यश, हे ध्येय, जिद्द, चिकाटी, हतोटी, अशा अनेक द्रव्यांचं मिश्रण ! यशाच्या रेसिपीसाठी तर जिद्द मुख्य पदार्थ ! अगदी आधुनिक मानसशास्त्रातील पॉजिटिव सायकॉलॉजी या शाखेत, जिद्द, सकारात्मकता, सहवेदना, इ. बाबी अभ्यासल्या जातात. पण जिद्द म्हणजे नेमकं काय ? वाटतं, की 'नेमकं' असं काय असतं ? खरं तर काहिच नाही ! 'अपूर्ण जरी आपुला धर्म | पर धर्माहूनी बरा |ʼ हे वचन आठवतं आणि जाणीव होते की जिद्दीची सूत्रबद्ध व्याख्या करण्यापेक्षा ती अनुभवूनच तर जाणता येते. पण अनुभवण्यासाठी, त्याप्रति पोहोचण्यासाठी व्याख्या तर हवीच ना.. व्याख्या गरजेचीच, पण ती नेमकी असतेच असं नाही. कारण जिद्द हा व्यक्तिनिष्ठ अनुभव ! यशाचा पैलतीर गाठण्यासाठी, त्या जिद्दीच्या सागरापर्यंत नेणारा हा व्याख्येचा किनारा ! मग ह्या व्याख्येच्या किंवा शब्दांच्या किनार्यावर, जिद्दीच्या सागरात आणि शेवटी अखंड अथक प्रयत्नांनंतर यशाच्या पैलतीरावर कॉमन गोष्ट कोणती ? आपण ! म्हणूनच आपापल्या वाटेवर आपापली व्याख्या वेगळी, अनुभवही वेगळा. पण अर्थातच् तो अनुभव जाणिवेत धरायला गरजेचे ते आपल्या आधिच्या महाजनांनी त्यावर टाकलेले प्रकाश.
म्हणून वाटतं, की जिद्दीची एखादी व्याख्या करण्यापेक्षा, महत्वाचं जिद्द म्हणजे काय ते जाणणं. ( व्याख्या करणं अवघड असतं, आणि तेही महत्वाचंच )
जेव्हा आपण म्हणतो, की 'पहिला नंबर मला मिळवायचाय' तेव्हा ती फक्त एक इच्छा. 'पहिला नंबर मी मिळवणार' तेव्हा ही उत्कट प्रबळ इच्छा कदाचित् ध्यास. आणि 'काही करुन पहिला नंबर मी मिळवणारच' म्हणजे जिद्द असं ढोबळ मनाने म्हणता येईल. पण हा 'च' फार साधासोपा नाही बरं का. बेसावधपणी वापरलेलं हे एकाक्षर काहीही करु शकतं. कारण असं, की जेव्हा हा 'च' मधे येतो तेव्हा एक दृढ आसक्ती निर्माण होते. अर्थात् ध्येयासक्ती त्याज्य नाही. सुयोग्य ध्येयाप्रति आसक्ती हितकारकच ठरते. तिथूनच तर जिद्द उगम पावते. पण हा 'च' जेव्हा येतो, तेव्हा मत्सर निर्माण होतो, होतोच ! विचार करा, जेव्हा एखादा माणूस म्हणतो, की मी एखादं विशिष्ट पद मिळवणारच, तेव्हा तो जिद्दीने अथक प्रयत्न करतोही, पण जर काही कारणास्तव त्याला ते पद मिळालं नाही, तर पदरात मात्र घोर निराशा येते. पण एवढंच नाही, ते दुःख जास्त असण्यामागचं आणखी एक कारण म्हणजे, ते पद दुसर्याला मिळणं ! जे आपल्याला हवं होतं, हवंच होतं, ते दुसर्याला मिळालं ही गोष्ट अनेकवेळा असह्य होते आणि आपण आपल्या परिने केलेले प्रयत्न पाहून, आहे ती परिस्थिती स्विकारण्यापेक्षा, दुसर्याचा समत्सर हेवा करु लागतो. मग, प्रश्न पडतो, की याला जिद्द म्हणावं का ? तेव्हा वाटतं, की जिद्दीसाठी हा 'च' आवश्यकच. पण, हा 'च' लावूनही, ध्येयाप्रति आसक्त होऊनही, आपणच साध्य साध्य करावं ही उत्कटेच्छा बाळगूनही, दुसर्याबद्दल मत्सर न करणं या जिद्दीच्या अंतर्भूत बाबी वाटतात. कारण असं, की जिद्द हवीच पण त्या 'च' मधे मत्सर नसावा. आनंदी स्पर्धा नक्कीच असावी, पण त्यात दुसर्याप्रति त्वेष नसावा ! असं होईल, तेव्हाच साध्य साधताना, साध्य सहजच साधलं जाईल, आणि मुख्य म्हणजे साधनेतही आनंद मिळेल !
~ पार्थ जोशी