नुकतीच मकरसंक्रांत झाली. इंग्रजी वर्ष सुरु झालं की अगदी पहिल्याच दिवसापासून मकरसंक्रांतीचे वेध लागतात. पहिला सण म्हणून असेल किंवा आवडता सण म्हणून असेल पण साऱ्यांच्याच उत्साहाला उधाण येतं. तीळ आणि गूळाची खास अशी 'पौष्टिक' भेट होते. त्या भेटीतून निर्माण होणारा गोडवा हळूहळू सगळीकडे एकमेकांविषयी प्रेम शिंपीत जातो.पतंगाची आकाशाशी, हळदीकुंकवाच्या निमित्ताने दोन सख्यांची, एकमेकांना तीळगूळ देणाऱ्या दोन हातांची भेट होते. या भेटी घडून आल्या म्हणजे मनात एकमेकांबद्दल असलेली कटुता थोडीशी कमी होते. मकरसंक्रांतीसारख्या सणांचा शोध या भेटी होण्यासाठीच लागला असावा. एकमेकांच्या हातावर तीळगूळ देताना 'तीळगूळ घ्या आणि गोड बोला' असे म्हणताना चेहऱ्यावरचे हास्य नुकत्याच फुललेल्या झेंडूसारखे टवटवीत भासते. तीळगूळ देणारा आणि घेणारा एकमेकांशी गोडच बोलतात. पण गोड गोड बोला या म्हणण्यात कायमच किंवा निदान पुढची मकरसंक्रांत येईपर्यंत तरी गोड बोलावे अशी अपेक्षा व्यक्त केलेली असते. पण हल्ली गोड बोलणे यापेक्षासुद्धा बोलणे होणे हेच थोडेसे अवघड झाले आहे. अगदी एकाच घरातील सदस्यांचाही एकमेकांशी नियमित संवाद घडून येईल, असे सांगता येत नाही. व्यस्त दिनचर्या हे त्याचे कारण असावे. दोन मित्र किंवा दोन ओळखीच्या माणसांतही संवाद न होण्याचे 'इगो' हे एक कारण असते. काहीवेळा सुरुवात कशी करावी किंवा अमुक एक बोललेले समोरच्याला आवडेल का, काही जणांचा आवाज थोडा किरटा किंवा बसका असतो तेव्हा माझे हसे होईल का अशी भिती असते. अशीही काही कारणे त्यामागे असतात. पण संवाद काहीसा कमी झालाय, हे खरेच.
एकमेकांतील संवाद कमी झाला असला तरी व्यवसाय आणि नोकरीच्या क्षेत्रात मात्र तीळगूळ न देताही सारेच गोड बोलतात. आपले काम व्हावे हा मूळ हेतू असल्याने बोलण्यात गोडवा कायम असतो. कडू औषध देणारे डाॅक्टर गोड बोलले तर रुग्ण अधिक लवकर बरा होतो. आपण एखाद्या हाॅटेलात जेवायला जातो तेव्हा तिथला वेटर छान हसून आणि चार गोड शब्द बोलून आपले स्वागत करतो तेव्हा पोटातल्या भूकेला थोडी अजून भरती येते. हाॅटेलला ग्राहकाची गरज असते. या गरजेपोटी सारे हाॅटेलचे लोक आलेल्या ग्राहकाशी गोड बोलत असतात. पण आपल्याला कुणाची गरज नाही असे हल्ली अनेकांना वाटते. आपल्याजवळ अनेक साधने उपलब्ध असल्याने माणसाची, माणसांशी गरजेव्यतिरिक्त होणाऱ्या साध्या-सोप्या संवादाची उणीव भासत नाही, असे आपल्याला वाटते. पण आपल्या मनाचे म्हणणे आपण ऐकून घेत नाही. भौतिकाच्या देखाव्यांपेक्षा शब्दातल्या खरेपणाचीच मनाला अधिक ओढ असते. 'गोड बोला' या औपचारिकतेपलीकडे जाऊन 'एकमेकांशी मनापासून बोला ' ह्याच गोड संदेशाची देवाणघेवाण केली म्हणजे हरवत चाललेला संवाद आपल्याला सापडायला लागेल. हळूहळू गोडही बोलता येईल.
गरजेपलीकडे या शब्दाचा विचार अगदी मनापासून आपण करायला हवा. माणसाचं मन कायम नवीन माणूस जोडू पाहत असतं. नव्या ओळखी झाल्या नवं माणूस भेटलं की मन वसंतासारखं अंतर्बाह्य खुलतं. हा वसंत बारमाही असावा यासाठी गरजेपलीकडे जाऊन विचार करावा लागतो. एखाद्या व्यक्तीशी आपली ओळख असते. पण बोलणं फारसं होत नाही किंवा एखाद्याशी काही कारणाने वाद झालेले असतात. तेव्हा ओळख वाढवण्यासाठी, वादाचं पुन्हा संवादात रुपांतर करण्यासाठी 'तीळगूळ घ्या आणि गोड बोला' हा प्रभावी मंत्र आहे. त्या मंत्राचा जागर करण्याचा काळ, उत्तम मुहूर्त म्हणजे मकरसंक्रांत! हल्ली शिकवणी वर्गांची म्हणजे कोचिंग क्लासेसची संख्या बरीच आहे. वेगवेगळ्या अभ्यासक्रमाचे वेगवेगळे वर्गही असतात. गोड कसे बोलावे याचे सुदैवाने अजून तरी कुठे शिकवणी वर्ग मी पाहिलेले नाहीत. गोड बोलणे आपले आपल्यालाच शिकावे लागते. क्षणोक्षणी परीक्षा घेणाऱ्या नियतीच्या प्रश्नाचे उत्तर एकमेकांशी गोड बोलून सोडवणे असे आहे. त्यामुळे ज्याला परीक्षेत उत्तीर्ण व्हायचे त्याने आधी मोकळेपणाने बोलायला शिकावे आणि ज्याला प्रथम श्रेणी मिळवायची आहे त्याने तीळगूळासारखे गोड बोलावे. तीळगूळाचे फायदे सर्वांनाच ज्ञात आहेत. तीळगूळाचे जे फायदे शरीराला होतात तसाच मनाला गोड बोलण्याचा फायदा होतो. आपण एखाद्या माणसाच्या हातावर तीळगूळ ठेवत त्याला गोड बोला असे सांगतो तेव्हा समोरुन झटकन उत्तर येते," मी तुमच्याशी कायम गोडच बोलतो ." अशी माणसे बरेचदा कारल्यासारखी कडवट उत्तरे देतात. पण कडू कारल्याशी औषध म्हणून का होईना पण आपल्याला गोड बोलून जमवून घ्यावे लागते. तसेच कडवट माणसांशी जमवून घेतले की नात्यात गोडवा निर्माण झाला नाही तरी नातं टिकून राहील. आयुष्यातील हे गरजेचे आणि गरजेपल्याड असलेले सारे क्षण जपण्यासाठी तीळगूळ घ्या आणि गोड गोड बोला!
- गौरव भिडे