आनंदाचे संमेलन..

11 Jan 2025 12:26:24


आनंदाचे संमेलन..

 

पावसाची, माणसाची आपल्याला चाहूल लागते आणि मन तेव्हाच सुखावलेलं असतं. काही जण गंमतीने त्याला 'वेध लागणे ' असेही म्हणतात. असेच वेध 'विवेक'च्या नुक्कड साहित्य संमेलनाचे कितीतरी दिवस आधीच साहित्यप्रेमींना लागले होते. काही वास्तू कायमच आपल्याला तथास्तु म्हणत असतात. अशीच फर्ग्युसन महाविद्यालयाची वास्तू देखील आपल्या अॅम्पी थिएटर नावाच्या हातानी कला सादर करणाऱ्या प्रत्येकालाच आशीर्वाद देत आलेली आहे. अशा या वास्तूत अनेक दिग्गज, साहित्यिक आणि रसिकांच्या उपस्थितीत रंगलेलं हे संमेलन म्हणजे खरंच 'शब्दांच्या पलीकडले' होते! एकेका सत्राने संमेलनाची रंगत वाढवली. घरी येताना पुण्यासारख्या शहरातल्या 'ट्रॅफिक' मधे अडकल्यावरही गाड्यांचे हॉर्न ऐकू येण्याऐवजी मनाला भावलेली एखादी अ.ल.क., कविता, कथा, नाट्यछटेतलं छोटंसं साहस, लहान मूल होऊन ऐकलेली बालगीते नि नाटकातले डोळे भरुन आलेले चार-दोन संवाद ऐकू येत होते.. मनावरचा ताण नि गाडीचा कर्कश हॉर्न विसरायला लावणारं हे संमेलन म्हणजे सृजनाचा सोहळाच! आनंदाचे संमेलन...

 
या संमेलनासारखंच एक संमेलन आपल्या मनात देखील भरतं. या संमेलनात आपण एकटेच रसिक प्रेक्षक असतो. बाकी सारे असतात ते विचार नावाचे कलाकार.. मन नावाच्या मंचावर वेगवेगळ्या भावनांच्या सत्रात हे विचार नावाचे कलाकार आपली कला सादर करतात. आपल्या समोर हे कलाकार सतत नव्याने येऊ पाहतात. सकाळचा पडदा उघडला की कालच्यापेक्षा आज परिपक्व झालेले, नव्या वाटा, नव्या दिशा शोधणारे हे कलाकार कार्यक्रम सादर करतात. त्यातला एखादा कलाकार सूर चुकतो, डायलॉग विसरतो. पण हरवलेला सूर शोधून पुन्हा नव्याने आपल्यासमोर अवतरतो. एकाच वेळी असंख्य माणसांच्या मनात असं संमेलन सुरु असतं. आज संपणाऱ्या संमेलनात उद्याच्या कार्यक्रमांची उत्सुकता दडलेली असते. उद्याच्या संमेलनात कालची एखादी आठवण येते. या संमेलनाला नाव नाही.. फक्त असतं ते मन नावाचं गाव! 'विवेक'चं संमेलन झाल्यापासून त्यातीलच कलाकारांचं, त्यांनी सादर केलेल्या कलेचं, वक्त्यांनी व्यक्त केलेले विचार आणि रसिक श्रोत्यांच्या अगणित टाळ्या या विचारांचं नि आठवणींचं संमेलन रोजच माझ्या मनात भरतंय. प्रा. सदानंद मोरे यांनी मांडलेले मत नवा विचार देत होते. अभिजात दर्जाची भाषा राजकीय मंचावर बोलताना वक्त्याने भान ठेवले पाहिजे. राजकीय सत्ता आणि भाषा यांचा जवळचा संबंध असतो. राजकीय वक्त्यांनी भाषेचा मान राखला तरच जनता मान ठेवते. बालसाहित्य संमेलनात मुलांचे सादरीकरण पाहताना कितीतरी बदल जाणवले. हल्ली 'सोशल मिडीया'शी या मुलांचं नातं जुळलेलं आहे. मोबाईल मुलांनी फार वेळ वापरु नये यापेक्षा पालकांच्या उपस्थितीत मोबाईल वापरावा असे म्हटले पाहिजे. आधुनिक माध्यमांमुळे मुलांच्या नव्या जाणीवा प्रगल्भ होत आहेत. अर्थात पुस्तकांशीही त्यांचे नाते अधिक दृढ आहेच. मुले मोबाईल आणि पुस्तक यात समतोल साधण्याचा प्रयत्न करीत आहेत. पालक आणि शिक्षकांनी मदत केली की समतोल साधता येईल. म्हणूनच संमेलनातल्या चर्चा आणि परिसंवादाचे महत्त्व असते. हल्ली मुले लवकर मोठी होतात असं काही जणांचं मत आहे. पण बालगीतांच्या ताला-सूरात रमलेली मुले पाहून मोठी माणसे देखील लहान होतात आणि साऱ्यांचे वय विसरुन 'चंदाराणी का गं दिसतेस थकल्यावाणी?' गाण्यावर टाळ्या वाजू लागतात. म्हणूनचं हे आनंदाचे संमेलन!

 
आपलं आणि साहित्याचं नातं कसं आहे हे ज्याचं त्याला माहित असतं. पण केवळ पुस्तके वाचून काढणे म्हणजे साहित्याशी नाते आहे, असे नव्हे. आपल्याला साहित्याशी छान गट्टी जमवता यायला हवी. गट्टी जमवणं काही आपल्याला नवीन नाही. लहानपणापासूनच मित्रांशी आपण गट्टी जमवतो तशीच साहित्याशी जमवता येते. हीच गट्टी जमवण्यासाठी साहित्य संमेलन भरत असतं. या संमेलनाला गेलं म्हणजे मग त्यानंतर विचारांचं संमेलन मनात भरतं.. या विचारांच्या संमेलनातलाच एखादा विचार मनात दडलेले साहित्याविषयीचे प्रेम जागृत करतो. आणि मग संमेलनाला का जायचं ह्याचं उत्तर आपणच स्वतःला देतो. आपलं आपल्या भाषेवर प्रेम असतं. पण ते व्यक्त करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते. तरुणांनी नुसतंच भाषेवर प्रेम आहे, असं म्हणून भागणार नाही. त्यासाठी काहीतरी करायलाच हवं! काय करायचं असा प्रश्न पडलेल्यांनी संमेलनात सहभागी व्हावं म्हणजे मग त्या प्रश्नाचं नेमकं उत्तर मिळतं नि आपण कृती करु लागतो. म्हणूनच 'विवेक' सारखे संमेलन म्हणजे खऱ्या अर्थाने तुमच्या -माझ्या आणि साहित्याच्याही आनंदाचे संमेलन असते..

 

- गौरव भिडे

Powered By Sangraha 9.0