वळणं गावकुसाकडची..!

28 Aug 2024 14:52:52


वळणं गावकुसाकडची..!

पहाटेच्या कुडकुडणाऱ्या थंडीचा प्रवास दुपारच्या सुमारास,साधारण बाराच्या ठोक्याला रांनवाटेला अनवाणी पायांना तापलेल्या मातीच्या फुफाट्यात सावलीच्या आधाराने पावलांना सावरत-सावरत चालत राहायचं...

सावलीत पावलांना सावरणे असतेच,पण नशीबाला आलेला कडक उन्हाचा पारा काही आयुष्यभर सोबत न सोडणारा असतो.उपरण्याने जितकं होईल तितकं सावरत जिथवर उन्हाच्या झळाया डोळ्यांना दिसतात,तिथवर सीमा ठरवून चालतं व्हायचं,कश्यासाठी चालतो आहे माहीत नाही किंवा याला उत्तरही शोधायचं नसतं...

एका अंगाला परतीच्या वाटेचा खापरीचा रस्ता दिसतो,अर्धवट वाहत्या पाण्याने भरलेला,गुळगुळीत झालेल्या दगड धोंड्यांचा नितळ,पारदर्शी वाहत्या पाण्याचा चेहऱ्यावर ते थंडगार पाणी घेऊन बकर्याच्या खुरांनी रस्त्याची मोकळी झालेली मुतरट वासाची मातड,मातीचा फुफाटी चेहऱ्यावर अनुभवायला येते.

ती खसाखसा हातानी घासून धुवून टाकायची नायतर,रात्रीची झोप ती येऊन देत नाय अन् सारे गाल टराटर उलून अंगाला झोंबायला लागते ...

एकूण हिवाळ्याच्या दिवसात हा गाव रहाटीचा जगण्याचा तोरा काही अलगच आहे,असतो.साल दर साल परसाकडच्या मुंज्याला बोनं द्यावं तसं हे नियतीचं देणं आहे.फेडत राहायचं अंगावर लेवून मिरवत राहायचं,जोवर आयुष्याची भक्तिभावाशी बांधलेली गाठ घट्ट आहे ...

रांनच्या वाटाला फिरणारा कैला आबा कामा धंद्याला लागला आहे,गावची पोरं शहराला जावून शहाणी झाली अन् गावची रानमुंजे पोरंसोरंही बदलून हुशार झाली अन् कामा धंद्याला लागली.यात माझ्यासारखी ना धड गावची,ना धड शहराची आमची ओढ कुठं हे अजूनही आम्हाला कळलं नाही अन् आम्ही असंच वणवण भटकत राहीलो आहे...

कधीतरी शहराला बॅग (दप्तर) घेऊन पाठीवर औद्योगिक वसाहतीच्या आश्रयाला असलेल्या कंपनीच्या मोठ्या कॅबीनमध्ये बायोडाटा घेऊन तासंतास उभा राहीलो,तिथला गार्ड बाबा हजारदा एकच वाक्य बोलला...

बाबा लेका बॉडीत (कंपनीमध्ये) पर्मनंट लोकात ओळख लागतिया,तुझ्या कूनिबी ओळखीचा नाय साहेब इथं वापस जा..!

पण म्या काय ऐकतो,बायोडाटा घेऊन दिवसभर उभा राहतो.माझ्यासारखी चार-सहा पोरं आशेनं आलेली अस्त्यात,सांज ढळली की तोच बायोडाटा गार्ड बाबांच्या हाताशी देऊन आत साहेबा लोंग पोच करा म्हणून निघुन जातो..!

आशेनं माघारी कंपनीकडे बघत की,एक दीस माझा तो कागुद साहेबां पहुतर जाईल,अन् म्या बी कंपनीत चार पैका कमवील....

एकांगी जगणं,आयुष्यात ठरवुन निर्णय घेतलेली पोरं अर्धवट आयुष्य जगुन खुश आहे.मी मात्र अजूनही आयुष्य कसं जगायचं या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी भटकत आहे,यात नेमके हे कळलं नाही की,आयुष्यात नियोजन करून मी जगतोय की,नियोजन करतांना उशीर झाला आहे..? की मी कुणी सामान्यपणे आयुष्य जगत नसुन एका त्या वेगळ्या वर्तुळात आयुष्य जगण्याची माझी रित आहे...

