सुफळ संपूर्ण..

21 Sep 2024 11:05:40


सुफळ संपूर्ण..

नुकतीच अनंत चतुर्दशी झाली. लहानग्यांपासून अगदी वृद्ध मंडळींपर्यंत लाडका असणारा देव म्हणजे गणपती बाप्पा! या गणपती बाप्पाला नुकताच सर्वांनी वाजतगाजत पण काहीसा साश्रू नयनांनी निरोप दिला. पण पुढच्या वर्षी लवकर येण्याचे वचनही त्याच्याकडून घेतले. छान छान केलेली आरास, वेगवेगळ्या आकाराचे मखर, निरनिराळ्या पताका वगैरे सजावट गुंडाळून पुढच्या वर्षी मिळेल अशा खुणेनी सर्वांनी पिशव्यांत ठेवूनही दिली असेल. आता पुन्हा नेहमीप्रमाणे कर्मचा-यांचे ऑफिसचे , विद्यार्थ्यांचे शाळेचे, तर गृहिणींचे घराचे रुटीन सुरु झाले. अर्थात आता पितृपंधरवडा झाला म्हणजे नवरात्र सुरु होईल आणि त्यानंतर वेध लागतील ते दिवाळीचे.. पण तोपर्यंत मात्र काम आणि कामच करायचे आहे. सणवाराच्या निमित्ताने झालेल्या सुट्या, घेतलेल्या रजांचे हिशेब चुकते करायचे आहेत. पण या कामातूनही कधीतरी थोडीशी सवड मिळेल. पण मन अजूनही श्रावण आणि भाद्रपदाच्या उत्सवातच रमलेले असल्यामुळे सुफळ आणि संपूर्ण झालेल्या कहाण्या आपले मन पुन्हा पुन्हा आपल्याला सांगत बसेल. आपणही नेहमीप्रमाणे त्यात रमून जाऊ आणि आपल्याला मिळालेली सवडही सुफळ संपूर्ण होईल.

श्रावण महिना आपण अगदी गंगेसारखा पवित्र मानतो. त्याला कारणही आहे आणि ते म्हणजे श्रावणातली व्रतवैकल्ये! माणसाची हिरव्या निसर्गाशी ही व्रतवैकल्ये गाठ घालून देतात. कितीतरी प्रकारची पत्री आपण देवाला श्रावण आणि भाद्रपदात वाहतो. मंगळागौरीच्या व्रतापासून अनंताच्या पूजेसाठी निरनिराळी फुले आणि पत्री बाजारात विकायला असतात. सोमवारी श्रावणात काही जण लघुरुद्र ठेवतात. त्या वेळी बेलाची कितीतरी पाने आपण आणतो. शुक्रवारच्या व्रतात आघाड्याचे महत्व आहे. शनिवारी रुईला महत्व आहे. सत्यनारायणाच्या व्रतात सहस्र तुळशीदले बाळकृष्णाला आपण वाहतो. गणपतीच्या पूजेसाठी एकवीस प्रकारची पत्री असतात तर अनंताच्या चरणी चौदा प्रकारची पत्री वाहतात. एरवी बाजारात झेंडू, शेवंती, गुलछडी वगैरे नेहमीच्या चार-पाच प्रकारच्या फुलांची आवक होत असते. पण श्रावण आणि भाद्रपदात निरनिराळ्या सुवासिक फुलांचीही आवक होते. मंगळागौरीचे सकाळी पूजन करुन रात्रीपर्यंत वेगवेगळे खेळ खेळले जातात. सत्यनारायण, सत्यविनायक आणि अनंताच्या व्रतकथेतही रात्री गायन, नृत्य आणि सर्वांसमवेत भोजन करावे असे सांगितले आहे. या सा-यामुळे उत्साह वाढतो आणि वर्षभर तो उत्साह आपल्याला पुरतो. म्हणूनच ही सारी व्रतवैकल्ये अतिशय श्रद्धेने आणि आनंदाने करावीत. म्हणजे ती ख-या अर्थाने सुफळ होतात.

