License To Kill

20 Jan 2025 13:46:07


License To Kill

 

“टूटा है गाबा का घमंड.. जीत गई है ये मुकाबला भारत.. बॉर्डर-गावसकर ट्रॉफी जाएगी गावसकर के देश..” हे शब्द ऐकून लाखो क्रिकेटप्रेमींच्या अंगावर अक्षरशः शहारे उभे राहिले होते. हे शब्द ऐकण्याआधी ब्रिस्बेन गाबा मैदानात तब्बल ३२ वर्षांपासून ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व होते. या ३२ वर्षांत या मैदानावर ऑस्ट्रेलियाने एकही सामना गमावला नव्हता. भारतीय संघ या पूर्ण दौऱ्यात दुखापतींनी घेरलेला होता. मोहम्मद शमी, उमेश यादव, रवींद्र जडेजा, हनुमा विहारी, रविचंद्रन अश्विन यांच्यासोबत जसप्रीत बुमराहला सुद्धा दुखापत झाली होती. वेळ अशी आली होती सोबत असलेले नेट बॉलर्स थेट पहिल्या ११ मध्ये आले होते. संघात फक्त १२ खेळाडू उपलब्ध होते. अशा परिस्थितीत नवीन भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या सगळ्यात मजबूत किल्ल्यावर उतरला.

 

त्यावेळी भारतीय संघाच्या गोलंदाजीचा अनुभव फक्त १० सामन्यांचा होता तर ऑस्ट्रेलियाच्या ३ गोलंदाजांचा अनुभव २०० सामन्यांचा होता दोन्ही संघांच्या आकड्यांमध्ये जमीन-आसमानाचा फरक होता. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघाच्या नव्या बॉलिंग युनिटने ऑस्ट्रेलियाला ३६९ धावांवर रोखले. ऑस्ट्रेलियाकडून लाबुशेनने शतक आणि टीम पेनने अर्धशतक केले तर वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर आणि टी. नटराजन या तिघांनी तीन-तीन विकेट्स वाटून घेतल्या.

 

आता सामन्याचा निकाल भराच्या फलंदाजीवर अवलंबून असणार होता. रोहित, पुजारा, रहाणे, अगरवाल, रिषभ या सगळ्यांची सुरुवात चांगली झाली पण यातील कुणालाही मोठी धावसंख्या गाठता आली नाही. भारतीय संघाची स्थिती १८६ धावांवर ६ बाद अशी झाली होती. शार्दुल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदर मैदानावर होते. दोघांकडेही अनुभव नव्हता पण खेळण्याची आणि मोठं काहीतरी करून दाखवण्याची जिद्द नक्कीच होती. दोघेही एक चांगली भागीदारी करत होते. एवढ्या घटक गोलंदाजीसमोर या दोघाचे टिकून राहणे कौतुकास्पद होते. हळूहळू खेळ बदलत होता. शार्दुलने षटकार मारून त्याच्या ५० धावा पूर्ण केल्या. सुंदरनेही अर्धशतक पूर्ण केले. दोघांनी मिळून १२३ धावांची भागीदारी केली. शार्दुल ६७ धावांवर आणि सुंदर ६२ धावांवर बाद झाले. या भागीदारीमुळे खेळात ऑस्ट्रेलिया पूर्णपणे मागे झाली.

 

तिसऱ्या इंनिंगमध्ये आता ऑस्ट्रेलियाला मोठी लीड हवी होती. स्मिथने अर्धशतक केले. शार्दुल ठाकूरने त्याच्या पहिल्या कसोटी सामन्यात फक्त १० बॉल टाकले होते. आणि यावेळी मात्र नशीब पूर्णपणे भरपाई करत होते. शार्दुलने ऑस्ट्रेलियाचे ४ बळी घेतले. सिराजने त्याच्या करियरमध्ये पहिल्यांदा ५ विकेट्स घेतल्या. सिराज आणि भारतीय समर्थकांसाठी हा फार आनंदाचा क्षण होता. ऑस्ट्रेलियाने भारताला ३२८ धावांचे लक्ष्य दिले. चौथ्या इंनिंगमध्ये २५० धावांच्या वर पाठलाग करणे कधीही अवघड असते.