असो जे आहे ते छान आहे इतकं नक्कीच सांगेल..!

कारण ठरवुन आयुष्य जगण्यात आनंदच नाहीये...

अळवांच्या पानांवर पडलेल्या दवांकडून बहरुन येणं मी शिकावं,

माझ्याही आयुष्याचा व्हावा उत्साह..!

अन् मग सांडणीतल्या पाण्यानंही वाहत्या पाण्याशी सीमोल्लंघन करूनी स्वातंत्र्य ते नव्यानं अनुभवावं..!

पुन्हा गावच्या रानवाटा खुणावू लागल्या की,फुफाट्याला अंगावर घेत चालत राहायचं.वावराला दूरवरून दिसणारी माणसे बघत डोळ्यात ती सगळी साठवायची,त्यांच्याप्रती मनात एक आदराचा भाव असतो,जो कायम बुजगवण्यागत मनाशी ठान मारून बसलेला आहे...

कधीतरी बोडकी बाभुळ दिसली की तिच्या पडसावलीत तिच्या फांद्यावर फिरणाऱ्या मुंग्यांना बघत राहायचं,तिच्या शेवटच्या घटका मोजण्याच्या या घडीत तिचाच तिनं तिच्या पिवळ्या फुलांनी अभिषेक करून घ्यावा..!

जगणं शिकावं यांच्याकडून,बोडक्या बाभळीच्या शेवटच्या काळातही सर्व कसे अलबेल सुरळीत चालू असल्यासारखे भासते इथे आल्यावर...

माझ्यासारख्या नवख्याला इथे बघून गावची लोकं विचारपूस करत्या,पण मी टाळतो संवाद अन् पुढच्या बोडक्या बाभळीच्या सानिध्यात जातो,तिच्याशी मनाचा मनचा संवाद साधायला.वरवर इकडं कुणी भटकत नसते,म्हणून गावच्या एकांगाला असलेल्या या रानात मी भटकत असतो फार फार जमील आबाची भेट होते रोजची...

तो ही माझ्यासारखाच आयुष्याला काठीवर घेऊन बकऱ्या सांभाळत जगणारा,निसर्गाशी एकरूप झालेला,निसर्गाच्या सान्निध्यात खूश असणारा,निसर्गात जगणारा.

त्याचं नाव मी थोरो ठेवलं आहे,हुबेहूब तसाच दिसतोही अन् तसाच जगतोही.कधी कधी वाटतं त्याला सांगावं वाॅल्डेनबद्दल पण नको कारण त्याचं जगणं तितकंच समृद्ध आहे जितकं थोरोचं,त्यामुळं त्याला वाॅल्डेनबद्दल सांगून थोरो तुझ्यापेक्षा उंचीचा आहे हे ही मला सांगायला नको वाटते...

आयुष्याला जगतांना एका वेगळ्या उंचीवर जावून जगायला भेटलं की,अश्या सामान्य गोष्टींतून खूप सुख भेटतं.ते अनुभवता यावं जे शिकतोय आता,बाकी आर्थिक गणितं उलगडावी लागताच आयुष्यात पण ठराविक सीमेपर्यंत जावून ती ओळखता यायला हवी ते ही शिकतोय...

मुळात आयुष्यात जगण्या काबिल होवून माणूस फार फार आयुष्याचा शेवट जगत असावा.कारण शिकत राहण्यासारखे खूप आहे कधीतरी तारुण्यात आपलं सळसळनारे रक्त ते मान्य करत नसते,पण जेव्हा आपलं आयुष्य वार्धक्याकडे झुकते तेव्हा कळून चुकते की आयुष्यात ज्या गोष्टी मनापासून करायला आवडतात,ज्यात आपलं मन रमते ते आयुष्यात करायला हवे.पुढे जेव्हा आपल्या आयुष्याच्या शेवटच्या घटका चालू असता तेव्हा मग आपणही हे सर्व स्वीकारायला लागतो..!

 
- भारत लक्ष्मण सोनवणे.
Powered By Sangraha 9.0