या व्रतवैकल्यांच्या बाबतीत शास्त्रकारांनी स्त्रियांचा अधिक विचार केलेला आहे. पूर्वी स्त्रियांना घरची कामे इतकी असत की, बाहेर जायचे म्हटले तरी उसंत नसे. हे एक कारण आणि काही व्रते स्त्रियांच्या शरीरास आणि मनास पोषक असतात हे देखील एक कारण म्हणा.. यामुळे शास्त्रकारांनी बरीचशी व्रते स्त्रियांनाच करण्यास सांगितलेली असावीत. या प्रत्येक व्रताच्या शेवटी कथांचे वाचन आणि श्रवण आवर्जून केले जाते. या कथांची मांडणी क्रमबद्ध आणि शास्त्रशुद्ध असते. या व्रतांसारख्याच वारांच्याही काही कहाण्या आहेत. या कहाण्या सार्थ असतात. अमुक एक व्रत केले म्हणजे त्याचे काय फळ मिळेल, ते व्रत कसे व कोणी आचरावे, व्रत अर्धवट सोडल्यास काय घडते, हे व्रत पूर्वी कुणी केले होते वगैरे माहिती या कहाण्यातून आपल्याला सविस्तर मिळते. या कथांचे वाचन आणि श्रवण करताना मनात एक उत्साह आणि त्याबरोबरीनेच निरागसता आपल्याला जाणवते. या कहाण्यांचे शेवटचे वाक्य, " इथे ही कहाणी सुफळ संपूर्ण झाली " असे असते. या वाक्यामुळेच ते व्रत पुन्हा पुन्हा करण्याची इच्छा आपल्याला होते. ते व्रत आपण नीट समजावून घेतो आणि मोठ्या भक्तिभावाने करतो. त्याचे फळ आपल्याला मिळाले की आपण विश्वासाने ते व्रत करु लागतो. या विश्वासातूनच श्रद्धा निर्माण होते. ती श्रद्धाच ख-या अर्थाने सुफळ संपूर्ण होते. आपणही ख-या अर्थाने व्रतस्थ होतो.

ही व्रते आणि त्यांच्या कहाण्या जीवनाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन आपल्याला देतात. व्रताचे विधान, त्याचे नियम आणि ते व्रत करण्याचा शुभकाल त्या कहाण्यांत दिलेला असतो. त्याप्रमाणे व्रत आचरले की त्याचे फळ आपल्याला निश्चितच मिळते. इतका साधा आणि सोपा या व्रतवैकल्यांचा अर्थ असतो. पण सध्या विज्ञाननिष्ठ होण्याऐवजी धर्म आणि विज्ञान यांची स्पर्धा आपण करीत आहोत. या व्रतांना नावे ठेवणे, शास्त्रकारांची अवाज्ञा करणे वगैरे कृतींचा नकळत अवलंब आपण करतो आहोत. त्यामुळे या व्रतवैकल्यांचा आपल्याला हवा तो अर्थ आपण घेऊन धर्म आणि विज्ञान या दोघांच्याही विरोधी आचरण करीत आहोत. एखादे काम आपण निष्ठेने, श्रद्धेने आणि प्रामाणिकपणे केले तर यशाचा मार्ग सोपा होतो. एखादे कार्य सुफळ संपूर्ण होते. हाच संदेश त्या व्रतातून शास्त्रकारांना द्यायचा आहे. प्रत्येक कहाणीच्या शेवटी असलेल्या सुफळ आणि संपूर्ण या शब्दांचा अर्थ त्या कहाणीत दडलेला आहे. म्हणूनच या कहाण्यांकडे, व्रतांकडे बघण्याच सकारात्मक दृष्टिकोन आपण ठेवला तर छान नवं काहीतरी आपल्याला शिकायला मिळेल आणि स्वतःबरोबरच सा-या सजीव आणि निर्जीव सृष्टीकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन आपल्याला मिळेल. आपले जीवनच सुफळ संपूर्ण होईल!

- गौरव भिडे

Powered By Sangraha 9.0