 

सामना आणि शृंखला जिंकण्यासाठी भारतीय संघाला शेवटच्या दिवशी ३२४ धावा हव्या होत्या. कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील एक उल्लेखनीय दिवसाची सुरुवात झाली. रोहित लवकर बाद झाला. गिल आणि पुजारा यांच्यात एक चांगली भागीदारी झाली. गिलने त्याचे अर्धशतक पूर्ण केले. पुजारा धैर्याने खेळत होता, अनेक चेंडू त्याने शरीरावर खाल्ले. त्याला वेदना होता आहेत असे त्याच्या चेहऱ्यावर कुठेच दिसत नव्हते. गिल ९१ च्या स्कोअरवर बाद झाला. त्याच्या आणि पुजाराच्या १३२ धावांच्या भागीदारीने एक असा मजबूत पाया रचला की जिथून क्षितिजाअलीकडे विजय दिसत होता. रहाणे एक छोटी पण प्रभावी खेळी करून परतला. आता सामन्याची सूत्रे दोन विरुद्ध स्वभावाच्या खेळाडूंकडे होती. पुजारा आणि पंत! आग आणि बर्फ!

 

पुजाराने १९६ चेंडू खेळून त्याचे अर्धशतक पूर्ण केले. ही जोडी सामन्यात भारताचे पारडे जड करत होती. ऑस्ट्रेलियाने नवीन बॉलने पुजाराची विकेट मिळवली. पंतने १०० चेंडू खेळून त्याचे अर्धशतक पूर्ण केले. जिंकण्यासाठी ६३ धावा हव्या असताना मयंक बाद झाला. सुंदर आणि पंत मैदानात होते. रिषभला इतक्या जवळ येऊन सामना गमवायचा नव्हता. सुंदर पूर्णपणे आत्मविश्वासाने खेळत होता. रिषभने मैदानाच्या वेगवेगळ्या दिशांना वेगवेगळे फटके मारायला सुरुवात केली. कांगारूंवर हळूहळू दबाव वाढत होता. भातीय संघ आणि एक ऐतिहासिक विजय यांतील फरक हळूहळू कमी होत होता.

 

२६ चेंडूंमध्ये फक्त १० धावा हव्या असताना सुंदर बाद झाला. जिंकण्यासाठी फक्त 3 धावा हव्या असताना शार्दुल ठाकूरही बाद झाला. आता पंतसोबत तळातले फलंदाज होते. जर पंतकडून स्ट्राईक गेली असती तर कदाचित दुसऱ्या बाजूने संघ पूर्ण बाद होऊ शकला असता त्यामुळे चालू असलेल्या ओवरमधेच त्याला 3 धावा करायच्या होत्या. संघावरील अनेक प्रश्नचिन्हे, दौऱ्यादरम्यान झालेल्या दुखापती, खेळाडूंवर होणारी टीका या सगळ्यांना उत्तर हा सामना जिंकून मिळणार होते. ओवरच्या शेवटच्या चेंडूवर पंतने समोरच्या बाजूस चौकार मारून या ऐतिहासिक सामन्याचा निकाल भारताच्या बाजूने लावून स्वतःचे नाव भारतीय क्रिकेट इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले. “टूटा है गाबा का घमंड.. जीत गई है ये मुकाबला भारत.. बॉर्डर-गावसकर ट्रॉफी जाएगी गावसकर के देश..” हे शब्द ऐकून लाखो क्रिकेटप्रेमींच्या अंगावर अक्षरशः शहारे उभे राहिले होते.

 

अनेक कारणांमुळे ही शृंखला अजरामर आहे. एडिलेडच्या पतनानंतर भारताने केलेली वापसी, विराटच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेने सांभाळलेली संघाची धुरा, चेतेश्वर पुजाराने संघाला सामन्यात टिकवून ठेवण्यासाठी शरीरावर खाल्लेले उसळते चेंडू, अनेक दुखापतींनंतर संघाचे मनोबल, मेलबर्नमधे भारतीय संघाने एकीने मिळवलेला विजय, सिडनीच्या मैदानातील ‘रिषभपंती’, रविचंद्रन अश्विन आणि हनुमा विहारी यांनी सामना वाचवण्यासाठी खेळून काढलेल्या चाळीस ओवर्स, शुभमन गिल आणि मोहम्मद सिराज यांचा अविस्मरणीय डेब्यू, शार्दूल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदर या दोघांनी मिळून दिलेली झुंज, सिराजच्या ५ विकेट्स, शुभमन गिलच्या ९१ धावा, पुजाराचे अर्धशतक, रिषभ पंतच्या अविस्मरणीय ८९ धावा आणि भारताने जिंकलेली ऐतिहासिक बॉर्डर-गावसकर ट्रॉफी..!

 

काय आठवावे आणि काय आठवू नये..! प्रतिकूल परिस्थितीतून भारताने मिळवलेला विजय हा नेहमीच क्रिकेटचे पुढचे सुपरस्टार्स आणि माझ्यासारख्या चाहत्यांना प्रेरित करत राहील.

   

- देवव्रत वाघ
Powered By Sangraha 9.0