‘आम्ही दोघी’

युवा विवेक    17-Jan-2025
Total Views |


‘आम्ही दोघी’

 

आम्ही दोघी’ हा मुक्ता बर्वे आणि प्रिया बापट अभिनीत मराठी भाषेतील स्त्रीवादी चित्रपट आहे. प्रतिमा जोशी आणि पूजा छाब्रिया निर्मित. दिवंगत लेखिका गौरी देशपांडे यांच्या 'पाऊस आला मोठा' या लघुकथेचे हे रूपांतर आहे.

मानवी नात्याचे नाजूक भावबंध हळूहळू धाग्यासारखे या चित्रपटात उलघडून दाखवले आहेत. भारतीय संस्कृतीमधे नात्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. ते आजीआजोबांचं असेल, आजोबा-नातू, मामा-भाचे, आई-बाबा, भाऊ-बहीण अशी अनेक नात्यांची वीण विणलेली आहे, परंतु सावत्र आई नि मुलीचं नातं हे बालपणापासून नकारात्मकरित्या आपल्यासमोर ठेवलेलं. ते या चित्रपटात अगदी विरुद्ध दाखवलं आहे.

एक अनोळखी व्यक्ती आपल्या घरात सावत्र आई म्हणून येते ही कल्पनाच साविला (सावित्री सरदेसाई) सहन होत नाही. तिची मैत्रीणही तिच्या या कल्पनेला पुष्टी देते. नेहा (साविची मैत्रिण) म्हणते, “सावत्र आई आहे तुझा छळबीळ करेल हं.” “कोण कोणाचा छळ करतंय बघूयात”, असं म्हणून सावित्री अमलाशी उद्धट वागण्याचं मनोमन निश्चित करते. प्रत्यक्ष घडतं या उलट. साविचा स्वभाव उद्धट, तुसडा, हट्टी, तर अमीचा (अमला) शांत, मवाळ असतो. सावित्री तिच्याकडे काहीशी कुतूहलजनक नजरेने पाहत असते. तिला लवकरच कळलं, की ती सावत्र आईसारखी बिलकुल वागत नाही. मग तिचं मन तिच्याबद्दल काहीसं संवेदनशील होऊ लागलं. हळूहळू त्यांची मैत्री झाली.

सावीच्या वडिलांचं नि तिचं कधीच कोणत्याच बाबतीत एकमत झालं नाही. त्यांचं पुरुषी अधिकार गाजवणं तिला मुळीच आवडायचं नाही. परिणामी बापलेकीच्या नात्यात कायमचा दुरावा आला (त्यांच्या मरणापर्यन्त!). हे चालू असतानाच तिचं शिक्षण पूर्ण झालं. पुढच्या शिक्षणासाठी ती मुंबईला निघून जाते. एक स्वतंत्र आयुष्य सुरु करते. ती म्हणते मुलींना स्वातंत्र्य खऱ्या अर्थाने अर्थाजन केल्यावरचं मिळतं. कारण तिने घेतलेल्या निर्णयाची ती संपूर्णपणे जबाबदारी घेते. (ही विचारधारा या आधुनिक शतकात चालू आहेच.) हे वाक्य कुठेतरी आपल्याच मनात सुप्त अवस्थेत असतं हे जाणवलं. आपल्यालाही असं काही तरी करायचं असं सतत वाटतं. पण एकंदरीतच सावित्री असंवेदनशील, कोरडवाहू (फक्त पुस्तकी किडा) शिक्षणाने काहीशी अलिप्त, एकटी राहू लागते. तीच मन अजूनही बौद्धिक गोष्टीचं विश्लेषण करत बसलं होतं. एके दिवशी नेहा तिच्या नवऱ्याबरोबर (संदीप) सावीच्या घरी जेवणासाठी येते. त्यांच्यासोबत संदीपचा मित्र रामही येतो. रामची आणि साविची मैत्री होते नि तिचं रूपांतर प्रेमात होतं. (सावीच्या स्वभावात तरीही बदल होत नाही.) रामच्या घरचे लग्नाचा तगादा लावत होते. राम सावित्रीला लग्नाबद्दल विचारतो तेव्हा ती म्हणते, “लग्न आणि प्रेम या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. प्रेम ही व्यक्तीगत गोष्ट आहे नि लग्न ही सामाजिक, कायदेशीर बाब.” अशी परंपरेची चौकट मोडून सावित्रीने केलेली बंडखोरी दिसून येते. ही गोष्ट मलाही पटली ती तर्किकदृष्ट्या! तिच्या अशा अलिप्त वागण्यामुळे त्यांच्यातील नातं संपुष्टात येऊन आपापसात सतत भांडणं होऊ लागली. एके दिवशी तिला कळतं कि रामने लग्न केलं. ती ही गोष्ट सहजतेने घेण्याचा आव आणते. बालवयापासून तिच्या वडिलांनी भावनेला महत्त्व न देता प्रॅक्टिकली विचार करायचा असे संस्कार केले. हा तिचा स्वभावच बनला होता.

या घटनेच्या अगोदर तिच्या वडिलांचं निधन झालं होतं (हेही तिने प्रॅक्टिकली घेतलं!). तेव्हाच अम्मी कायमची तिच्यासोबत राहायला आली. अमीने तिला प्रत्येक परिस्थितीत आधार देण्याचा प्रयत्न केला, पण तिला तो दुबळेपणा वाटायचा. रामने लग्न केल्यानंतर मात्र ती काहीशी अस्वस्थ वाटत होती. अर्थात हे अम्मीला जाणवत होतं. या वेळी मात्र तिने अम्मीचा आधार घेतला. सावीला हायस वाटलं नि ती त्या प्रसंगातून सावरली. दुसऱ्याच दिवशी अम्मी आजारी पडली. दवाखान्यात गेल्यावर सावीला कळलं की तिला ल्युकेमिया झालाय. ही गोष्ट सांगितली नाही म्हणून ती रागारागानेच अम्मीकडे गेली. अम्मीचं शेवटचं बोलणं - “सावी कधीकधी आडाखे चुकतात माणसाबद्दलचे. वाटलं मोकळं व्हावं तर होत जा ग. नको थांबवत जाऊ स्वतःला. मोकळं होणं म्हणजे कमकुवतपणा नसतो ग. तुला स्वतंत्र राहायला आवडतं, मग भावनांना का बंदिवासात ठेवते? मी आईशिवाय राहू शकते, बापाशिवाय कमवू शकते, रामशिवाय जगू शकते याने काय सिद्ध होणार आहे? कोणी पाठ थोपटणार आहे का तुझी? अजून पुष्कळ आयुष्य आहे बघ पुढं."

या संवादाने चित्रपटाचा गर्भआशय सुचित होतो. हा आशय मनातल्या संवेदनाला, ओलाव्याला भिडणारा आहे. सावीच शेवटी म्हणते, “जीवाच्या आकांताने रडले मी त्या दिवशी (अम्मी गेली). रडणं नव्हतच ते. ती होती एक जाणीव. आजपर्यंत आयुष्य मी माझ्या पद्धतीने जगले. कोणाशी आतून जवळीक नाही साधू शकले आणि ती जेव्हा निर्माण झाली, त्याच वेळी अम्मी मला सोडून गेली. पण जाताना दडपून ठेवलेला माझ्यातला ओलावा मला दाखवून गेली. अशी ही आमची गोष्ट आमची नि माझी."

‘आम्ही दोघी’ ही स्त्री मनाचा ऋणानुबंधाची कहाणी म्हणून मला हा चित्रपट भावला, आवडला!

 

- मीरा फड