बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या निमित्ताने..

युवा विवेक    30-Sep-2024
Total Views |



बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या निमित्ताने..

 

मी क्रिकेट बोलतोय! मी संघांना जिंकताना बघितलंय, मी संघांना हरताना बघितलंय. मी अनेक संघांना हरल्यानंतर निराशेच्या गर्तेत अडकलेलं बघितलंय. त्याचसोबत मी संघांना हरल्यानंतर पुन्हा जोराने तयारी करून पलटवार करतानाही बघितलंय. मी संघांना जिंकल्यानंतर विजयाच्या धुंदीत मदोन्मत्त झालेलं बघितलंय. याचसोबत अनेक संघांना मी नम्रतेने विजय स्वीकारताना बघितलंय! मी सर्व खेळाडूंना अगदी जवळून बघितलंय. मी खेळाडूंना यशाच्या शिखरावरून दरीत पडताना बघितलंय. त्याचसोबत अनेक खेळाडूंना अपयशाची दरी पार करून यशाचे शिखर सर करतानाही बघितलंय. मी खेळाडूंची जिद्द, चिकाटी, धैर्य बघितलंय, आत्मविश्वास बघितलाय! मी अनेक सामने आणि अनेक श्रुंखला बघितल्या आहेत. पण यातले असे खूप कमी सामने आहेत किंवा खूप कमी श्रुंखला आहेत ज्या आजही मला जशाच्या तशा आठवत आहेत. २०२०-२१ मध्ये झालेली बॉर्डर-गावसकर ट्रॉफी ही एक अशीच श्रुंखला आहे जी मला अजूनही नीट लक्षात आहे.

 
बॉर्डर-गावसकर ट्रॉफी म्हणजेच भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या कसोटी सामन्यांची श्रुंखला..! क्रिकेटप्रेमींसाठी ही एक पर्वणीच असते. ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार व अष्टपैलू खेळाडू ऍलन बॉर्डर व भारताचे माजी कर्णधार व आघाडीचे फलंदाज सुनिल गावसकर ह्यांच्या सन्मानाप्रित्यर्थ ह्या मालिकेला बॉर्डर-गावसकर ट्रॉफी हे नाव दिले गेले आहे. १९९६-९७ मध्ये ही मालिका पहिल्यांदा भारतात आयोजित करण्यात आली. यानंतर साधारण १६ वेळेस या श्रुंखलेचे आयोजन करण्यात आलेले आहे. येत्या २२ नोव्हेंबरपासून या मालिकेचे सतरावे पर्व सुरु होत आहे.

 
२०२०-२१ ची श्रुंखला ऑस्ट्रेलियात असल्याने नक्कीच ऑस्ट्रेलिया जिंकायची शक्यता थोडी जास्त वर्तवली जात होती. अर्थात भारतीय संघही मागे नव्हता. २०१८-१९ मध्ये ऑस्ट्रेलियामधली ४ सामन्यांची श्रुंखला भारताने २-१ अशी जिंकली होती. त्याआधी भारताने ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियामध्ये एकही सिरीज हरवली नव्हती. २०१८-१९ बॉर्डर-गावसकर ट्रॉफी जिंकणे हा भारतीय क्रिकेटच्या इतिहासात एक मैलाचा दगड होता. राहुल द्रविड नंतर ज्याला ‘Wall of Indian Cricket’ म्हणतात तो चेतेश्वर पुजारा या श्रुंखलेत ‘Man of the tournament’ होता.

 

भारत ऑस्ट्रेलियात पुन्हा २०१८-१९ ची पुनरावृत्ती करण्यास आतुर होता. पण यावेळीदेखील अनेक आव्हाने भारतीय संघाच्या पुढे उभी होती. एकंदर सगळ्या विश्वासाठीच तो काळ कोविड-१९ मुळे कठीण होता. सर्व खेळाडूंना काटेकोरपणे सगळे नियम पाळणे गरजेचे होते. भारतीय कसोटी क्रिकेटचा सगळ्यात यशस्वी कर्णधार म्हणजेच विराट कोहली या मालिकेतील पहिला सामना खेळून मायदेशी परतणार होता. संघाचा प्रमुख सलामी फलंदाज रोहित शर्मा तिसऱ्या सामन्यापासून उपलब्ध होणार होता. तरीही भारतीय संघ त्याच जिद्दीने तयारी करत होता. सारे विश्व ही ऐतिहासिक श्रुंखला बघण्यास आतुर होते. एडिलेड ओवलचे मैदानही सज्ज होते..!

   

- देवव्रत वाघ