. ज्याप्रमाणे आपल्या मित्र-मैत्रीणींशी भेटी होतात आणि मैत्री आणखी दृढ होत जाते त्याप्रमाणे पुस्तकांशीही आपल्या भेटी होत राहिल्या की त्यांच्याशी आपली छान मैत्री होईल. पुस्तकाचं एकेक पान म्हणजे त्याच्या मनात दडलेलं, साठलेलं खूप काही असतं. ते मनात दडलेलं काहीतरी त्याला आपल्या वाचक नावाच्या मित्राला सांगावंसं वाटतं. म्हणूनच पुस्तकांशी मैत्री करायची ती अगदी शेवटच्या श्वासापर्यंत टिकवण्यासाठी आणि तिचा यथायोग्य मान राखण्यासाठी! माझी प्रथम मैत्री झाली ती 'बोलगाणी' या मंगेश पाडगावकरांच्या कवितासंग्रहाशी.. पुढे 'एक होता कार्व्हर ' , 'मी माणूस शोधतोय' , 'अमृतवेल', ' महोत्सव ', 'मौनाची भाषांतरे ' इत्यादी अनेक मित्र मिळाले. ते लिहिणाऱ्या लेखकांशीही एक अप्रत्यक्ष पण छानसं नातं तयार झालं. हल्ली 'दवबिंदू' या मित्राला मी रोज एकेका पानाच्या 'कट्ट्यावर' भेटतो आहे. असे नवनवे मित्र मी अधिकाधिक जोडतच राहणार आहे. मला कधी एकटं वाटलं, कंटाळा आला की हे मित्र मला भेटतात आणि नवी ऊर्जा देतात. म्हणूनच या मित्रांचा मला कधी कंटाळा आलेला नाही. माझे आयुष्य ते खऱ्या अर्थाने समृद्ध करीत आहेत.
हल्ली सोशल मीडियावर 'मला वाचनाची सुरुवात करायची आहे, कृपया कोणती पुस्तके वाचावीत ते सुचवा' अशी पोस्ट वेगवेगळ्या पुस्तकप्रेमी समूहांवर नवे सहभागी झालेले सदस्य लिहितात. त्याला उत्तर देताना अनेक जण अनेक पुस्तके सुचवतात. पण पुस्तकांशी मैत्री करण्यासाठी तुम्हालाच पुस्तकांपर्यंत पोहोचले पाहिजे. एखाद्या वाचनालयात जावे आणि त्याचा सदस्य व्हावे. म्हणजे मग रोज त्या वाचनालयात येण्यास कुणी बंदी करणार नाही. वाचनालयात गेल्यावर हातात येईल त्या पुस्तकावरुन प्रेमाने हात फिरवावा... अगदी मित्राच्या खांद्यावर हात ठेवू इतक्या सहजपणाने! त्या पुस्तकाचा गंध श्वासात भरुन तो मनात साठवून घ्यावा. हळूहळू पुस्तकाचे एकेक पान उघडावे आणि त्यातील आवडतील ती पाने वाचून काढावीत. असा सहवास वारंवार घडत राहिला की मैत्री आपोआप होते. मग वेगवेगळी प्रदर्शने , पुस्तक महोत्सवाला जाऊन आपल्या पुस्तक नावाच्या मित्राला अगदी कडकडून भेटावे. जसजशी मैत्री वाढेल तसतसा आपला हा मित्र त्याच्या मनात दडलेले असंख्य विचार, अनुभव वगैरे आपल्याला मोकळेपणाने सांगेल. हे विचार नि अनुभवच आपल्याला आयुष्याकडे एका वेगळ्या पद्धतीने बघायला शिकवतात. खरं म्हणजे आयुष्य जगायला शिकवतात. पुस्तक नावाचा हा मित्र आपल्या खांद्यावर हक्काने हात ठेवतो तेव्हा त्याच्याजवळ असलेल्या अदृश्य शक्तीने तो आपल्या मनातलं नको असलेलं सारं काही हळूहळू काढून टाकत असतो. मनाला नीरवतेची जाणीव होते नि आतला आवाज शांत होतो.
- गौरव भिडे