भाषेची समृद्ध जडणघडण..

31 Aug 2024 16:04:10


भाषेची समृद्ध जडणघडण..


तोंडावाटे बाहेर पडणारा ध्वनी म्हणजे भाषा.. अशी सोपी भाषेची व्याख्या आहे. पण तोंडावाटे बाहेर पडणा-या ध्वनींना अर्थ असतो. त्या अर्थामुळेच त्याला भाषेचे रुप प्राप्त होते. दिवसभरात कितीतरी अक्षरे, शब्द नि वाक्ये आपण बोलतो. मन आणि मेंदू यांचा संयोग घडून आला म्हणजे आपण एकमेकांशी काय बोलतो नि कसे बोलतो हे आपल्याला उमगते. केवळ तोंडावाटे बाहेर पडणारा ध्वनी इतकीच भाषेची व्याख्या मर्यादित नसते. एखादा शब्द जरी आपण बोललो तरी तो बोलण्यामागे एखादा विचार असतो. विशिष्ट अक्षरावर जोर देऊन किंवा एखादे अक्षर काहीसे नाजूकपणे आपण बोलतो. हे जोर देणं किंवा नाजूकपणा हा शब्दाच्या अर्थावर अवलंबून असतो. म्हणून भाषेत अर्थाला महत्व आहे. आपण काय बोलतो त्याचा अर्थबोध होण्यासाठी शब्दाचा उच्चार देखील महत्वाचा असतो. भाषेचा असा ध्वनी ते उच्चार प्रवास असतो. या प्रवासातील प्रत्येक टप्पा म्हणजे भाषेची एक प्रकारची जडणघडण आहे. ज्याप्रमाणे मूल मोठे होताना त्या त्या वयात त्याच्यावर संस्कार होतात त्याप्रमाणेच आपण उच्चारीत असलेल्या एकेका अक्षरावर भाषेचे संस्कार व्हायला हवेत. हे संस्कार म्हणजे भाषेचे व्याकरण होय. या भाषेवर व्याकरणाचे संस्कार झाले म्हणजे त्याची जडणघडण समृद्ध होत आहे, असे म्हणता येईल. भाषासमृद्धीचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण घेणे असा आहे. अलीकडच्या काळात इंग्रजी आणि मराठी माध्यमातील स्पर्धेत मातृभाषेचा पाया पक्का होत नाही नि इंग्रजी भाषा देखील नीटशी कळत नाही. म्हणूनच, हल्ली बोलताना मिश्र भाषेचा अनेकजण वापर करतात किंवा एखादा शब्द बोलताना काही जण गोंधळलेले आहेत हे चटकन लक्षात येते. काही दिवसांपूर्वी एक विद्यार्थी माझ्याकडे शिकवणीला येत असे. इंग्रजी आणि मराठी अशी मिश्र भाषा तो बोलत असल्याकारणाने माझीच भाषा बिघडते की काय अशी मला भिती वाटत होती. त्या विद्यार्थ्यासमोर भाषेची तुलना करण्याऐवजी किंवा चुका काढण्याऐवजी शब्दकोष वापरण्याची सवय मी त्याला लावली. शब्दांचा गोंधळ नष्ट होऊन तो विद्यार्थी उत्तम मराठी आणि इंग्रजी भाषा बोलतो. भाषा समृद्ध करण्यासाठी फारशी मेहनत घेण्याची गरज नसते. मातृभाषा नियमित वापरणे आणि परभाषिक शब्द शब्दकोष वापरण्याची सवय लावून घेतली म्हणजे भाषा अडचणीची न होता सोपी वाटू लागते. मातृभाषेची अवहेलना केली नाही आणि इंग्रजी भाषेशी किंवा इतर कोणत्याही भाषेशी स्वभाषेची तुलना केली नाही तर भाषेच्या ध्वनी ते उच्चार या प्रवासात अडथळे निर्माण होत नाहीत.

साहित्य हे तर भाषेचे ह्रदयच आहे. बोलीभाषांचा तो आत्मा आहे. साहित्याचे मन लावून शांतपणे वाचन केले म्हणजे हळूहळू ती भाषा आपल्याला अवगत होते. आदिवासी बोलीचा उगमच संगीत या माध्यमातून झालेला आहे. कोकणी भाषेचा विशिष्ट ढंग, आहिराणी भाषेची लय यातूनच त्या बोली अधिकाधिक समृद्ध होत गेल्या आहेत. मराठी भाषेत मौखिक साधनांप्रमाणेच लिखित साधने उपलब्ध होती. या साधनांमुळे, ती भाषा सतत वापरीत राहिल्यामुळे नि त्या भाषेच्या कित्येक साहित्यिकांनी केलेल्या सृजनसेवेमुळेच त्याची अधिक जडणघडण होते. शेक्सपियरसारख्या विदेशी लेखकाने लिहलेली नाटके भारतात आज उत्साहाने वाचली जातात ती त्याने भाषेच्या अविरत केलेल्या सेवेमुळेच! लेखक नि वाचकाचा स्नेह जळून येतो तो भाषा या घटकामुळेच.. एखाद्या ऋतूविषयी कवी कविता करीत असेल तर वेगवेगळ्या शब्दांनी त्या कवितेस तो सजवतो. ही शब्दांची आकर्षकता पाहून मन सुखावते. म्हणूनच व्याकरणात अलंकाराचा समावेश होतो. लेखक आणि समीक्षकांच्या मूक संवादामुळेही भाषेची जडणघडण होत असते. प्रसिद्ध लेखिका डाॅ. नीलिमा गुंडी यांचे भाषेच्या संदर्भातील काही लेख प्रसिध्द आहेत. आपल्या एका लेखात त्या म्हणतात, " भाषेतली गंमत जाणून घेण्याचा एक मार्ग म्हणजे शब्दांची व्युत्पत्ती शोधणे. यातून आपल्याला खूप नवी माहिती मिळते." ही गंमत आपल्याला कळण्यासाठी आपण नियमितपणे व्युत्पत्तीकोष, शब्दकोष वापरावेत. एखादी ग्रामीण कथा वाचताना एखादा शब्द समजला नाही तर, तो शब्द व्युत्पत्ती कोषात शोधला म्हणजे तो किती सोपा होता हे आपल्याला समजते. त्या शब्दाची गंमतही आपल्या लक्षात येते.

मधे एका मित्राने बराच आग्रह केल्यामुळे मी त्याच्याकडे चहाला गेलो. आम्ही गप्पा मारताना त्याच्या आईने त्याला हाक मारली. त्या काकू म्हणाल्या "चाय गाळण्यासाठी मले सांडशी (साणशी) दे." तेव्हा मला चिमटा या शब्दाला हा नवा शब्द समजला. असे कित्येक शब्द आपल्याला दैनंदिन व्यवहारात होणा-या संभाषणातून समजतात. मी एखादा नवा शब्द ऐकला की छोट्याशा वहीत तो टिपून ठेवतो. रिकामा वेळ मिळेल तेव्हा व्युत्पत्तीकोषात त्याची व्युत्पत्ती नि अर्थ शोधतो. आवडलेले शब्द कुणाशी सहजच गप्पा मारताना वापरतो, तेव्हा तो शब्द वापरताना अधिकच गंमत वाटते. वेगवेगळ्या मार्गांनी भाषेचा अधिकाधिक वापर केला म्हणजे त्याची आपोआपच जडणघडण होते आणि भाषा समृद्ध होते..

- गौरव भिडे

Powered By Sangraha 9.0